অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खनिज तेल साठवणूक व वाहतूक

खनिज तेल साठवणूक व वाहतूक

संग्रह

विहिरीची उत्पादनक्षमता निश्चित केल्यावर तिच्यातून तेलाचे उत्पादन सुरू होईपर्यंत ती बंद ठेवतात. क्षेत्रातील आवश्यक त्या सर्व विहिरी खणून झाल्यावर जवळच तेल साठविण्यासाठी टाक्या बांधून काढतात.उत्पादन सुरू झाल्यावर तेल या टाक्यांमध्ये साठविण्यात येते. खनिज तेलाचे साठे जगात सर्वत्र पाहिजे तितक्या प्रमाणात आढळत नाहीत, मात्र त्यास मागणी सर्वत्र असते म्हणून खनिज तेलाचा किंवा त्यापासून मिळणाऱ्या परिष्कृत उत्पादांचा संग्रह करणे आवश्यक असते.खनिज तेलाचा संग्रह कोठे करावयाचा हे उत्पादन करणाऱ्या विहिरी व परिष्करण कारखाना यांतील अंतर आणि उत्पादांच्या मागणीची ठिकाणे कोठे आहेत, यांवर अवलंबून असते. सामान्यत: परिष्करण कारखान्याजवळ तेल साठविण्यासाठी मोठ्या टाक्या बांधलेल्या असतात. त्यांत बरेच तेल साठविता येते. अमेरिकेत अशा काही टाक्यांमध्ये पाच–सहा कोटी लि. तेल साठविण्यात येते व काही टाक्या तर दहा ते साडेबारा कोटी लि.तेल मावेल इतक्या प्रचंड आहेत. १० ते २० विहिरींतील तेल एकत्र करण्यासाठी विहिरींच्या गटांची संग्रह स्थानके बांधतात. कित्येक मोठाल्या व विस्तृत तेलक्षेत्रांत अनेक संग्रह स्थानके असतात. या सर्व संग्रह स्थानकांतील तेल वरील प्रकारच्या टाक्यांत साठवितात. या टाक्यांचा सामान्यत: एखाद्या ठिकाणी समुदाय असतो. त्यास टाक्यांचे क्षेत्र म्हणतात. अशी टाक्यांची क्षेत्रे बहुतेक करून समुद्राच्या किनाऱ्याजवळ किंवा तेलवाहक नळांच्या अंतिम टोकांजवळ असतात. तसेच परिष्करण कारखानेही त्यांच्याजवळच म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणीच असतात. टाक्यांच्या क्षेत्रात तेलाचे विविध उत्पाद साठविण्याची व त्यांचे वाटप करण्याची सोय असते. म्हणून टाक्यांची केंद्रे जवळच असणाऱ्या परिष्करणाच्या कारखान्याशी नळाने जोडलेली असतात. उत्पाद ठराविक तेलवाहक टाक्यांत भरण्यासाठी व मोटारींतून, रेल्वे वाघिणीतून किंवा तेलवाहक नळातून गुदामांमध्ये किंवा ग्राहकांकडे पाठविण्याची व्यवस्था या केंद्रांत केलेली असते.

तेल साठविण्याच्या टाक्या पोलादी असतात. मोठ्या टाक्या पोलादी पत्रे वितळजोडकाम (वेल्डिंग) करून एकत्र जोडून बनविलेल्या असतात व सामान्यत: त्या उभ्या असतात.टाक्या जमिनीवर बसविण्यापूर्वी वाळू व बिट्युमेन यांचे मिश्रण करून त्यांच्यासाठी पाया बांधतात. गॅसोलिनासारखे बाष्पनशील द्रव साठविणाऱ्या टाक्यांचे छप्पर (झाकण) तरंगते असते. ते द्रवाच्या पातळीनुसार खालीवर होते. शिवाय अशा टाक्या पोलादी असल्यामुळे त्यांना आग लागण्याची शक्यता कमी असते. हिमवृष्टी होणाऱ्या प्रदेशात टाक्यांचे छप्पर तरंगते न बांधता शंकूच्या आकाराचे बांधतात त्यामुळे त्यावर हिम साचून राहत नाही. उन्हाळ्यात टाक्या गार ठेवण्यासाठी त्यांच्यावर पाणी शिंपडावे लागते. तेलाच्या टाक्यांच्या आसपास अग्निशामक व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असते. तेल तात्पुरते साठविण्याच्या टाक्या कित्येकदा आडव्या असतात. सर्व प्रकारच्या टाक्यांत तेलाचे नमुने वारंवार तपासण्याची व त्यात तेल किती आहे हे मोजण्याची व्यवस्था असते. टाकीतील तेलाचे मापन कित्येकदा स्वयंचलित यंत्राने किंवा दूर नियंत्रण पद्धतींनीही करतात. जास्त बाष्पदाब असणारे पदार्थ (उदा., द्रवीकृत खनिज तेल वायू) साठविण्यासाठी गोल आकाराच्या टाक्या वापरतात. या टाक्या जास्त बाष्पदाब सहन करू शकतात. निरनिराळ्या प्रकारांच्या टाक्यांमध्ये किती अंतर असावे यासाठी स्फोटक पदार्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संचालनालयाने नियम ठरवून दिलेले असतात. टाकीत असणारे तेल कशा प्रकारे मोजावे, त्याची तपासणी कशी करावी यांसंबंधी जागतिक खनिज तेल संस्थेने नियम आणि पद्धती ठरवून दिलेल्या आहेत. तसेच टाक्यांजवळ वितळजोडकाम कसे करावे, अग्निशामक व्यवस्था कुठे व कशी करावी इ. सुरक्षिततेचे नियमही ठरवून दिलेले आहेत. खनिज तेल, गॅसोलीन, केरोसीन इ. पदार्थ साठविण्याच्या बऱ्याचशा टाक्या जमिनीखाली बांधलेल्या असतात. कित्येकदा निरुपयोगी खाणी व नैसर्गिक गुहा खनिज तेल व वायू साठविण्यासाठी वापरतात. अमेरिकेत व यूरोपातील काही देशांत भूपृष्ठाखाली साधारण खोल जागी असणाऱ्या खडकांतील संरचनात्मक सापळ्यांत आणि भिंगाच्या आकाराच्या वालुकाश्मात नैसर्गिक वायू ठराविक दाबाखाली साठवून ठेवतात. इ.स. १९७० च्या सुमारास प्लॅस्टिकसारख्या पदार्थांच्या प्रचंड टाक्या समुद्रात बुडवून त्यांत तेल साठविण्याचा अभिनव मार्ग शोधून काढण्यात आला आहे.

परिवहन

खनिज तेलाची क्षेत्रे, परिष्करण कारखाने व उत्पादांच्या बाजारपेठा एकमेकांपासून सामान्यत: दूर असतात. म्हणून तेल परिष्करण कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोटारी, आगगाड्या,पडाव,जहाजे यांसारख्या वाहनांचा व नळांचा वापर करतात. या सर्व साधनांमध्ये तेल वाहतुकीसाठी खास व्यवस्था करण्यात येते.खनिज तेलाची वाहतूक इतर कुठल्याही सामान्य इंधनाच्या वाहतुकीपेक्षा कमी खर्चाची असते. ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.त्यामुळे ज्या देशांत खनिज तेलाची कमतरता आहे, अशा देशांना तेलाचा पुरवठा करणे शक्य झाले आहे. तेल वाहतुकीचा सर्वांत स्वस्त मार्ग म्हणजे तेलाचे लांबच लांब नळ होत. त्याखालोखाल तेलवाहू जहाजांचा क्रमांक लागतो. कित्येकदा खनिज तेलाचे उत्पाद लहान मोठ्या टाक्या, डबे, पिपे यांत भरतात. उदा., द्रवीभूत खनिज तेल वायू लहान गोल टाक्यांत, केरोसीन व वंगणे डब्यांमध्ये किंवा पिंपामध्ये भरतात.

तेल वाहतुकीची सामान्य साधने

तेल वाहतुकीची सामान्य साधने पुढीलप्रमाणे आहेत.

नळ

खनिज तेल प्रवाही असल्यामुळे कुठल्याही प्रकारे घट होऊ न देता त्याची नळांतून वाहतूक करणे शक्य असते.तेलाच्या अनेक विहिरी तेलक्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तेल गोळा करणाऱ्या संग्रह स्थानकांना नळांनी जोडलेल्या असतात आणि तेथून तेल इतर नळांतून परिष्करण कारखान्यांकडे पोहोचविले जाते.तेलवाहू नळ मोठ्या व्यासाचे आणि खूप लांबीचे असतात. सु. एक मी. व्यासाच्या जवळजवळ सव्वा दोन हजार किमी. लांबीच्या नळांतून अमेरिकेतील टेक्सस, लुइझिअ‍ॅना व ओक्लाहोमा या राज्यांमधील तेलक्षेत्रांतून रोज अंदाजे चार लाख पिपे तेल अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या परिष्करण कारखान्याकडे वाहून नेण्यात येते.सौदी अरेबिया व इराक यांमधील तेलक्षेत्रांतील तेल वाळवंट पार करून सिरिया व लेबाननमधील बंदरापर्यंत नळांतून वाहून नेले जाते.सहारा वाळवंटातील तेलक्षेत्रांतील तेल भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सिरिया व अल्जीरिया या देशांत नळाने वाहून नेण्यात येते. नळाने वाहतूक करणे जरी स्वस्त असले, तरी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तेलाचा प्रवाह सतत चालू राहिला, तरच नळ बांधणीचा खर्च परवडतो. खर्चाच्या इतर प्रमुख बाबी म्हणजे नळाची किंमत, नळ टाकण्याचा खर्च, पंपकेंद्राची किंमत इ. होत. मोठ्या व्यासाचे नळ तेलाच्या वाहतुकीसाठी किफायतशीर ठरतात. परिष्करण कारखान्यातून नळ टाकून उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करतात. अशा वेळी एकाच नळातून निरनिराळ्या अंशांची उदा., केरोसीन, गॅसोलीन, डीझेल तेल इत्यादींची वाहतूक करतात. कित्येकदा दोन अंश एकमेकांत मिसळतात.परंतु नळातून वाहणाऱ्या एकूण उत्पादांच्या मानाने हे मिश्रण अत्यंत अल्प प्रमाणात असते. खनिज तेलाच्या उत्पादांचा खप ज्या भागात अतिशय असतो अशा भागात वरील प्रकारचे नळ टाकले जातात.

जहाज

परिष्करण कारखाना व तेलक्षेत्रे अथवा परिष्करण कारखाना व ग्राहक यांच्यामध्ये जर खूप अंतर असेल आणि त्यांच्यामध्ये समुद्र अथवा मोठा जलाशय असेल, तर तेलाच्या वाहतुकीसाठी जहाज वापरणे फायदेशीर ठरते. जहाज वाहतुकीचा एक विशेष फायदा म्हणजे त्यांच्या प्रवासाचा मार्ग बदलता येतो. तसेच जहाज सुटण्याची व माल पोहोचविण्याची बंदरे बदलता येतात.अमेरिकेत तेलवाहतुकीसाठी जहाजांचा वापर सु.१८८० साली सुरू झाला व आता तो जगात सर्वत्र होत आहे.अशी जहाजे निरनिराळ्या प्रकारची असतात, त्यांची क्षमता कित्येकशे टनांपासून एक लाख टनांपेक्षा अधिक असू शकते. जपानमध्ये तर तीन लाख टनांची प्रचंड तेलवाहू जहाजे बांधण्यात येत आहेत. लहान जहाजे देशांतर्गत वाहतुकीसाठी आणि मोठी जहाजे महासागरांतील वाहतुकीसाठी वापरली जातात. जगातील कित्येक देशांजवळ आपापल्या मालकीची तेलवाहू जहाजे आहेत, परंतु अर्ध्याहून अधिक जहाजे खाजगी मालकीची आहेत. काही जहाजमालक कायद्याचे व आर्थिक संरक्षण देणाऱ्या लायबीरिया, पनामा यांसारख्या देशांत जहाजांची नोंदणी करतात.अशा प्रकारची जहाजे सु.२० टक्के आहेत.

पडाव

देशातल्या देशात तेलवाहतुकीसाठी पडावांचा उपयोग करतात. यांमधून साधारणत: उत्पादांची वाहतूक अधिक प्रमाणात करतात.जहाजांच्या मानाने पडावांचा वेग कमी असतो.

रेल्वे वाघिणी

खनिज तेल व उत्पाद यांच्या अल्प अंतरावरील जलद वाहतुकीसाठी रेल्वे वाघिणींचा वापर करण्यात येतो. या वाघिणी तेल वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या गोलाकार टाक्या बांधून तयार केलेल्या असतात.

 

टाकीयुक्त ट्रक

(टँकर). या पद्धतीची वाहतूक १९५० पासून अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ लागली. ट्रकने सामान्यत: उत्पादांची वाहतूक करण्यात येते. भारतातही ही पद्धत प्रचलित आहे. डबे, पिपे, लहान टाक्या इत्यादींमध्ये खनिज तेल उत्पाद भरून साध्या ट्रकांतूनही त्यांची वाहतूक करतात.

भारतातील तेलाचे व उत्पादांचे नळ

तेलक्षेत्रातून परिष्करण कारखान्यात व परिष्करण कारखान्यातून बाजारपेठेत वाहतूक करण्यासाठी भारतात निरनिराळ्या भागांत नळ टाकण्यात आले आहेत. या कामासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९६५ साली स्वतंत्र नळ विभाग स्थापन केला. या विभागाने प्रथम गौहाती-सिलिगुडी उत्पादवाहक नळ आणि हल्डिया-बरौनी-कानपूर उत्पादवाहक नळ टाकले. भारतातील काही प्रमुख नळ प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत.

नहरकटिया-नूनमती-बरौनी खनिज तेल नळ

लांबी १,१५२ किमी., हा प्रकल्प ऑइल इंडिया लि. कंपनीने दोन टप्प्यांत पूर्ण केला.पहिल्यात नहरकटिया-मोरान-नूनमती या मार्गात १९६२ मध्ये नळ टाकण्यात आले; दुसऱ्यात नूनमती–बरौनी या मार्गात १९६४ मध्ये नळ टाकण्यात आले. या प्रकल्पाची प्राथमिक क्षमता दरवर्षी ३० लाख टन होती; ती नंतर ४० लाख टनांपर्यंत वाढविण्यात आली.

गौहाती-सिलिगुडी उत्पाद नळ

लांबी ४२६ किमी., या प्रकल्पासाठी सु. साडेसात कोटी रु. खर्च करण्यात आलेले आहेत. प्रकल्पाचे काम १९६६ अखेर सुरू करण्यात आले. या नळातून दरवर्षी सु. ५ लक्ष टन उत्पादाची वाहतूक होते.

हल्डिया-बरौनी-कानपूर उत्पाद नळ

लांबी १,१९२ किमी. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला.पहिल्यात बरौनी–कानपूर या मार्गावर आणि दुसऱ्यात बरौनी–हल्डिया या मार्गावर नळ टाकण्यात आले.

बरौनी-हल्डिया नळ

लांबी ५२५ किमी., या नळाने खनिज तेल आणि उत्पाद या दोहोंची वाहतूक करण्याची योजना आहे. बरौनीहून हल्डियास उत्पादाची वाहतूक होते व हल्डियाहून बरौनी येथे खनिज तेलाची वाहतूक होते. हल्डिया येथे तरंगते छप्पर असणाऱ्या ३,३५,००,००० लि. द्रव मावणाऱ्या दोन टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत.

बरौनी-कानपूर उत्पाद नळ

लांबी ६६८ किमी., हे नळ १९६६ मध्ये टाकण्यात आले.

कोयाली-अहमदाबाद उत्पाद नळ

लांबी ११५ किमी., हे नळ टाकण्याचे काम स्नाम या इटालियन कंपनीने केले. १९६५ पासून या नळांतून वाहतूक सुरू झाली.

अंकलेश्वर-कोयाली खनिज तेल नळ

लांबी ९५ किमी., या नळातून १९६५ पासून वाहतूक सुरू झाली.

कलोल-साबरमती खनिज तेल नळ

लांबी १५ किमी., या नळाचे काम १९६९ मध्ये पूर्ण झाले. यातून रोज सु.१,६०० टन तेल वाहून नेण्यात येते. साबरमतीहून तेल रेल्वे वाघिणीने कोयाली परिष्करण कारखान्यात नेण्यात येते.

लकवा-मोरान खनिज तेल नळ

लांबी १८ किमी. रुद्रसागर व लकवा क्षेत्रांतील तेल मोरान येथे नेण्यात येऊन तेथून ते नूनमती व बरौनी परिष्करण कारखान्यांपर्यंत नेण्यात येते.या नळाचे काम १९६८ मध्ये पूर्ण झाले.

कलोल-नवागाम-कोयाली खनिज तेल नळ

लांबी १३० किमी., नवागाम व कलोल या क्षेत्रांतील खनिज तेल कोयाली परिष्करण कारखान्यापर्यंत वाहून नेण्यात येते.

खंबायत-धुवरण वायू नळ

लांबी २५ किमी., या नळाचे काम १९६४ मध्ये पूर्ण झाले. खंबायत क्षेत्रातील वायू धुवरण औष्णिक विद्युत् केंद्रात नेण्यात येतो.

अंकलेश्वर-उतराण वायू नळ

लांबी ३७ किमी., अंकलेश्वर क्षेत्रातील वायू उतराण औष्णिक विद्युत् केंद्रात नेण्यात येतो. या नळाचे काम १९६५ मध्ये पूर्ण झाले.यातून रोज सु.३ लक्ष घ.मी. वायू पुरविला जातो.

अंकलेश्वर-बडोदे वायू नळ

लांबी ९५ किमी., या नळाचे काम १९६५ मध्ये पूर्ण झाले. या नळातून अंकलेश्वर क्षेत्रातील वायू बडोद्यातील गुजरात खत कारखाना व इतर उद्योगधंद्यांस पुरविला जातो.

राजबंध-दुर्गापूर नॅप्था नळ

द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या दुर्गापूर येथील टाक्यांत राजबंधहून नॅप्था वाहून नेण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हे नळ टाकले आहेत.

मथुरा येथील परिष्करण कारखान्यासाठी कच्छच्या आखातापासून ते मथुरेपर्यंत आयात कच्चे तेल पाठविण्याकरिता १,२२२ किमी. लांबीचे नळ टाकण्याची योजना आहे.

लेखक : र.पां.आगस्ते ; दि.रा.गाडेकर ; चं.स.टोणगावकर ;अ.ना.ठाकूर ; र.वि.जोशी, ;ह.कृ.जोशी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate