অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निसर्ग नियोजन- लोक सहभागाने: भाग ३ - जैवविविधता दस्तऐवजाचे स्थूल स्वरूप

निसर्ग नियोजन- लोक सहभागाने: भाग ३ - जैवविविधता दस्तऐवजाचे स्थूल स्वरूप

सर्वांगीण दृष्टि

हे निसर्गसंपत्तीच्या व्यवस्थापनाचे, नियोजनाचे काम सर्वांगीण होणे आवश्यक आहे. कारण याचा उद्देश केवळ निसर्गरक्षण, संगोपनच नाही तर त्या बरोबरीनेच निसर्गाशी जोडलेल्या पण आर्थिक विकासापासून वंचित राहीलेल्या लोकांचे जीवनमान उंचावणे असा आहे. शिवाय निसर्गसंगोपन म्हणजे एकसुरी सागवनाची किंवा निलगिरीची पैदास करणे असा नाही, तर लोकांच्या उपयोगी अशा आवळा, हिरडा, बेहडा, आंबे, जांभूळ, बोरी, बाभळी, अशा विविध जाती प्रजाती आणि इतर जीववैविध्याची जपणूक, संवर्धन करणे असा आहे. यासाठी जी आधारभूत माहिती गोळा करणे जरुरी आहे, तिचे अनेक पैलू असतील. भूभाग आणि जलभाग, जीवजाती, लोक आणि संस्था, त्यांचे ज्ञान, हितसंबध, उपक्रम, आणि व्यवस्थापन पद्धती. शिवाय हे सर्व विषय परस्परांशी जोडलेले आहेत. धनगरांचा मेंढयांशी व गवताळ कुरणांशी घनिष्ट संबध आहे. त्यांना मेंढ्यांच्या रोगांबद्धल ज्ञान असेल. तर बागायितदारांना आंब्यांच्या पारंपारिक जाती संभाळण्याबद्धल मिळणाऱ्या अनुदानाबद्धल कुतूहूल असेल. माहितीची मांडणी करताना हे वेगवेगळ्या घटकांच्यातील परस्परसंबध दाखवणेही आवश्यक आहे. सुदैवाने आधुनिक माहिती तंत्र ज्ञानाने जे “डेटाबेस“ रचले आहेत, त्यांच्यांत वेगवेगळे घटक व त्यांच्यांतील  संबध हे व्यवस्थित नोंदता येतात. लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक --पी बी आर- बनवताना या सुविधेचा व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे.

शिक्षण संस्थांची भागीदारी

अशी अष्टपैलू माहिती कोण संकलित करेल?  जैवविविधता कायद्याप्रमाणे ग्रामपंचायत-नगर पालिकांच्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची ही जबाबदारी आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक तत्वात ही जबाबदारी ग्रामसभेला दिली आहे. आणि त्यात मदत करायला ग्राम रोजगार सेवक नेमण्याची तरतूद आहे. आदिवासी व पारंपारिक वनवासियांच्या वनाधिकार कायद्याच्या नियमांनुसार ग्रामसभेने एक वनाधिकार सुकरीकरण समिती नेमून तिच्यातर्फे हे काम करावे. अशा रितीने हे काम अखेर लोकांनीच केले पाहिजे. हे पूर्ण योग्य आहे. परंतु ह्या कामाला साक्षरता, आकडे मोडीची सवय, नकाशे बनविण्याचे कौशल्य उपयुक्त ठरेल. तेव्हां ज्ञानसंपादन हेच ज्यांचे मुख्य काम आहे. अशा शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी ह्यात भाग घेणे समर्पक ठरेल. शाळा व महविद्यालयात पर्यावरण हा सक्तीचा अभ्यास विषय आहे. या अभ्यासाच्या संदर्भात अध्यापक व विद्यार्थी पीबीआरच्या कामाला सहजच हातभार लावू शकतील. रा.तु.म. नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातील पर्यावरणाचा अभ्यासक्रम म्हणून पीबीआर बनवण्यास अधिकृत मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनही हे काम सुरु होऊ शकेल.

तेव्हां जमेल त्या प्रमाणे ग्रामस्थ-नागरिक, शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था, संबंधित शासकीय अधिकारी या सर्वांनी जिथे ज्याला जास्त योगदान करणे शक्य आहे तिथे त्यांनी पुढाकार घेवून हे काम करणे  समयोचित आहे, सयुक्तिक ठरेल.

लवचिकता आणि प्रमाणबद्धता

आता प्रश्न असा की, या कामाला काय चैकट असावी, किती सक्तीची असावी? स्थल-कालानुरूप पीबीआरच्या स्वरूपात योग्य ते बदल करण्यास स्थानिक कार्यकर्त्यांना भरपूर वाव पाहिजे. पीबीआर म्हणजे कंटाळवाणा, ठराविक साच्याचा तक्ते भरण्याचा उपक्रम बनता कामा नये. त्यासाठी केवळ लेखी, किंवा केवळ संगणकीकृत माहिती वापरण्याची सक्ती नसावी, लोकगीतांचे कॅसेट, किंवा गावातील बीज बॅंंंक हेही पीबीआर उपक्रमाचे भाग असण्यास मुभा असावी.

हे जरी खरे आहे, तरी निदान एक पहिली खेळी म्हणून काहीतरी “प्रमाण वापरणे जरूर आहे. टोयोटा कंपनी सतत नवनवोन्मेषाबद्दल विख्यात आहे. कोणत्याही कामाचा श्रीगणेशा ते एक “प्रमाण“- स्टॅंडर्ड- ठरवून करतात. पण हे प्रमाण कायमचे नसते. ते त्या त्या वेळच्या अनुभावानुसार सर्वात सयुक्तिक पद्धती असते. अधिक चांगली पद्धती शोधून तिची चांगली परीक्षा होऊन, ती मान्य होईपर्यंत जुने प्रमाण वापरायचे असते. असे प्रमाण वापरून आपल्याला कोठे अडचणी आहेत. कोठे सुधारणा करता येईल हे समजावून घेता येते. त्या प्रमाणाच्या द्वारे आतापर्यंतच्या अनुभावाचा, ज्ञानाचा फायदा घेता येतो. याच दृष्टीकोनातुन आम्ही इथे एक प्रमाण सुचवत आहोत.

अभ्यास गट

या प्रमाणबद्ध कार्यक्रमाला अनेक अंगे-उपांगे आहेत. प्रथम म्हणजे अभ्यासगटाची रचना. हे काम कोणत्या तरी अभ्यासगटाच्या मार्फत करता येईल. ह्या गटात विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक समाजातील उत्साही युवक-युवती मुख्य भाग घेवू शकतील. हयांच्यासोबत जैवविविधतेच्या वेगवेगळ्या पैलूंबाबतची चांगली माहिती असलेल्या अनुभवी व्यक्ती काम करु शकतील. ह्यांच्यात नदी-माशांबद्धल जाणकार धिवर-भोई, पिकांच्या बेण्याबद्धल जाणकार शेतकरी, बांबूंबद्धल जाणकार बुरुड, मोहा-तेंडूबद्दल जाणकार वनोपज संग्रहक, असे विविध लोक असू शकतील. एखादे महाविद्यालयातील अथवा शाळेतील, विज्ञान - संगणकाचे जाणकार अध्यापक त्यांना मार्गदर्शन करू शकतील.

ही माहिती वेगवेगळ्या पातळीवर पळताळून पहायला पाहिजे. ह्यासाठी अभ्यासगटाचे स्थानिक सदस्य, स्थानिक नागरिक, वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ, संबंधित शासकीय अधिकारी, मदत करू शकतील. या खेरीज जीवजातींच्या स्थानिक नावांना वैज्ञानिक नावे जोडायला पाहिजेत. यासाठी विशेषज्ञांची मदत आवश्यक आहे.

संगणकाचे फायदे

काही अंशी तरी ठरीव पद्धतीची माहिती संगणकीकृत करण्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे यामुळे अनेक सुट्या सुट्या घटकांत गोळा केलल्या माहितीतून समग्र चित्र सहज उभे करता येते. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी ग्रामसभेतर्फे बनवण्याच्या योजनेचे उदाहरण घेऊ या. ही योजना रचताना अनेक पद्धतीची माहिती लागेल: (१) गावातील कुटुंबे, त्यांची रोजगाराबद्धलची गरज, त्यांना कोणत्या दिवसांत रोजगार हवा आहे? (२) गावाच्या आसमंतातला भूभाग, त्याची स्थिती, या भूभागाच्या वेगवेगळ्या तुकड्यांत संसाधनांच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम सयुक्तिक ठरतील? (३) गावाच्या आसमंतातली जीवसृष्टी, तिची स्थिती, वेगवेगळ्या जीवजातींना काय प्रकारचे भूभाग अनुकूल आहेत. जीवसृष्टीच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम समर्पक असतील?          (४)       रोजगार हमीचे पैसे वापरुन, कोणत्या कुटुंबांना केव्हा रोजगार पुरवता येईल, त्या रोजगारातून कोणत्या भूभागातून काय पद्धतीचे निसर्गसंगोपनाचे काम करता येईल?

उघडच, या माहितीच्या वेगवेगळ्या घटकांचे परस्परांशी दुवे आहेत. उदाहरणार्थ आपण विभिन्न भूभागांबद्दल, निरनिराळ्या जीवजातींबद्दल माहिती संकलित करु. ह्या माहितीचा समन्वय केल्यावर कोणत्या भूभागांत कोणत्या जीवजाती चांगल्या फोफावतात हे लक्षात येईल. मग परिस्थिती अनुकूल असूनही कोणत्या विशिष्ठ तुकड्यात कोणत्या जीवजाती कमी प्रमाणात आहेत हे ताडता येईल. तसेच गावासाठी गोळा केलेल्या माहितीचा इतर बाहेरच्या माहितीशीही संबंध जोडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, गावाच्या आसमंतात ज्या प्रकारची जमीन आहे, तिच्यावर काय पद्धतीने निवडलेल्या जीवजातींची लागवड करता येईल, ही माहिती शेतकी विद्यापीठाकडे अथवा बाईफसारख्या संस्थांकडे असेल. काही लिखित स्वरुपात असेल, काही संगणकीकृत डेटाबेसेसमधे असेल. तिची आपल्या गावातल्या माहितीला जोड देऊन, काय उपक्रम करावेत, ते कोणत्या दिवसात करणे समयोचित ठरेल, व त्यांसाठी काय पद्धतीचे मनुष्यबळ वापरावे लागेल, हे ठरवता येईल.

डेटा बेस

पारंपारिक पद्धतीने ही सगळी महिती ओळी-रकान्यांच्या तक्त्यांत गोळा केली जाते. त्यातील अनेक घटक वेगवेगळ्या तक्त्यात समाविष्ट केले जातात. उदाहरणार्थ, गावाच्या एका तक्त्यात भूभागाच्या वेगवेगळ्या  तुकड्यांत जमिनीची प्रत कशी आहे याची माहिती असेल. गावाच्या दुसऱ्या तक्त्यात विशिष्ट वनस्पती जाती कोण- कोणत्या तुकड्यांत आढळतात ही माहिती असेल. शेतकी विद्यापीठाच्या आणखी एका तक्त्यात विशिष्ट वनस्पतीजातींसाठी कोणत्या गुणधर्माची जमीन आवश्यक असते, ही माहिती सापडेल. ह्या तीनही तक्त्यांतील माहितीचा समन्वय केला, तर गावातील जमिनीच्या कोणत्या तुकड्यात जमिनीचे गुणधर्म अनुकूल असूनही एखादी विशिष्ट वनस्पती जात आढळत नाही हे पाहता येईल. मग ह्या वनस्पतीजातींची लागवड ह्या तुकडयात करावी, असे नियोजन करता येईल. असा माहितीचा समन्वय पारंपारिक तक्ते वापरुन करणे हे खूप किचकट काम असते. परंतु संगणकीकृत डेटाबेसात ते फटाक्कन करता येते.

अर्थात असा समन्वय सहज जमायचा असेल तर हवी ती माहिती काही तरी प्रमाणबद्ध पद्धतीने नोंदवणे उपयुक्त ठरते. यासाठी आपण एकूण समग्र माहिती समुच्चयात कोणते घटक अथवा वस्तु -तांत्रिक भाषेत, एन्टिटी’वापरणार आहोत,  आणि त्या वस्तूंचे काय परस्परसंबंध "रिलेशनशिप्स" आहेत ह्याची मांडणी करावी लागते. असे शेकडो घटक असू शकतील, त्यांचे सहस्रावधि परस्परसंबंध असू शकतील. याला काही मर्यादा नाही. पण आपल्या माहिती समुच्चयात आपण काही विशिष्ट प्रकारच्या "वस्तू" वापरणार असे ठरवले की त्यांबद्दल माहिती पद्धतशीर नोंदवली जाते. उदाहनार्थ, वनस्पतींच्या जाती घ्या. आपल्या डेटाबेसात ह्या वस्तू असतील. ह्या वस्तूंची वेगवेगळी निदर्शने- इन्स्टन्स असतील. जसे, आंबा व संत्रा ही वनस्पती जाती ह्या वस्तूची दोन विशिष्ट निदर्शने आहेत. ह्या प्रत्येकांचे काही गुणधर्म असतील.  उदाहरणार्थ नाव. तसेच, भाषा ह्या डेटाबेसमधील दुसऱ्या वस्तू असतील. मराठी, हिंदी व गोंडी ही भाषांची तीन निदर्शने आहेत. वनस्पती जाती आणि भाषा ह्या नावांच्या संदर्भात एकमेकांशी जोडलेल्या असतील. उदाहरणार्थ, आंबा ह्या विविक्षित वनस्पति जातीला मराठीत आंबा आणि गोंडीत मरका अशी नावे आहेत. शास्त्रीय नांव हा वनस्पतींचा आणखी एक गुणधर्म असेल. आंब्याचे शास्त्रीय नांव मॅन्जिफेरा इंडिका आहे. जगभर हेच प्रमाणीभूत असल्याने वेगवेगळ्या डेटाबेसांचा एकमेंकांशी सांधा जोडण्यात ह्यांचा फार उपयोग होतो. उदाहरणार्थ, म्हैसूरच्या अन्नतांत्रिकी अनुसंधान संस्थेने आंब्याची वेगवेगळी लोणची, पाक, मावे बनविण्याचा पद्धतींवर उत्तम डेटबेस बनविलेला आहे. आपल्याला आंब्याचे शास्त्रीय नांव माहित झाले की, ह्या डेटाबेसचा फायदा घेता येतो.

प्रमाणबद्ध माहिती गोळा करण्यासाठी डेटाबेसमध्ये काही तरतुदी केल्या जातात. नमुन्यादाखल गावाचे पिनकोड घ्या. हे सहा अंकांतच असावे अशी सक्ती आहे. त्यात कमी - जास्त आकडे अथवा अक्षर वापरले, तर संगणक ते अमान्य करेल. अभ्यासगटाच्या निदान एका तरी सदस्याचे नांव दिल्याशिवाय संगणक पुढील माहिती भरू देत नाही.  डेटाबेस भूभागाचे काही विशिष्ट प्रकार ओळखतो; जसे  जंगल, झाडोरा, माळरान, फळबाग, शेत, वस्ती, इत्यादि. जमिनीच्या वेगवेगळ्या तुकड्यांबद्दल माहिती भरताना या ठराविक, प्रमाणबद्ध यादीतील कोणत्या प्रकारचा तुकडा आहे, हे नमूद करण्यात येते.

या प्रमाणबद्ध डेटाबेसपुढे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करता येतात, आणि त्यांची उत्तरे आलेख, तक्ते, निबंध अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकतात. उदाहरणार्थ, रारोहयोला सादर करण्याची ग्रामसभेने बनवलेली योजना हे हव्या असलेल्या अहवालाचे स्वरूप असेल, तर जरूर असलेली माहिती डेटाबेसमध्ये भरली की, त्याचे हवे तसे संकलन करून असा अहवाल बनवता येईल. दुसऱ्या काही कामासाठी, उदाहरणार्थ जैवविविधता कायद्याच्या अंतर्गत लोकांचे औषधीज्ञान नोंदवण्यासाठी डेटाबेस वापरायचा असला तर त्यातील काही माहिती गोपनीय आहे, आणि केवळ विशिष्ट व्यक्तींना देता येईल अशीही तरतूद करता येते. या डेटाबेसचा एक भाग म्हणून छायाचित्रे, ध्वनिमुद्रणे, व्हिडियो क्लिप्सही अंतर्भूत करता येतात. उदाहरणार्थ रारोहयोचे जॉबकार्ड बनवायला रोजगार मागणाऱ्या व्यक्तीची छायाचित्रे डिजिटल कॉमेऱ्याद्वारा घेऊन ती डेटाबेसमध्ये ठेवता येतील,आणि डेटाबेसच्या माध्यमातून जॉबकार्डसाठीचे अर्ज सुलभरीत्या बनवता येतील.

लेखक- माधव गाडगीळ, विजय एदलाबादकर, निलेश हेडा, नलिनी रेखा, आणि देवाजी तोफा

स्त्रोत- निसर्ग नियोजन- लोक सहभागाने: जैवविविधता नोंदणीची कार्य पद्धती व माहिती व्यवस्था

अंतिम सुधारित : 8/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate