অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दैनंदिन पर्जन्यमापक

दैनंदिन पर्जन्यमापक

सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात, तो आ. १ मध्ये दाखविला आहे. पर्जन्यमापकातील नसराळ्याच्या मुखाचा व्यास १२७ मिमी. (५ इंच) असून त्याच्या काठाची उंची ११० मिमी. (४ १/२ इंच) असते. पाऊस पडताना वारा नसल्यास पावसाचे थेंब उदग्र (उभ्या) दिशेने नसराळ्यात पडतात; पण पाऊस पडताना वारा असल्यास पावसाचे थेंब तिरप्या दिशेने येऊन नसराळ्यात पडतात. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी नरसाळ्याबाहेर जाऊ नये म्हणून नसळ्याचा काठ आकृतीत दाखविल्याप्रमाणे धारदार आणि उंच केलेला असतो. नसराळ्याच्या मुखावर पडणारे पावसाचे पाणी अरुंद नळीवाटे खाली येऊन एका दंडगोलाकार भांड्यात किंवा काचेच्या बाटलीत जमा होते. बाष्पीभवनाने पावसाचे पाणी कमी होऊ नये म्हणून नसराळ्याच्या नळीचा व्यास खूपच लहान केलेला असतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे पर्जन्य मापकाचा काही भाग जमिनीत पुरलेला असतो. जमिनीच्यावर जो दंडगोलाचा भाग राहतो त्यावर नसराळे बसविलेले असते. पर्जन्य मापकाची वरची कडा जमिनीपासून बरोबर ३०.५ सेंमी. (१२ इंच) उंचीवर असते. बाह्य दंडगोलाच्या आत एक काढता येईल व परत ठेवता येईल असा दुसरा एक दंडगोल असून त्यात नरसाळ्याच्या नळीतून पडणारे पाणी साठविण्यासाठी एक काचेची बाटली ठेवलेली असते. क्वचित प्रसंगी अतिवृष्टी झाल्यामुळे बाटली भरून गेल्यास जास्त असलेले पाणी बाटलीच्या बाहेरील दुसऱ्‍या दंडगोलाकृती भांड्यात जमा होते व त्याचेही मापन करता येते. पर्जन्यमापकातील पाणी मोजण्यासाठी उष्णतेने कमीतकमी प्रसरण पावणाऱ्‍या काचेचे एक चंचुमुखी मोजपात्र वापरतात. त्यावर सेंमी. व मिमी.च्या खुणा असून नसराळ्याचा व्यासही लिहिलेला असतो. नसराळ्याच्या मुखाचा व्यास व चंचुमुखी मोजपात्राचा व्यास यांचे गुणोत्तर साधे असणे आवश्यक असते. साधारणपणे मोजपात्राच्या मुखाचा व्यास नसराळ्याच्या मुखाच्या व्यासाच्या १/३ असतो. मोजपात्र दंडगोलाकृती असते. तळ सपाट असतो. कधीकधी मोजपात्राच्या तळाकडील बाजू निमुळती म्हणजे व्यास कमी होत जाणारी अशी केलेली असते. अशा रचनेमुळे पाऊस थोडा पडल्यास पर्जन्यमापकात जमलेले पाणी अधिक अचूकतेने मोजता येते. पाणी मोजताना त्याच्या पातळीची खालची कडा पाहून उंचीची नोंद करावयाची असते. चंचुपात्राऐवजी पाणी न शोषणाऱ्‍या लाकडाची अंशांकित पट्टीही बाटलीतील पाण्यात बुडवून उंची मोजता येते.

दैनिक पर्जन्यमापकातील पाणी दररोज एकदा ठराविक वेळी (भारतीय प्रमाणित वेळेप्रमाणे सकाळी ८.३० वाजता) मोजतात. काही ठिकाणी अशी निरीक्षणे दिवसातून अनेकदा करतात. याचप्रमाणे साप्ताहिक व मासिक पर्जन्यमापके केलेली असून त्यातील पाणी जमा करावयाची दंडगोलाकृती भांडी अधिक मोठ्या आकारमानाची असतात. दुर्गम प्रदेशात अशी मापके वापरतात. पावसाच्या पाण्याचे अधिक अचूकपणे मापन करावयाचे झाल्यास दंडगोलीय भांड्यासह पाण्याचे वजन करतात व त्यावरून पर्जन्य किती झाला ते निश्चित करतात. या पद्धतीत पाणी एका भांड्यातून मोजपात्रात ओतताना सांडपाण्याचा व भांड्यांना चिकटून राहिलेले पाणी मोजले न जाण्याचा संभव राहत नाही. ह्या प्रकारची पर्जन्यमापक उपकरणे हिमवर्षाव किंवा गारांचा वर्षाव होत असतानाही वापरण्यात येतात. नसराळ्याच्या वरच्या काठाची उंची ११० मिमी. असल्यामुळे त्यात बऱ्‍याचशा गारा किंवा बरेचसे हिम जमा होऊ शकते. वितळल्यानंतर त्यांचे पाण्यात रूपांतर होते. ते वर्षण म्हणून या उपकरणांच्या साहाय्याने मोजले जाऊ शकते. ३०.५ सेंमी. (१ फूट) जाडीचा हिमस्तर साधारणपणे २.५४ सेंमी. (१ इंच) द्रवरूप पाण्याच्या वर्षाइतका असतो, असे मानण्यात येते. कोणत्याही पर्जन्यमापनात ०.१ मिमी. ची अचूकता आवश्यक असते. हिमवर्षावाच्या बाबतीत ती १ मिमी. पर्यंत असली पाहिजे. पावसाळासंपला असला, तरी पर्जन्यमापकाची निरीक्षणे दररोज ठराविक वेळी केलीच पाहिजेत. पुष्कळ ठिकाणी वर्षातून अनेकदा दव पडते. कधी-कधी अल्पतम पर्जन्याइतकेच ते दव मोजण्याइतपत असते. जगात सर्व ठिकाणच्या पर्जन्यमापनात एकसूत्रता असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने पर्जन्यमापक ज्या ठिकाणी बसवायचा त्या ठिकणच्या योग्य प्रातिनिधिक पर्जन्याचे प्रमाण कळावे म्हणून व वर्षाणाशिवाय अन्य कारणांनी पर्जन्यमापकात जमा होणाऱ्‍या पाण्यात भर किंवा घट होऊ नये म्हणून विशेष दक्षता घ्यावी लागते. पर्जन्यमापकाच्या आजूबाजूची जमीन सपाट असावी. पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर ते परावर्तित होऊन किंवा फुटून त्यांचे तुषार पर्जन्यमापकात जातील इतकी ती जमीन कठीणही नसावी. पर्जन्यमापकाच्या नसराळ्याचे तोंड ठिक क्षैतिज (आडव्या) पातळीत असावे. वारा व उसळलेले पाणी यांचा परिणाम होऊ नये म्हणून पर्जन्यमापकाच्या मुखाची वरची कडा सपाट जमिनीपासून ३०.५ सेंमी. उंचीवर असावी. असमंतातील घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्‍या जोराच्या वाऱ्‍यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यामापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्‍या जोराच्या वाऱ्‍यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यामापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये. पर्वतीय प्रदेश, किनारपट्टीवरील ठिकाणे, पाणथळ रान किंवा ओसाड प्रदेश यांसारख्या ठिकाणी पर्जन्यामापक ठेवणे अटळ असल्यास प्रचलित वाऱ्‍यांच्या वेगवान प्रवाहापासून त्याचे संरक्षण करणे आवश्यक असते. अशा वेळी ३ मी. व्यास व ३०.५ सेंमी. खोली असलेल्या वर्तुळाकार, खोलगट व सपाट गवताळ जमिनीचे क्षेत्र तयार करतात आणि त्याच्या ठीक मध्यभागी पर्जन्यामापकाच्या नसराळ्याचे वरचे तोंड गवताळ जमिनीपासून ३०.५ सेंमी. उंचीवर राहील अशा राहील अशा रीतीने पर्जन्यामापक बसवितात (आ. २). या खोलगट गवताळ जागेच्या भिंतीचा आतील भाग संपूर्णतया उदग्र राहावा म्हणून भिंतीच्या आतील भागास लाकडी फळ्या ठोकलेल्या असतात. भिंतीच्या आतील भागास लाकडी फळ्या ठोकलेल्या असतात. भितीची जाडी १५ सेंमी. (६ इंच) असते आणि तिच्या बाह्य बाजूच्या जमिनीला १: ४ असा उतार दिलेला असतो. ह्या खोलगट जागेत पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साचले असल्यास ते काढून टाकण्यासाठी निष्कांची (पाण्याचा निचरा करणाऱ्‍या नलिकांची) सोय केलेली असते. अशा रीतीने पर्जन्यामापकाची स्थापना केल्यास द्रुतगती वाऱ्‍यांमुळे पर्जन्यामापकाच्या सान्निध्यातील पावसाचे थेंब इतस्ततः उधळले न जाता पडलेल्या पावसाचे यथायोग्य मापन होते. पर्जन्यामापकाच्य़ा नसराळ्याचा वरच्या कडेचा व्यास सर्व देशांतील वेधशाळांत १२७ मिमी. (५ इंच) असतो असे नाही. उ. अमेरिकेच्या संयुत्त्क संस्थानांतील वातावरणवैज्ञानिक वेधशाळांतील पर्जन्यामापकांत तो २०३.२ मिमी. (८ इंच), कॅनडात ९०.२ मिमी. (३,५७ इंच), ब्रिटन, भारत इ. देशांत १२७ मिमी. असतो.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate