অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खनिज तेल रसायने

कच्च्या तेलापासून व नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या वर वर्णन केलेल्या उत्पादांपेक्षा निश्चित स्वरूपात भिन्न असलेल्या रसायनांच्या उत्पादनास १९१८ साली सुरुवात झाली. त्यावेळी कच्च्या तेलातील अंशांचे औष्णिक भंजन करून प्रोपिलिनापासून आयसोप्रोपिल अल्कोहॉल मिळविण्यात आले. पुढे लवकरच एथिल व ब्युटिल अल्कोहॉले आणि एथिलीन ऑक्साइड तयार करण्यात येऊ लागले. सुरुवातीला खनिज तेलाचे परिष्करण करताना त्यातील रासायनिक भाग वेगळे करत असताना योगायोगाने रसायने मिळाली. मात्र पुढे काही ठराविक रसायने कृत्रिम रीतीने बनविण्यासाठी खनिज तेलाच्या भागांचे उपयोग ठराविक रासायनिक भाग तयार करण्यासाठी मुद्दाम होऊ लागले

पूर्वी परिष्करण कारखान्यांनी केरोसिनाच्या उत्पादनाने पुष्कळ पैसा मिळविला. पुढे गॅसोलिनाने त्याची जागा घेतली. गॅसोलिनाची किंमत कमी ठेवूनही अगदी मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन करून उत्पादकांना समाधानकारक नफा होत राहिला. नफा कमी पडू लागल्यावर वंगणांचे उत्पादन सुरू झाले.वंगणे बनविण्याचा खर्च आणि त्यांची विक्रिची किंमत यांत गॅसोलिनाच्या मानाने बराच नफा असल्यामुळे सापेक्षत: कमी प्रमाणात वंगणे तयार करूनही पैसा वसूल होऊ लागला. परंतु पुढे ती परिस्थितीही राहिली नाही. हल्ली खनिज तेल रसायने तयार करून नफा मिळविण्याची तेल कंपन्यांना मोठी संधी प्राप्त झाली आहे. बहुतेक प्रत्येक परिष्करण कारखाना त्यातील परिष्करणाच्या प्रकारानुसार व भौगोलिक ठिकाणानुसार निवडक खनिज तेल रसायने तयार करतो. यामुळे खनिज तेलाचे परिष्करण हे रसायने तयार करण्याच्या कारखान्यांच्या अगदी जवळचे आणि संबंधित असे काम होऊन बसले आहे. तसेच प्रक्रियांची निवड व तयार होणारे उत्पाद यांबाबतीत परिष्करण क्रिया अधिक विविध प्रकारच्या झाल्या आहेत. परिष्करण कारखाने व रसायने तयार करणारे कारखाने स्वतंत्रपणे किंवा एकत्र होऊन नैसर्गिक वायू, कच्चे तेल व परिष्ककरणात मिळालेले टाकाऊ भाग यांच्यापासून उपयुक्त अशी अनेक रसायने बनविण्यात गुंतले आहेत. कच्च्या तेलात कार्बन, हायड्रोजन व इतर मूलद्रव्ये असल्यामुळे त्यापासून सैद्धांतिक दृष्ट्या अनेक कार्बनी आणि काही अकार्बनी पदार्थ तयार करता येतात. खनिज तेलातील निरनिराळे घटक वापरंणाऱ्या प्रकिया जसजशा वाढत चालल्या तसतसे खनिज तेल रसायनांचे क्षेत्र विस्तृत होऊ लागले. हल्ली या क्षेत्राने कार्बनी रसायनशास्त्राचे जवळजवळ संपूर्ण क्षेत्र व्यापिले असून अकार्बनी रसायनशास्त्रातील नव्या वाटांचा शोध लावला आहे. व्यापारी खनिज तेल रसायने ही मुख्यत्वेकरून अ‍ॅरोमॅटिक व अ‍ॅलिफॅटिक कार्बनी संयुगे असतात. काजळी, अमोनिया आणि गंधक यांसारखे काही थोडेच अकार्बनी पदार्थ खनिज तेल रसायने म्हणून मिळवितात [ खनिज तेल रसायने].

जागतिक खनिज तेल

खनिज तेलाचे लहानमोठे साठे सर्व जगभर पसरलेले आहेत. परंतु त्याचे प्रचंड साठे सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, इराक, इराण, लिबिया, अल्जीरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा व्हेनेझुएला व इंडोनेशिया या देशांत प्रामुख्याने आहेत. यांपैकी बहुतेक सर्व देशांत खनिज तेलाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या १९७० च्या अहवालानुसार १९६९ साली खनिज तेलाचे जागतिक उत्पादन दोन अब्ज सात कोटी बावीस लाख टन झाले. १९६१–६५ या काळात दरवर्षी सरासरी १३१ कोटी ३१ लाख टन, १९६६ मध्ये १६४ कोटी १६ लाख, १९६७ मध्ये १७६ कोटी  १० लाख, १९६८ मध्ये १९२ कोटी ३७ लाख, तर १९६९ साली २०७ कोटी २२ लाख टन उत्पादन झाले. १९६० नंतर तेलाचे साठे शोधून काढण्याच्या कामाला विशेष चालना मिळाली.सध्या वाळवंटे, दलदलीचे प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश व उथळ पाण्याखालचे आणि समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश अशा सापेक्षत: दुर्गम प्रदेशांतही खनिज तेलाचा शोध चालू आहे. १९६९ साली ज्ञात असलेला खनिज तेलाचा जगातील निश्चित साठा ७३ अब्ज टन इतका होता. दोन अब्जांहून थोडे अधिक टन खनिज तेल वापरले गेले. अशा रीतीने त्याच्या उत्पादनात व वापरात दरवर्षी वाढ होत आहे. या गोष्टींचा विचार करता हे ज्ञात साठे व शोधून मिळणारे नवीन साठे सु. ४० ते ५० वर्षांत संपुष्टात येतील, असा अंदाज करण्यात येतो. त्यामुळे नंतर तेल–शेल (ज्यांच्यापासून ऊर्ध्वपातनाने तेल मिळवता येते असे एक प्रकारचे गाळाचे खडक), दगडी कोळसा यांसारख्या पदार्थांपासून खनिज तेल मिळवावे लागेल. १९६३ साली अमेरिकेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला की, सु. ५० वर्षानंतर तेल–शेल खडकांचे ऊर्ध्वपातन करणे जरी महाग असले, तरीही ते करून खनिज तेलाचे उत्पादन करावे लागेल. अमेरिकेत या खडकांचे साठे सु. ७० अब्ज टन इतके आहेत. कॅनडामध्ये अ‍ॅथाबास्का येथे डांबरी वाळूचे साठे याहून अनेक पटींनी अधिक आहेत. सध्या बाजारात मिळणाऱ्या गॅसोलिनाच्या दराशी स्पर्धा करू शकणाऱ्या दरात दगडी कोळशापासून गॅसोलीन मिळविण्यासाठी प्रायोगिक व कमी क्षमतेचे कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न अमेरिकेत काही ठिकाणी चालले आहेत.जगातील निरनिराळ्या देशांतील खनिज तेलाचे साठे व उत्पादन यांची माहिती कोष्टक क्र.५ मध्ये दिली आहे.

अमेरिका

या देशात खनिज तेलाचे सर्वांत जास्त उत्पादन होत आहे. अमेरिकेतील एकूण तेलाच्या साठ्यांपैकी सु. अर्धे साठे टेक्ससमध्ये आहेत आणि बाकीचे मुख्यत्वेकरून कॅलिफोर्निया, लुइझियाना, ओक्लाहोमा, वायोमींग, कॅनझस, न्यू मेक्सिको व इलिनॉय या राज्यांत आहेत. आर्‍कॅन्सॉ, मिसिसिपी, मिशिगन, कोलोरॅडो व पेनसिल्व्हेनिया या राज्यांत कमी प्रमाणात तेल मिळते. खनिज तेलाची मागणी व परिष्करणक्षमता दरवर्षी ४५ कोटी टनांहून अधिक आहे. मात्र खनिज तेलाच्या उत्पादांची मागणी यापेक्षाही अधिक असल्यामुळे खनिज तेलाची आयात करणे भाग पडते. खनिज तेल रसायनांच्या क्षेत्रात हा देश सर्व जगात अग्रेसर आहे. तसेच प्लॅस्टिक, रेझीन, संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेले) तंतू, संश्लेषित रबर इ. क्षेत्रांत येथे इतकी प्रगती झाली आहे की, यूरोपातील इतर प्रगत देशही याबाबतीत अमेरिकेवर अवलंबून आहेत. इंधनाच्या एकूण मागणीपैकी ७०% मागणी खनिज तेलाचे उत्पाद व नैसर्गिक वायू यांनी पुरविली जाते. खनिज तेल किंवा त्याचे गॅसोलिनासारखे उत्पाद यांची दरडोई मागणी व उपयोग या देशात सर्वांत जास्त आहे. गॅसोलिनाची मागणी खनिज तेलाच्या उत्पादांच्या एकूण मागणीच्या सु. ४५ टक्के आहे. खनिज तेलाच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील तेलाचे साठे कमी झाले. परंतु नैसर्गिक वायूचे नवीन साठे सापडल्यामुळे त्यांच्या साठ्यांत थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.

रशिया

खनिज तेलाच्या उत्पादनाच्या बाबतीत रशियाचा अमेरिकेच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. खनिज तेलाचे रशियातील साठे अमेरिकेपेक्षा अधिक पण सौदी अरेबिया व कुवेत यांच्यापेक्षा कमी आहेत. रशियात नैसर्गिक वायूचे साठेही प्रचंड आहेत.रशियामध्ये तेलाचे उत्पादन करणारी पुढील पाच प्रमुख क्षेत्रे आहेत, त्यांपैकी पहिली चार कॉकेशियन पट्ट्यात आहेत. (१) बाकू प्रदेश हा पूर्व कॉकेशसमधील अ‍ॅप्शेरन द्वीपकल्पात आहे, (२)  ग्राँत्सी प्रदेश, (३) माइकॉप– क्युबान प्रदेश– हा काळ्या समुद्राजवळ उत्तर कॉकेशसमध्ये आहे, (४) डागेस्तान व (५) उरल-व्होल्गा (दुसरा बाकू). रशियातील गाळाच्या खडकांच्या बऱ्याच भागांचे पूर्वेक्षण अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे हा देश खनिज तेलाच्या उत्पादनात अग्रेसर बनेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. येथे इंधनाच्या मागणीपैकी सु. ५० टक्के भाग खनिज तेलाचा आहे. पूर्वी कार्बनी रसायन उद्योग व खतनिर्मिती उद्योग मुख्यत्वेकरून कोळशावर आधारित होते. हल्ली हे उद्योग खनिज तेलावर अवलंबून आहेत. निरनिराळ्या कार्बनी रसायनांचे व इतर खनिज तेल रसायनांचे उत्पादन सध्या खनिज तेलापासून करण्यात येत आहे.

व्हेनेझुएला, कोलंबिया व त्रिनिदाद

माराकायव्हो सरोवराच्या पूर्व किनाऱ्याच्या खाली व आजूबाजूला असणाऱ्या ५० किमी. लांबीच्या पट्ट्यातून व्हेनेझुएलातील खनिज तेलाचे बहुतेक सर्व उत्पादन हाते.१९६९ च्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागला. या देशाच्या जवळच असणाऱ्या कोलंबिया व त्रिनिदाद या देशांतही खनिज तेलाचे साठे असून तेथे उत्पादन चालू आहे. त्रिनिदादमधील प्रसिद्ध पिच लेकमधून अस्फाल्ट मिळते. येथील पालोसेको व ब्रिंग्टन यांमधील भागात असणाऱ्या संमुखनती (खालच्या बाजूला अंतर्गोल असलेली घडी) व विमुखनती संरचनांतील साठ्यातून तेलाचे उत्पादन होते. त्रिनिदाद व टोबॅगो मिळून १९६९ साली ८१ लाख टन उत्पादन झाले. कोलंबियातील खनिज तेल मुख्यत्वेकरून वरच्या बाजूस असणाऱ्या मॅग्डालीना खोऱ्यातून मिळविण्यात येते. या देशांतील १९६९ मधील उत्पादन २१ कोटी ३१ लाख टन इतके झाले.

मध्यपूर्व

या भागातील इराण, सौदी अरेबिया, कुवेत, इराक व ओमान आणि संयुक्त अरब राष्ट्रे या देशांत खनिज तेल भरपूर प्रमाणात सापडते. जगातील खनिज तेलाचे सर्वांत अधिक साठे सौदी अरेबियात आहेत. वरील सर्व देश मिळून होणारा मध्यपूर्व हा भाग खनिज तेलाच्या साठ्यांच्या दृष्टीने संपूर्ण जगात अत्यंत महत्त्वाचा आहे.

इराक व इराण

येथील मुख्य तेलक्षेत्रे (१) हाफ्ट केल, (२) मस्जि-द-ए-सुलेमानजवळ, (३) आघाजारी, (४) गख सारान, (५) नफ्त साफिद व (६) लाली (ही सर्व पर्शियन आखाताच्या ईशान्येस आहेत) आणि (७) नफ्त-इ-शाह(बगदादच्या उत्तरेस सु. १३० किमी. अंतरावर) ही आहेत. या देशांच्या सीमांजवळ इराकमध्ये (८) नफ्त खाने व त्याच्या पलीकडे (९) किर्कूक व (१०) क्कैयाराह ही तेलक्षेत्रे आहेत. दक्षिण इराणमधील खनिज तेल पर्शियाच्या आखाताकडे व इराक-इराणचे तेल भूमध्य समुद्राकडे नळातून वाहून नेण्यात येते. अरेबियन तेल ट्रान्स-अरेबियन नळातून हैफा येथे पोहोचविण्यात येते.

सौदी अरेबिया

(१) पर्शियन आखातापासून सु. १४० किमी. अंतरावर असणारे दम्मम क्षेत्र, (२) अ‍ॅबकाइक, (३) कातीफ, (४) अबू हैदिरा व (५) बुक्का या ठिकाणच्या क्षेत्रांत तेल सापडते. दम्मम येथील तेल लवणी घुमटाजवळ मिळते. इतर सर्व ठिकाणी विमुखनती संरचना आहेत. अ‍ॅबकाइक येथील संरचना सु. ५० किमी. लांबीची असून ते जगातील मोठ्या तेलक्षेत्रांपैकी एक आहे. बहरीन बेटावरील एका मोठ्या विमुखनतीमध्ये असणाऱ्या क्रिटेशस कालीन (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शेल-वालुकाश्म-चुनखडकांपैकी एका सच्छिद्र खडकातून सु. ६३३ मी. व ८३३ मी. इतक्या खोलीवर खनिज तेल मिळते.

कुवेत

मध्य क्रिटेशस कालीन (सु. १२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) विमुखनतीतील वाळूच्या तीन थरांत १,२२३ मी. व १,५८३ मी. इतक्या खोलीवर खनिज तेल मिळते. या देशातील साठा हा जगातील मोठ्या साठ्यांपैकी एक आहे.

संयुक्त अरब राष्ट्रे

घड्या पडताना विभंग पावलेल्या व तिरप्या झालेल्या क्रिटेशस ते मायोसीन या (सु. १४ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातल्या थरांमध्ये ईजिप्तमधील खनिज तेल आढळते. हे तेलक्षेत्रांचे थर सुएझपासून दक्षिणेस सु. २२५ किमी. अंतरावर आखाताच्या पश्चिमेस आहेत.

मध्यपूर्वेतील देशांत मिळणारे बरेचसे खनिज तेल इतर देशांना निर्यात करण्यात येते. या देशांतील परिष्करणक्षमता मर्यादित आहे. खनिज तेल रसायन उद्योगास अगदी योग्य असा कच्चा माल या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु या भागातील खनिज तेल उत्पादांची मागणी कमी आहे. अभियांत्रिकी व तंत्रविद्येच्या संस्थांचा, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा व कारखान्यांसाठी लागणाऱ्या सोयींचा अभाव इ. कारणांमुळे खनिज तेल उद्योगधंद्यांचा या भागात म्हणावासा विकास झालेला नाही. या भागातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था खनिज तेलाचे उत्पादन, त्याची विक्री व निर्यात यांवरच अवलंबून आहे.

कॅनडा

(१) पश्चिमेकडील इलाखे, (२) लीमा-इंडियाना तेलक्षेत्राचा उत्तरेकडील विस्तार असणारा आँटॅरिओमधील सार्नियाचा प्रदेश व (३) अ‍ॅपालॅचियन तेलक्षेत्राचा कॅनडामध्ये असणारा, नायगारा धबधब्याच्या पश्चिमेकडील भाग या तीन प्रदेशांत कॅनडामध्ये खनिज तेल मुख्यत्वेकरून सापडते. कॅनडातील नैसर्गिक वायूचे साठे जगातील सातव्या क्रमांकाचे आहेत. यामुळे खनिज तेल रसायनांच्या उद्योगधंद्यांना तेथे खूपच वाव आहे. १९५०–६० या काळात खनिज तेल उद्योगधंद्यांची वाढ १६ टक्क्यांनी झाली व ती सतत होत आहे. या उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून अल्बर्टा राज्यातील नैसर्गिक वायू व परिष्करण कारखान्यातून मिळणारा नॅप्था वापरतात. नैसर्गिक वायू सापेक्षत: स्वस्त दराने मिळतो. त्याचा उपयोग संश्लेषित वायू तयार करण्यासाठी व नॅप्था आणि परिष्करणातील प्रवाहात मिळणाऱ्या इतर पदार्थांचा उपयोग ओलेफीन तयार करण्यासाठी होतो. नैसर्गिक वायूपासून गंधक मिळवितात. कॅनडाचा मोठा विस्तार, त्याच्या काही भागांत असणारे असह्य हवामान, सापेक्षत: कमी लोकसंख्या, त्यामुळे खनिज तेल उत्पादांचा कमी वापर व कमी मागणी, दळणवळणाच्या साधनांची सापेक्षत: कमी उपलब्धता यांमुळे कॅनडामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे साठे विपुल असूनदेखील खनिज तेल उद्योगधंद्यांचा विस्तार अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. गॅसोलिनाची मागणी या देशात खनिज तेल उत्पादांच्या एकूण मागणीच्या ३५ टक्के आहे. कॅनडातील बऱ्याच खनिज तेल उद्योगधंद्यांची मालकी अमेरिकेतील खाजगी कंपन्यांकडे आहे.

आफ्रिकेतील देश

१९५०–७० या काळात आफ्रिकेतील काही देशांत खनिज तेलाचे उत्पादन सुरू झाले. पैकी लिबिया व अल्जीरियामध्ये मुख्यत्वेकरून उत्पादन होते. या दोन देशांतील खनिज तेल त्या देशांत असणाऱ्या सहारा वाळवंटाच्या भागात मिळते. सहाराच्या दक्षिणेस नायजेरिया व गाबाँ या दोन देशांतच खनिज तेलाचे उत्पादन होते. आफ्रिकेत तेलाचे उत्पादन करणारा चौथ्या क्रमांकाचा ईजिप्त हा देश आहे पण त्याची गणना मध्यपूर्वेकडील देशांत करतात.

अल्जीरिया

सहारा वाळवंटामध्ये खनिज तेलाचे प्रचंड साठे आहेत. अल्जीरियातून होणारी तेलाची निर्यात वाढत आहे. या देशात खनिज तेल उद्योगधंद्यांमध्ये व खनिज तेल रसायने तयार करण्याच्या दृष्टीने खूपच वाव असून नवीन उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत. येथून द्रवीकृत नैसर्गिक वायू यूरोपला निर्यात करण्यात येतो.

इंडोनेशिया

या देशातील बहुतेक खनिज तेल मायोसीन व प्लायोसीन (सु. २ ते १ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालखंडातील गाळांच्या खडकात आढळते. हे खडक सु. ३,२५० मी. जाडीचे असून बहूतेक सर्व तेल या खडकांना घड्या पडून तयार झालेल्या उथळ अशा विमुखनती संरचनांतून मिळते. नैसर्गिक वायूचे साठे पण या देशात मोठ्या प्रमाणात मिळतात. नैसर्गिक वायूपासून तयार करण्यात येणाऱ्या अमोनियाव्यतिरिक्त या देशात खनिज तेल उद्योगधंद्यांचा विशेष विकास झालेला नाही.

मेक्सिको

(१) उत्तरेकडील किंवा (टँपीकोजवळचे) पानूको, (२) दक्षिणेकडील (टॅमासोपो वा गोल्डन लेन) तूसपानजवळ, (३) पोझारिका आणि (४) तेवानतेपेक या चार तेलक्षेत्रांत खनिज तेल सापडते.

चीन

येथील खनिज तेलाच्या साठ्यांबद्दल माहिती उपलब्ध नाही. कार्बनी रसायने व इतर रासायनिक उद्योग दगडी कोळशावर आधारित आहेत. नैसर्गिक वायूचे काही साठे शोधून काढण्यात आले आहेत. भविष्यकाळात नैसर्गिक वायूंपासून संश्लेषित वायू तयार करण्याच्या योजना आहेत. खतांचे उत्पादन करणे हा चीनमधील अग्रक्रमाचा उद्योग आहे.तसेच नायट्रोजनाचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत

अर्जेंटिना

(१) दक्षिण किनाऱ्यावरील कोमोदोरो रीव्हादाव्हिया, (२) साल्टा, (३) नेउकेन व (४) मेंदोसा हे पूर्व अँडीजमधील खनिज तेलाचे चार प्रदेश अर्जेंटिनामध्ये आहेत. पैकी पहिल्या तेलक्षेत्रातून अर्जेटिनातील खनिज तेलाचे ८० टक्के उत्पादन होते. या देशात नैसर्गिक वायूचे पण साठे आहेत. येथे मागणीनुसार खनिज तेलाचे उत्पादन केले जाते व परिष्करणक्षमता ठरविली जाते. येथील खनिज तेल रसायनांच्या उद्योगधंद्यात बरीच प्रगती झालेली आहे.

पूर्व यूरोप

पूर्व यूरोपात रूमानियामध्येच काय ते जास्त प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन होते. हंगेरी, अल्बेनिया, पोलंड, बल्गेरिया, यूगोस्लाव्हिया या देशांत अल्प प्रमाणात तेलाचे उत्पादन होते. रूमानियामध्ये (१) सब-कार्पोथियन, (२) ट्रान्सिल्व्हेनियन खोरे (फक्त नैसर्गिक वायू) आणि (३) बकाऊ प्रदेश या भागांत नैसर्गिक वायू व खनिज तेल मिळते. खनिज तेल मायोसीन व पूर्व प्लायोसीन काळातल्या विमुखनतीतील वाळूत, सैंधवी घुमटात व लवणाच्या विमुखनतीत मिळते. नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात मिळतो व कच्च्या खनिज तेलात गॅसोलिनाचे प्रमाण उच्च असते.

खनिज तेल, भारतीय

९५६–६१ या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारत सरकारने खनिज तेलाचा शोध, त्याचे परिष्करण व वाटप ही कार्ये सुरू केली. त्या वेळेस भारतातील खनिज तेल उद्योगाचा खऱ्या अर्थाने पाया घातला गेला. १९५६ साली तेल व नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना झाली. या उद्योगधंद्यात यश मिळून त्याचा प्रसार झाल्यावर १९६३ साली खनिज तेल व रसायने मंत्रालय सुरू झाले. भारतातील खनिज तेलाच्या शोधाचा इतिहास सुरुवातीला दिलेला आहे. भारतामध्ये खनिज तेल उद्योगधंद्याची सुरुवात आसाम तेल कंपनी व बर्मा शेल कंपनी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात केली. परंतु त्यांचे कार्य मुख्यत्वेकरून आसामच्या वरच्या भागातच होते. १९४९–६० या काळात स्टँडर्ड व्हॅक्यूम ऑइल कंपनीने पश्चिम बंगालमधील खोऱ्यात खनिज तेलासाठी समन्वेषण केले. प्रथम या कंपनीने समन्वेषणाचे काम स्वतंत्रपणे केले व पुढे भारत सरकारबरोबर ‘इंडो-स्टॅनव्हॅक पेट्रोलियम प्रॉजेक्ट’ या स्वरूपात केले. सध्या आसाम ऑइल कंपनी, ऑइल इंडिया लिमिटेड आणि तेल व नैसर्गिक वायू आयोग ह्या तीन संस्था खनिज तेलाचे समन्वेषण करतात. पैकी पहिल्या दोन खाजगी क्षेत्रातील व आयोग सरकारी क्षेत्रातील आहे. पहिल्या दोन संस्था बहुतेककरून आसामातील क्षेत्रातच कार्य करतात, तर आयोग भारतातील इतर सर्व भागांत कार्य करतो.

गाळाच्या खडकांनी व्यापलेले प्रदेश जवळजवळ संपूर्ण भारतभर विखुरलेले असून त्यांनी दहा लाख चाळीस हजार चौ.किमी. क्षेत्र व्यापलेले आहे. तसेच खंबायत व कच्छच्या आखातातील अपतटी प्रदेश, गुजरात व महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश, कारोमंडलच्या बाजूचा किनारा, पाल्क सामुद्रधुनी व मानारचे आखात, गंगा व महानदी या नद्यांच्या मुखांचे प्रदेश, केरळचा किनारा, अंदमान व निकोबार बेटे ह्या भागांत खनिज तेल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाने भारताच्या निरनिराळ्या भागांत भूवैज्ञानिक व भूभौतिक समन्वेषणाचे कार्य चालू ठेवले आहे. त्यात मिळालेल्या माहितीवरून आयोगाने निरनिराळ्या राज्यांत वेधनाचे काम सुरू केले आहे. मात्र बरेच वेधन गुजरात व आसाम राज्यांत झाले असून या भागांत अधिकाधिक वेधन चालू आहे. कारण या भागांत नैसर्गिक वायू व तेलाचे प्रत्यक्ष साठे सापडले आहेत. आयोगाला अनेक विहिरींत खनिज तेल व नैसर्गिक वायू सापडले आहेत. यांपैकी मुख्य ठिकाणे म्हणजे खंबायतमधील वायुक्षेत्र आणि अंकलेश्वर, कलोल व नवगाम ही गुजरातमधील आणि रुद्रसागर व लकवा ही आसामातील तेलक्षेत्रे होत. खंबायतच्या आखताच्या अपतटी प्रदेशात एक वर्षभर वेधन करून प्रयत्न केल्यानंतर १९ मार्च १९७० रोजी तेलाचा झरा लागला, परंतु येथे आर्थिक दृष्ट्या परवडेल इतक्या मोठ्या प्रमाणात तेल मिळाले नाही. १९७०-७१ साली दाबका या गुजरातमधील ठिकाणी नवीन सापडलेल्या सरंचनेमध्ये तेल आढळले आणि तेथे उत्पादन सुरू होऊन उत्तर गुजरातमधील तेलाच्या उत्पादनात वाढ झाली. या भागात आणखी १३ विहिरी खणण्यासाठी वेधन यंत्रणा उभारण्यात आली. त्रिपुरा भागात अपतटी वेधन करण्यासाठी १९७१ च्या अखेरीस वेधनाची यंत्रणा उभारण्यात आली. अलियाबेट या ठिकाणीही वेधन सुरू करण्यात आले आहे. या आयोगातर्फे भारताबाहेरील काही देशांत उदा., इराणमध्ये खनिज तेलाच्या समन्वेषणाचे व तांत्रिक सल्ला देण्याचे कार्य करण्यात येते. १९५६ ते डिसेंबर १९७० पर्यंत आयोगाने एकूण ८६२ विहिरी खणल्या. त्यांपैकी ४७८ विहिरींत खनिज तेल, ६६ विहिरींत नैसर्गिक वायू, २१ पाण्याच्या अंत:क्षेपणासाठी आणि २१४ कोरड्या व ८३ मध्ये तपासणी चालू होती. सप्टेंबर १९७२ अखेर एकूण ९८२ विहिरी खणण्यात आल्या.

ऑइल इंडिया लिमिटेड ही ५० : ५० या प्रमाणात भारत सरकार व बर्माशेल कंपनी यांच्या भागीदारीत चालणारी संस्था असून तिला १,३२१ चौ.किमी. भागाच्या खाणकामाचा परवाना व १,२१९ चौ. किमी. भागाच्या समन्वेषणाचा परवाना देण्यात आला आहे. हा भाग ईशान्य भारतात आहे. या संस्थेने डिसेंबर १९७० पर्यंत २८४ उत्पादनासाठी व १४ समन्वेषणाच्या  विहिरी खणल्या. या संस्थेचे उद्दिष्ट दरवर्षी ३० लाख टन खनिज तेलाचे उत्पादन करणे हे आहे. तिने १९७० साली ३० लाख ६० हजार टन उत्पादन केले. यापैकी ३० लाख ४० हजार टन तेल गौहाती व बरौनी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आणि दिग्बोई येथील आसाम ऑइल कंपनीच्या परिष्करण कारखान्यांना पाठविण्यात आले.

आसाम ऑइल कंपनीने डिसेंबर १९७० पर्यंत ९९८ विहिरी खणल्या त्यांपैकी ३८४ विहिरींतून उत्पादन चालू आहे. सध्या या कंपनीचे दरवर्षी १ लाख १० हजार टन उत्पादन चालू आहे.

भारतातील खनिज तेलाचे उत्पादन सतत वाढत आहे. १९६१–१९६५ या काळात दरवर्षी सरासरी १६ लाख ९६ हजार टन उत्पादन झाले. १९६६ साली ४६ लाख ४७ हजार, १९६७ साली ५६ लाख ६७ हजार, १९६८ साली ५८ लाख ५३ हजार, १९६९ साली ६७ लाख २३ हजार, १९७० साली ६८ लाख ९ हजार व १९७१ साली ७१ लाख ८५ हजार टन असे खनिज तेलाचे उत्पादन दरवर्षी वाढत्या प्रमाणात झाले.

देशातील खनिज तेलाची मागणी उत्तरोत्तर वाढतच आहे. १९७१ साली भारतास सु. दोन कोटी टन खनिज तेलाची आवश्यकता होती.

त्यांपैकी सु. ०·७ कोटी टन तेल आसाम व गुजरात राज्यांतील तेलक्षेत्रांतून मिळाले. उरलेले सु.१·३ कोटी टन तेल परदेशातून आयात करावे लागले. या आयात तेलाची किंमत सु. १०० कोटी रुपये होती. १९७२ मध्ये आसाम व गुजरात राज्यांतील तेलक्षेत्रांतून सु. ०·७४ कोटी टन तेल मिळाले आणि १·२३ कोटी टन आयात करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने भारत सरकारच्या तेल व नैसर्गिक वायू आयोगाने डेहराडून येथे चालविलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन या संस्थेत खनिज तेल उद्योगधंद्याच्या सर्व अवस्थांचे संशोधन करण्यात येते व त्याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच डेहराडून येथे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेने चालविलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेत खनिज तेलाच्या परिष्करणाची तंत्रविद्या आणि व्यापार या विषयांचे संशोधन करण्यात येते व या विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येते.

(१) आसाम : बर्मा शेल व आसाम ऑइल कंपनी यांनी नहरकटिया येथे १९५३ मध्ये खणलेल्या क्र.१ या विहिरीत तेल मिळाले. या यशामुळे आसामात इतरत्रही तेलाचे साठे मिळतील अशी आशा उत्पन्न झाली. सध्या दिग्बोई, नहरकटिया, मोरान या क्षेत्रांतून तेलाचे उत्पादन चालू आहे. तेल व नैसर्गिक वायू आयोगाने रुद्रसागर व लकवा या ठिकाणी तेलाचे साठे शोधून काढले आहेत.

(२) गुजरात  : १९५८ मध्ये खंबायतजवळ लुणेज येथे तेल व नैसर्गिक वायू आयोगाने खणलेल्या विहिरीत काही थोड्या प्रमाणात तेल आढळले. तेथे जवळपास जास्त विहिरी खणल्यानंतर नैसर्गिक वायू विपुल प्रमाणात सापडला. सध्या खंबायत क्षेत्रातून त्याचे उत्पादन चालू आहे. येथील नैसर्गिक वायू धुवरण औष्णिक विद्युत् केंद्रात पाठविण्यात येतो. १९६० मध्ये अंकलेश्वर या अत्यंत महत्त्वाच्या तेलक्षेत्राचा शोध लागला. तेथून रोज सु. ८,००० टन उच्च प्रतीच्या तेलाचे उत्पादन चालू आहे. गुजरातमध्ये कलोल, नवगाम इ. क्षेत्रांतून तेलाचे उत्पादन होते. हे तेल कोयाली परिष्करण कारखान्यात पाठविण्यात येते. मेहसाणा, जंबुसर, कच्छ इ. ठिकाणी विहिरी खणण्याचे काम चालू असून राज्यातील इतर काही ठिकाणीही विहिरी खणण्यात येणार आहेत.

(३) पश्चिम बंगाल : १९४९ साली स्टँडर्ड व्हॅक्युम ऑइल कंपनी व इंडो-स्टॅनव्हॅक पेट्रोलियम प्रॉजेक्ट यांच्याद्वारे मिळविलेल्या भूभौतिकीय माहितीच्या आधारे या राज्यात दहा विहिरी खणण्यात आल्या. नंतर तेल व नैसर्गिक वायू आयोगाने खणण्याचे काम केले परंतु त्यात यश आले नाही.

(४) हिमाचल प्रदेश : कांग्रा जिल्ह्यातील एका खेडेगावी जमिनीतून बाहेर पडणारा नैसर्गिक वायू आढळून आला. या ठिकाणी आगपेटीतील काडी धरली असता आपोआप पेटून ज्योत जळू लागे. हा दैवी चमत्कार मानण्यात येऊन ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ज्वालामुखी देवीचे देऊळ बांधले. पुढे त्या गावाचे नावही ज्वालामुखी पडले. १९५८ मध्ये या भागात तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाने विहीर खणली असता नैसर्गिक वायू विपुल प्रमाणात मिळाला नाही. या प्रदेशात इतरत्र खणलेल्या विहिरीही निष्फळ ठरल्या.

(५)  इतर राज्ये : गेल्या काही वर्षांत पंजाब, राजस्थान, जम्मू व काश्मीर, पाँडिचेरी इ. राज्यांत विहिरी खणण्यात आलेल्या आहेत. त्रिपुरा, नेफा व द्वीपकल्पातील किनारपट्टीचा उथळ समुद्र  या प्रदेशांत तेलाचे साठे शोधून काढण्याचे काम चालू आहे.

लेखक : र.पां.आगस्ते ; दि.रा.गाडेकर ; चं.स.टोणगावकर ;अ.ना.ठाकूर ; र.वि.जोशी, ;ह.कृ.जोशी

स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate