অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एमू

एमू

पक्षिवर्गाच्या कॅझुअ‍ॅरिफॉर्मिस गणातील ड्रोमेइडी कुलातला फक्त एमू हाच पक्षी अस्तित्त्वात असून बाकीचे लुप्त झालेले आहेत. याचे शास्त्रीय नावड्रोमेयस नोव्हीहॉलँडिई आहे. या पक्ष्याचे वसतिस्थान ऑस्ट्रेलिया असून उघड्या मैदानी प्रदेशात तो राहतो. याचे लहान कळप असतात आणि बहुधा एका कुटुंबातले पक्षी एका कळपात असतात. ऑस्ट्रेलियात आढळणार्‍या कॅसोवेरी पक्ष्याचा एमू नातेवाईक आहे.

शहामृगाच्या खालोखाल हा सगळ्यांत मोठा पक्षी आहे. याची उंची १.५-१.८ मी. असते. डोक्यावर आणि मानेच्या वरच्या भागावर केसांसारखी दिसणारी विरळ पिसे असतात. पिसारा तपकिरी किंवा तपकिरी छटा असलेल्या काळ्या रंगाचा असतो. पिसे केसांसारखी असून प्रत्येक पीस दुहेरी असते. शेपटी नसते. पंखांमधील हाडांचा ऱ्हास झालेला असतो; पंखांचे फक्त अवशेष असतात. म्हणून या पक्ष्याला मुळीच उडता येत नाही.

याचे पाय मजबूत असून त्यांवर पुढे फक्त तीन बोटे असतात. याला जरी उडता येत नाही, तरी तो ताशी सु. ५० किमी. वेगाने धावू शकतो. तो उत्तम पोहोणाराही आहे. स्वसंरक्षणाकरिता तो आपल्या पायांचा उपयोग करतो. त्याच्या लाथेचा तडाखा इतका जबर असतो की, त्यामुळे मोठाल्या जखमा होतात.

गवत, रानफळे, वनस्पतींची मुळे, कोवळी पाने आणि किडे हे याचे नेहमीचे खाद्य आहे, पण याच्या खाद्यपदार्थांत पुष्कळदा इतकी विविधता आढळून आली आहे की, याला सर्वभक्षी म्हणता येईल.

एमू दोन वर्षांचा झाला म्हणजे त्याला लैंगिक पक्वता प्राप्त होते. नर आणि मादी यांत बाह्यतः फारसा फरक नसतो, पण त्यांच्या आवाजात मात्र फरक असतो. नराचा आवाज म्हणजे लागोपाठ काढलेल्या कंठ्यस्वरांची एक मालिका असते, तर मादीचा आवाज खोल आणि घुमणारा किंवा दुमदुमणारा असतो. नरमादीची जोडी जन्मभर टिकते. यांच्या विणीचा हंगाम एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असतो. या काळात झाडाझुडपांखाली एक उथळ खळगा खणून त्यात गवत, पाचोळा इ. दाबून बसवून नर घरटे तयार करतो. मादी त्यात एका दिवसाआड एक याप्रमाणे ७ ते ९ अंडी घालते. अंडे सु. १३ X १४ सेंमी. असून गर्द हिरव्या रंगाचे असते. अंडी उबविण्याचे काम नर करतो; या काळात जर मादी घरट्याकडे फिरकली तर नर तिला पिटाळून लावतो, असे म्हणतात. सु. ५८ ते ६१ दिवसांनी अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. त्यांचा रंग भुरा असून त्यांवर लांब काळे पट्टे असतात. त्यांच्या संगोपनाचे काम नरच करतो.

ऑस्ट्रेलियातील गोऱ्या वसाहतवाल्यांनी सुरुवातीला मांसाकरिता आणि नंतर पिकांची नासाडी करणारा म्हणून याची मोठ्या प्रमाणावर हत्या केली. यामुळे टॅस्मेनिया, किंग बेट आणि कांगारू बेट येथील एमूच्या जाती नामशेष झाल्या पण तद्देशीय सरकारने यांचा नाश करण्याकरिता अमलात आणलेल्या विविध योजना निष्फळ होऊन खुद्द ऑस्टेलियाच्या भूमीवर हे पक्षी अद्याप मोठ्या प्रमाणावर अस्तित्त्वात आहेत. १९३२ साली पश्चिम ऑस्ट्रेलियात पाठविलेल्या सैन्याच्या पथकालाही तेथील एमूंचा नाश करण्यात यश आले नाही.

लेखक : ज. नी कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate