অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अबब.... पेलिकन

अबब.... पेलिकन

आज जगात यांच्या आठ उपजाती आढळतात आणि त्यातील काही उपजाती भारतातसुद्धा सहज दिसतात. काही ठिकाणी तर त्यांचे प्रजननही होते. यातील रोझी अथवा व्हाईट पेलिकन ही अतिशय देखणी जात आहे. यांचा प्रमुख रंग पांढराशुभ्र असतो. चोच लांब, मोठी आणि पिवळीधम्मक असते आणि तिच्या टोकाला निळा रंग असतो. चोचीच्या खालची झोळी आणि पायसुद्धा पिवळे असतात. यांच्या पिल्लांचा पंखांचा रंग मात्र तपकीरी असतो. यांच्यात नर मादीपेक्षा आकाराने, वजनाने बरेच मोठे असतात. नरांची सरासरी लांबी ५ ते ६ फुट असते तर वजन असते ९ ते १५ किलो. मादी ५ फुटांएवढी लांब असून तीचे वजन अंदाजे ५ ते ९ किलो एवढे असते. त्यांच्या पंखांचा विस्तार ९ ते १० फुट असतो. हे पेलिकन गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातसुद्धा आढळतात. यांच्या मासे पकडायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. हे पक्षी आकाराने जरी अवाढव्य असले तरी त्यांचे उड्डाण अतिशय सहज, जलद आणि वेगवान असते.

काही जातींना जेंव्हा वरती आकाशात उंच उडताना खाली पाण्यात मासे दिसतात तेंव्हा ते एखाद्या दगड पडल्यासारखा खाली सूर मारतात आणि त्या माश्याला बरोबर टिपतात. या पांढऱ्या पेलिकनची मासे मारायची पद्धत मात्र अगदी आपल्या कोळ्यांसारखी असते. १०/१२ पक्ष्यांचा एक थवा घोड्याच्या नालासारख्या आकारात सहज पोहत रहातात आणि सर्व जण एकाच वेळी खाली पाण्यात मान घालून मासे पकडायचा प्रयत्न करतात. यामुळे जरी एकाच्या चोचीतून मासा सटकला तरी तो दुसऱ्याच्या चोचीत सापडतोच आणि अर्धवर्तुळाकारामुळे त्या माश्यांना यांच्या तावडीतून सुटताही येत नाही. हे सगळे करताना यांच्या हालचाली एवढ्या नियंत्रीत आणि सुसंगत असतात की आपल्याला एखादी कवायतच बघत आहोत असेच वाटत रहाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आपापसातील सहजीवनाचे आणि समन्वयाचेही प्रत्यंतर येते. या मासे पकडण्यासाठी त्यांना त्यांच्या चोचीच्या खालची जी झोळी असते त्याचा खुप फायदा होतो. ह्या झोळीमध्ये चक्क २० लिटर पाणी मावू शकते. यांचा आकार मोठा असल्यामुळे त्यांना दिवसभरात खाणेसुद्धा भरपुर लागते.

एक पेलिकन दिवसाला सरासरी १.२ किलो मासे खातो. मासे हेच जरी त्यांचे प्रमुख खाणे असले तरी त्यांना बेडूक, खेकडे, इतर पक्ष्यांची अंडी हे सुद्धा चालते. सकाळच्या वेळात त्यांचा मासे मारण्याचा प्रमुख उद्योग असतो नंतर मात्र ते दिवसभर पाण्यावर संथपणे तरंगणे, पंख वाळवणे, पंखांची साफसफाई करणे यात वेळ घालवतात. बऱ्याच आधी मुंबईच्या "प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम" मधे पक्षी, प्राण्यांच्या दालनात ह्या पक्ष्याच्या अवाढव्य प्रतिकृतीला बघितले होते. अक्षरश: एखाद्या लहान होडक्याएवढे याचे मोठे शरीर असते. तोपर्यंत नैसर्गिक अवस्थेमधे काही पेलिकन बघण्याचा योग आला नव्हता. नंतर मात्र त्यांना बघण्याचा योग आला तोच मुळी त्यांच्या खास विणीच्या हंगामात, त्यांच्या घरट्यांच्या जागेवरच. मोठ्या झाडांवर अनेक जोडप्यांचा संसार त्यांच्या आकाराच्या साजेश्या मोठ्या काडाकुड्यांच्या घरट्यावर थाटला होता.

भलेमोठे पेलिकन त्यांच्या पिल्लांना त्यांच्या चोचीखालच्या झोळीतून मासे आणून आणून भरवत होते. त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा नसल्यामुळे त्यांचे छायाचित्रण त्यावेळी शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र गुजराथच्या नलसरोवर इथे किंवा राजस्थानच्या भरतपूरला हे पक्षी अनेक वेळेला बघितले. अतिशय मोठी आणि काहीसा बोजड वाटणारा पक्षी उडतो मात्र सफाईदार आणि सहज कारण यांच्या शरीरातील हाडांत हवा असते. यावर्षी वेलावदारच्या जंगलात काळविटांचे छायाचित्रण करण्यासाठी जात असताना अगदी भावनगरच्या महामार्गावर मला चक्क रेल्वेलाईनच्या आजूबाजूला असलेल्या पाण्यावर यांचा मोठा थवा दिसला. वरून महामार्ग जात होता तर खालून थोड्या उजवीकडून रेल्वेमार्ग जात होता आणि त्याने ती पाणथळ जागा विभागली गेली होती. तरीसुद्धा त्या जागी जवळपास १५० पेलिकनचा मोठा थवा इतर पक्ष्यांच्या जोडीने स्वच्छंदपणे बागडत होता. दुपारच्या उन्हात त्यांचा पांढरा, पिवळा रंग छान चमकत होता आणि त्यामुळे छायाचित्रणात पण मजा येत होती. याच कारणासाठी मग मी वेलावदारहून परत येतानासुद्धा त्याच जागी परत भेट दिली.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 2/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate