অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वयंलेखी पर्जन्यामापक

स्वयंलेखी पर्जन्यामापक

जेव्हा वर्षणाचे अखंडित अभिलेखन करणे आवश्यक असते तेव्हा स्वयंलेखी पर्जन्यामापक वापरतात. अशा उपकरणांच्या साहाय्यने गेल्या २४ तासांतील कोणत्याही क्षणापर्यंत किती पाऊस पडला हे तर कळतेच पण कोणत्याही क्षणी पर्जन्यत्वरा किती होती हेही कळते. याशिवाय पाऊस केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला हेही या उपकरणाच्या साहाय्याने मिळविलेल्या आलेखाच्या अभ्यासावरून कळून येते.

स्वयंलेखी पर्जन्यामापकात (आ. ३) २०.३२ सेंमी. (८ इंच) व्यासाच्या नसराळ्यातून पडणारे पावसाचे पाणी ज्या भांड्यात जाते त्यात धातूचा एक असतो. जसजसे पाणी जमेल तसतसा तो डबा पाण्याच्या पाचळीबरोबर वर उचलला जातो. एका ठराविक उंचीवर पाण्याची पातळी पोहचताच एका वक्रनलिकेमुळे पाणी बाहेर वाहून जाते, भांडे रिकामे होते आणि तो तरंगणारा बंद डबा पुन्हा पूर्वस्थितीत खाली येतो. या तरंगणाऱ्‍या डब्यास एक लेखणी जोडून ती घडाळ्याच्या यंत्रणेप्रमाणे फिरणाऱ्‍या दंडगोलावर गुंडाळलेल्या आलेखपत्रावर टेकलेली असते. पावसाचे पाणी जमून जसजशी भांड्यातील पाण्याची उंची वाढते तसतसा तरंगणारा बंद डबाही वर जातो. त्याप्रमाणे तरंगणाऱ्‍या डब्याच्या उंचीची आलेखपत्रावर अविरतपणे नोंद होत असते. साधारणपणे १ सेंमी. पावसाचे पाणी भांड्यात जमल्यानंतर वक्रनलिकेतून सर्व पाणी निघून जाते व तरंगणारा डबा पुन्हा भांड्याच्या तळाशी येतो. दीर्घकालपर्यंत जोराची वृष्टी होत असल्यास प्रत्येक वेळी १ सेंमी. पाऊस झाला की, भांडे रिकामे होते व तरंगणारा डबा खाली येतो. असा प्रकार अनेकदा होऊ शकतो. तरंगणाऱ्‍या डब्याच्या सर्व हालचाली आलेखपत्रावर नोंदल्या जातात. त्यामुळे पाऊस कितीही पडला, तरी त्याची अचूकपणे नोंद होते. त्याचप्रमाणे छोट्या कालखंडात किती पाऊस पडला हे आलेखावरून चटकन कळून येत असल्यामुळे कोणत्याही वेळेची पर्जन्यतीव्रता त्यावरून समजू शकते. स्वयंलेखी पर्जन्यमापकांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. काही उपकरणांत पावसाचे पाणी ज्या भांड्यात जमा होते ते भांडे एका तराजूवर ठेवलेले असते. तराजूच्या काट्याला एक लेखणी जोडलेली असते. पाऊस जसजसा पडू लागतो तसतसे भांड्यातील पाण्याचे वजन वाढू लागते व ते अविरतपणे आलेखपत्रावर नोंदले जाते. कोणत्याही वेळेची पर्जन्यवृष्टीची तीव्रता प्रत्यक्ष दाखविणारी उपकरणेही सध्या अनेक ठिकाणी वापरात आहेत. काही विद्युत् दूरवर्तीमापक उपकरणांच्या साहाय्याने दूर अंतरावर पडलेल्या पावसाच्या नोंदी वेधशाळांच्या कार्यालयात दिसू शकतात.

र्जन्यमापके एकूण पावसाचा अत्यल्प भाग मोजतात. विस्तृत क्षेत्रावर पडणाऱ्‍या पावसाचे पाणी तुरळक ठिकाणी ठेवलेल्या केवळ १२७ मिमी. किंवा २०३.२ मिमी. व्यास असलेल्या नसराळ्याच्या पर्जन्यमापकांकरवी मोजल्यामुळे त्या क्षेत्रावरील नक्त पर्जन्यवृष्टीची अनुक्रमे कितपत प्रातिनिधिक असतील, याबद्दल वातावरणविज्ञ साशंक आहेत. पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडत नाही. गडगडाटी वादळांचा पाऊस अत्यंत सीमित क्षेत्रावर पडतो. ३० किमी. च्या अंतरावर असलेल्या दोन पर्जन्यमापकांच्या मधल्या भागात जर गडगडाटी पाऊस पडला, तर दोन्ही पर्जन्यमापकांत त्या पावसाची नोंद असू शकणारा नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन, मासिक व वार्षिक पर्जन्यमूल्यांवर कितपत अवलंबून रहावे, याबद्दल अनिश्चितता उदभवते. तथापि पर्जन्यमापकांची संख्या वाढवून त्यांचे जाळे तयार केले, तर कोणत्याही क्षेत्रावरील पर्जन्याचे प्रातिनिधिक मूल्य मिळू शकेल, यात शंका नाही. अधिक अचूकतेसाठी ३ ते १० सेंमी. तरंगलांबीचे तरंग प्रेषित करणारे रडार वापरतात [ रडार]. ही उपकरणे ३५० किमी. अंतरापर्यंत पर्जन्यबिंदूचे आकारमान व ढगांच्या एकक आकारमानातील पर्जन्यबिंदूंचे आकारमान व ढगांच्या एकक आकारमानातील पर्जन्यबिंदूंची संख्या अत्यंत अचूकपणे मोजू शकतात. त्यामुळे अशा उपकरणांच्या साहाय्याने विस्तृत प्रदेशावर पडणाऱ्‍या पावसाची विश्वसनीय अनुमाने करता येतात.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate