অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किमानपक्षी...

किमानपक्षी...

“ गेल्या दहाबारा वर्षांपासून शहरांमधून चिमण्या गायब झाल्यात. त्या आता फक्त कवितेत आणि गाण्यांमध्येच उरल्यात...! आधुनिकीकरणाच्या रेट्यात चिमण्या दूर रानात, वनराईत निघून गेल्या; कारण मातीची अंघोळ करायला आसपास साधी माती, अंगण, पठारासारख्या मोकळ्या जागा या सार्‍या गोष्टी राहिल्या नाहीत. त्यांना हवी असलेली परिसंस्था, त्यांना अनुकूल असणारा अधिवास सिमेंटडांबराखाली चिरडला गेला आहे. प्रगती करताना ‘किमानपक्षी’ भूतमात्रांचा विचार नको का व्हायला?...”

अनेक पक्षी बालपणी आमचे सोबती होते. आम्ही बाळ असेपर्यंत ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा...’ म्हणत आई-आजीने आम्हांला भरवले, हे आम्हाला पक्के आठवतेय. त्या वेळी आमच्या अंगणात विविध पक्ष्यांचा तळ असायचा. आजीने चिऊकाऊची गोष्ट सांगितली, तेव्हा ‘चिमणीचं घर मेणाचं कसं? नि कावळ्याचं शेणाचं कसं?’ असे प्रश्न काही पडले नाहीत; कारण ‘थांब! माझ्या बाळाला अंघोळ घालू दे...’, ‘थांब! माझ्या बाळाला तीट लावू दे...’ असे म्हणत लबाड कावळ्याला टाळणार्‍या चिमणीची हुशारीच आम्हाला खूप आवडली होती; पण मग मोठे झाल्यावर ‘हे होऊ दे, ते होऊ दे’ असे म्हणत काहीबाही टाळणार्‍या, कामे पुढे ढकलणार्‍या आमचीच कधीकधी चिमणी कशी होते हे कळले. विनोदी लेखक कै. चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ने आम्हाला खूपच हसवले. ‘चिमणरावाचे चर्‍हाट’ नि ‘चिमणचारा’ इत्यादींची पारायणे केली आम्ही. ‘चिमणीकावळ्याचा संसार’, ‘चिमणीएवढे तोंड होणे’, ‘चिमखडी पोर’, ‘पोरांचा चिवचिवाट’, ‘चिमणीच्या दाताने तोडणे’, ‘पोपटपंची करणे’, ‘बक-ध्यान लावणे‘, ‘उल्लू बनवणे‘, ‘कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहतं काय?’ इत्यादी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार आम्हांला कळू लागले. ‘चिमणी-चिमणा’ हा शब्द ‘चिमुकले, छोटुकले’ या अर्थी वापरला जातो. आमच्या शेजारचे बाळ भारी रडके होते. आज्जीने घरातल्या रंगीबेरंगी, पण सुंदर चिंध्या भरून छानछान गब्दुल्या कापडी चिमण्या तयार केल्या. डोळ्यांच्या जागी मणी, तर चोचीच्या ठिकाणी काडीपेटीतल्या काड्या तोडून लावल्या. तार गोल करून त्याला लोकरीने त्या चिमण्या खालीवर लटकवल्या. ते ‘चिमणाळे’ त्या बाळाच्या पाळण्याच्या वर लावले. वार्‍यावर हलणारे ते ‘चिमणाळे’ पाहून बाळ हातपाय झाडून आनंदाने उसळू लागले. आजीच्या हातात अश्शी छान जादू होती.

आम्ही थोडे मोठे झालो आणि आम्हाला पाचवीपासून इंग्रजी भाषा शिकवायला सुरुवात झाली. प्रत्येक इंग्लिश शब्दासाठीचा मराठी प्रतिशब्द शोधायचा किंवा मराठी शब्दाचा इंग्लिश शब्द हुडकायचा असा आम्ही सपाटाच लावला. मग आम्ही मराठीचे इंग्लिश भाषांतर व इंग्लिशचे मराठी भाषांतर करण्याचा चंगच बांधला. मग काय? आठवीत गेल्यावर शाळेच्या नियतकालिकाचे संपादकपद आमच्याकडेच चालून आले. एकदा आम्हाला ‘त्यांनी किमानपक्षी दुसरी बाजू ऐकून तरी घ्यायला पाहिजे.’ ह्या वाक्याचे इंग्लिश रूपांतर करायचे होते. ते वाक्य इंग्रजीतून आम्ही ‘They should hear the second side of the minimum bird.’ असे लिहिले. ‘किमान पक्षी’ या शब्दाचे ‘minimum bird’ हे आम्ही केलेले भाषांतर वाचून सरांना हसू आवरेना. आमचा हा भाषिक पराक्रम सगळ्या वर्गाला कळला. सगळी मुले खो-खो हसू लागली. सर्व मित्रमैत्रिणी आम्हाला ‘minimum bird’ असे संबोधू लागले. ते आमचे टोपणनावच झाले.

गेल्या दहाबारा वर्षांपासून शहरांमधून चिमण्या गायब झाल्यात. त्या आता फक्त कवितेत आणि गाण्यांमध्येच उरल्यात...! आधुनिकीकरणाच्या रेट्यात चिमण्या दूर रानात, वनराईत निघून गेल्या; कारण मातीची अंघोळ करायला आसपास साधी माती, अंगण, पठारासारख्या मोकळ्या जागा या सार्‍या गोष्टी राहिल्या नाहीत. त्यांना हवी असलेली परिसंस्था, त्यांना अनुकूल असणारा अधिवास सिमेंटडांबराखाली चिरडला गेला आहे. प्रगती करताना ‘किमानपक्षी’ भूतमात्रांचा विचार नको का व्हायला? महानगरातील काही पर्यावरणप्रेमी माणसांनी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवली आणि ती झाडांवर, घराच्या खिडक्यागॅलर्‍यांना टांगली. काही पक्षी फिरकले, काहींनी त्याकडे पाठ फिरवली.

चिमणीसोबतच कावळा हा पक्षी अनेक ठिकाणी भेटत राहतो. चिमणीच्या कथेतला कावळा आपले शेणाचे घर वाहून गेल्यावरही भाव खात राहतो. त्याला एकच डोळा असतो. हा एकाक्ष! तो डोळा (बुब्बुळ) कसे फिरवतो हे पाहण्यासाठी आम्ही तासन्तास बागेतल्या सीताफळाच्या झाडाखाली बसून राहत असू. मान वाकडी करून ‘काऽव काऽऽव’ असे ओरडत असतानाच मधूनच तो डोळा फिरवतो हे पाहून गंमत वाटत असे. एका मैत्रिणीच्या आज्जीलाही एकच डोळा होता. तिचा दुसरा डोळा सुरकुतून मिटूनच गेलेला होता हे जवळून पाहिल्यावर दिसले. ती आज्जीही कावळ्याप्रमाणे डोळा फिरवते का ह्याचं निरीक्षण करायला आम्ही गेलो, तर त्या आज्जीच्या अंगणात एक कावळा ‘काऽव काऽऽव’ असे मोठ्याने ओरडत होता. ओरडताना शेपटीसह त्याचे सारे अंग हालत होते. आपल्या एका डोळ्याने कावळ्याकडे प्रेमाने बघत ती आज्जी म्हणाली, “माहीत आहे रे काऊऽ आज येणारेत पाहुणे.” मग तिने त्या ‘निरोप्या’ला पोळीचे तुकडे दिले. झाला प्रकार आम्ही आमच्या आज्जीला सांगितला, तर आज्जीने ज्ञानेश्वरमाउलींचा अभंगच गाऊन दाखवला - ‘पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये, सांगताहे’. कावळा ओरडल्यावर पाहुणे येतात म्हणे, ज्ञानेश्वरमाउलींकडे ‘पाहुणे पंढरीराऊ’ येणार असल्याने त्यांना भारी आनंद झाला नि त्यांनी त्याला दहीभाताची उंडी देण्याचे कबूल केले आहे. कावळ्याचे ओरडणे आणि पाहुण्यांचे आगमन! जबरदस्त योगायोग! पण कित्येकदा आमच्या परसातल्या चिंचेच्या झाडावर बसून कावळे बेंबीपासून ओरडले, तरी पाहुणे आले नव्हते. फार क्वचित पाहुणे आले, नाही असे नाही; पण ते कधी एकदा जाताहेत असे आम्हाला झाले होते. आज्जीनेही कावळ्यांना आणि एकूणच पक्ष्यांना खायला देण्यासाठी छतावर एक ताटली ठेवली होती. गोग्रास घातल्याशिवाय आणि भूतमात्रांना मूठभर खाऊ घातल्याखेरीज आज्जीने कधीही तोंडात खास घेतला नाही. पुढे ‘कावळा म्हणे मी काळा... पांढराशुभ्र तो बगळा’ ही कविता भेटली! आपल्या काळ्या रंगाचा न्यूनगंड आल्याने आपले अंग दगडावर घासून-घासून पांढरे करणारा वेडपट कावळा अखेर मरून जातो. काळे असण्याचा न्यूनगंड हा माणसांमध्ये खूपच असतो, म्हणून तर माणसाने अशी कविता लिहिली. पक्ष्यांना रंगाचे काहीही वावडे नसते, कारण बहुतेक सर्व पक्षी रंगांधळे असतात. त्यांना काळा नि पांढरा एवढेच रंग दिसतात. एरवी हुश्शार असणार्‍या ह्या कावळ्याच्या घरट्यात धूर्त कोकिळा आपली अंडी ठेवते नि कावळाकावळी स्वतःचीच समजून ती अंडी उबवतात, त्याही पिल्लांना चारापाणी देतात, ही गोष्ट वाचली आणि कावळ्याच्या भोळसटपणाची गंमत वाटली. हळूहळू मोठे होणारे ते पिल्लू ‘कुहू कुहू’ असे बोबडे बोलू लागल्यावर तरी कावळ्याने जागे व्हावे ना? पण छे! संस्कृत सुभाषितकाराने मात्र वसंतसमय आल्यावर कावळा आणि कोकीळ यांच्यातला फरक सहजपणे कसा दिसतो हे दाखवले आहे-

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेदो काकपिकयो:।

वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ॥

कोकीळ हा काळाकुट्ट पक्षी आणि राखाडी भुर्‍या रंगाचे पट्टे असलेली त्याची मादी - कोकिळा! ही मंडळी त्यांच्या गुंजासारख्या लाल डोळ्यांमुळे शोभून दिसतात. Black is beautiful ही उक्ती अक्षरशः खरी आहे यांच्याबाबतीत. हाच कावळा मृत माणसाच्या पिंडाला शिवला की त्या आत्म्याला मुक्ती मिळते अशी रूढी, कल्पना आम्हाला कळली. आमची पणजी देवाघरी गेल्यावर दहाव्या दिवशी आम्ही नदीकाठी गेलो होतो. त्याला ‘दहावा’ असे म्हणतात हे आम्हाला त्या वेळी कळले. खरे तर आई आम्हाला तिथे न्यायला तयार नव्हती, पण आमचा हट्ट! (खरे कारण असे की, शेजारच्या वाडीतली बरीच बदके नदीत मुक्कामाला आल्याची बातमी मैत्रिणीने आम्हाला दिली होती.)

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचे अर्थही आम्हाला तेव्हा कळत नव्हते. पक्ष्यांच्या शकुन-अपशकुनाचे अनेक संदर्भ आम्हाला ठाऊक होते. घुबड दिसले की अपशकुन, भारद्वाज दिसला की दिवस चांगला जातो, कबुतर शांतीचे प्रतीक वगैरे आम्हाला ठाऊक होते. कबुतर म्हणजे पोस्टमनचा पुरातन अवतार हेही आम्ही वाचले होते, पण ते प्रेमाचेही प्रतीक असल्याचे चित्रपटांमुळे कळले. कबुतर मिळालेला खाऊ बकाबका खाऊन त्याचा चोथा आपल्या चोचीखालच्या पिशवीत साठवतो आणि मग तोच मऊमऊ खाऊ पिलांना भरवतो. त्याला ‘पिजन मिल्क’ असे म्हणतात असे आम्ही वाचले आणि ‘सगळ्या आया किती प्रेमळ असतात.’ हे कळले. ‘घार उडते आकाशी... लक्ष तिचे पिलापाशी’ हे संतवचनही आम्हाला आज्जीकडून कळले होते. आज्जीबरोबर भजनाला जाण्याचे कित्तीतरी फायदे झाले आहेत. त्यातलाच हा एक. दोन साळुंक्या दिसल्या, तर आम्ही बालपणी त्यांची चाफेकळी नि मधले बोट जोडून त्याने त्यांची पापी घेत असू. आजच्या भाषेत साळुंकीला आम्ही ‘फ्लाइंग किस’ देत असू. का? तर म्हणे गोड खायला मिळणार! ‘शुभशकुन’ हा शब्द तर ज्ञानेश्वरीत आल्याचे आज्जी सांगत होती. टिटवी ओरडली की मात्र अशुभ मानले जाते. तिचे ओरडणे म्हणजे एखाद्याच्या मृत्यूचा सांगावाच समजला जातो. बालपणी टिटवी ओरडली की आम्ही म्हणायचो, ‘टिटवे टिटवे, तू जर माझ्या घरावरून ओरडत गेलीस; तर तू तुझी पिल्ले मारून खाशील, तुझी जात नष्ट होईल...’ हा ‘मंत्र’ आम्हाला विठोबाच्या देवळात असणार्‍या एका पुजार्‍याने दिला होता. मंत्र कुठला? शापच होता तो! पण कुणाच्या शापाने मरायला टिटवी काही इतकी लेचीपेची नाही हे मोठे झाल्यावर कळले. शकुन-अपशकुन असले काहीही नसते हे आम्हाला आमच्या दादाने सांगितले. टिटवी अतिशय नाटकी असते. शत्रू हल्ला करतोय असे दिसले की ती मातीत मरून पडल्याचे नाटक करते. शत्रू भांबावतो, त्याचा वेग मंदावतो नि ही शहाणी लगेच उडून जाते- भुर्रर्रऽऽऽ! दादा आम्हाला असली माहिती सांगत असे. त्याने म्हणे ‘निळावंती पोथी’ वाचली होती. ‘निळावंतीची पोथी’ हे ‘मिथक’कथांचे गूढरम्य पुस्तक आहे. ते म्हणे माणसाला गुंतवून-गुंगवून टाकते. हळूहळू त्या माणसाला पक्ष्यांची भाषा कळू लागते म्हणे! आज्जीला मी त्या पोथीबद्दल सांगितले, तर ती म्हणाली, “कधीकधी तसले काही वाचले की माणसाला वेडसुद्धा लागते!” मग आम्ही तो नाद सोडून दिला. ‘किमानपक्षी’ आम्हास वेड लागू नये, म्हणून.

आमची दुपारची शाळा झाल्यावर आम्ही रेडिओ खूपच ऐकू लागलो. बाबांपासून चोरून रेडिओवरची किंवा कॅसेट्समधली गाणी आम्ही ऐकत असू व ती वहीत छानपैकी लिहून ठेवत असू. ‘नाच रे मोरा...’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा...’ अशा बालगीतांमधून काही पक्षी सामोरे आले. रेडिओवरच्या ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ ह्या गाण्यातला मनमोराचा पिसारा आमच्याही मनात फुलू लागला. ‘चिमणे चिमणे... घरटे बांधले... चिमण्या मैनेला’ असे म्हणत ‘चिमणी’ ह्या शब्दाची वारंवार योजना करून कवीने गाण्यात मजा आणल्याचे आम्हाला जाणवले. ‘चिमण्या मैनेला’ हे शब्द गमतीदार आहेत. मोरोपंतांची ‘केकावली’ आम्हाला वाचनपाठ म्हणून होती. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘चिऊताई, चिऊताई दार उघड...’ ह्या बोलगाण्याने नैराश्यावर मात करण्याचे बळ दिले खरे. ‘माझिया माहेरा जाऽ रे पाखरा...’ हे गाणे ऐकले. मात्र मला आमच्या शाळेतली आठवीतली नयना आठवली. आत्तेभावाशी तिचे लग्न ठरले होते, रिझल्टच्या दिवशी ती रडत होती. आता तिची भेट होणार नव्हती. बालविवाह तेव्हा सररास होत, आजही होतात. कायदा सगळीकडे पोहोचलेला नाही हेच खरे. मुलीला आईबाबांचे घर सोडून गेल्यावर किती घालमेल होत असेल? पाखराबरोबर माहेरी संदेश धाडण्याच्या कल्पनेने आम्हांला खूपच रडवले होते. ‘तुझी गं साळुंकी आहे बाई सुखी... सांगा पाखरांनो तिचिये कानी... एवढा निरोप माझा...’ ह्या ओळी ऐकून वाटले, आई आपल्या मुलीला ‘साळुंकी’ का म्हणत असेल? मग आले ध्यानात. साळुंक्या खूप बडबड्या असतात. खूपच टिवटिव चालू असते त्यांची. शिवाय डोळाभर काजळ घातल्यासारखे टपोरे-बोलके डोळे आणि पिवळी चोच यांमुळे ती सुंदर दिसते. गाण्यातली मुलगी तश्शीच असणार.

एकदा आमच्या दारावरून एका लग्नाची वरात चालली होती. ‘ससाणे-गरुड विवाह’ अशी पाटी लावली होती. आम्हांला हसूच आले. आमच्या वर्गात एका मुलाचे नाव होते - पोपट पारवे! कावळे, मोरे, राजहंस, घारे, साळुंके अशी आडनावे कशी पडली असतील असा विचार आमच्या मनात आला. तेवढ्यात बँडवाले कर्कशपणे ‘कुहू कुहू बोले कोयलिया...’ हे चित्रपटगीत वाजवू लागले. भर उन्हात, घामाने डबडबलेले सारे वर्‍हाडी नाचत होते. घोड्यावर बसलेला, सतत घाम टिपणारा, पागोटेधारी नवरा पाहून मला बिचार्‍याची दया आली. त्यानंतर एकाएकी ‘पंख होते तो उड आती रे, रसियाऽ ओऽऽ बालमा...’ या गाण्यावर घमासान नाच सुरू झाला. दुसर्‍याच क्षणी ‘दो हंसों का जोडा बिछड गयो रे...’ हे प्रसंगाला अनुचित गाणे वाजू लागले नि नर्तकनर्तिका एकाएकी दचकल्या. कोणीतरी बँडवाल्यांना सुचवले की ‘झिनचॅक’ गाणी लावा. त्यानुसार ‘एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना...’ हे भन्नाट गाणे ते वाजवू लागले आणि पुन्हा वर्‍हाडी मंडळी देहभान विसरून नाचू लागली. मुलीची पाठवणी करताना ‘झूट बोले कौआ काटे’ आणि ‘कबुतर जाऽ जाऽ जाऽऽ’ सुरू झाले. कोकीळ, हंस, तोतामैना, कावळा आणि कबुतर इत्यादी अनेक पक्ष्यांना गाण्यांमधून भेटताना सभोवताली चांगलेच ध्वनिप्रदूषण झाले. ध्वनिक्षेपकाच्या भिंतींनी नि प्रचंड डेसिबल्सच्या आवाजाने पक्ष्यांचे काय होत असेल? कानठळ्या बसवणार्‍या आवाजाला घाबरून ते लांबलांब जात असतील, दूर डोंगरदर्‍यांत; किंवा स्थलांतर करून जात असतील वेगळ्याच प्रदेशात, वेगळ्याच देशात. माणूस कधी शहाणा होणार? आम्हांला वाईट वाटले. मोठे झाल्यावर आम्ही प्राणिपक्ष्यांसाठी काहीतरी करू... हे नक्की.

सैबेरियातले हजारो पक्षी गुगल मॅपशिवाय हजारो मैलांचा प्रवास करून आपल्याकडे येतात. त्यांचा ‘भूगोल’ किती पक्का असेल ना? एकदा आम्ही दादाबरोबर ‘बर्डिंग’ करायला गेलो. खूप रम्य प्रकार असतो तो. सोलापूर रत्यावरच्या भिगवणच्या आसपासही परदेशी पाहुणे (पक्षी) येतात. ‘बर्ड रेसिंग’ म्हणजे पक्षी मोजणे, त्याची छायाचित्रे काढणे व नोंदी करणे; आम्ही खूप शिकलो त्यातून. आता आम्ही ट्विटरवर नुसती टिवटिव करत बसण्यापेक्षा पक्ष्यांसाठी भरपूर झाडे लावायचे ठरवले आहे.

आमच्या बागेत बुलबुलचे किंवा कबुतराचे घरटे नेहमी सापडते. ती कलाकृती आम्ही जपून ठेवतो. एकदा शेजारच्या मुलीने ती घरटी आम्हांला मागितली. तिला कारण विचारले; तर म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींनी वाढदिवसाला मला ‘लव्ह बर्ड्स’च्या दोन जोड्या दिल्या होत्या, पिंजर्‍यासकट; पण हे पक्षी काही दिवसांपासून मलूल झालेत. ही घरटी जर त्यांच्या पिंजर्‍यात ठेवली, तर त्यांना छान वाटेल.’ पक्ष्यांना पिंजर्‍यात डांबून ठेवल्याबद्दल, आम्हांला तिचा व तिला तशी भेट देणार्‍या मित्रमैत्रिणींचा रागच आला. वाटले की, कधी होणार ही माणसे पर्यावरणप्रेमी? माझा तर चक्क ‘अँग्री बर्ड’ झाला. होय! अँग्री बर्ड! कार्टूनमधल्या अँग्री बर्डप्रमाणे डोळे कपाळात खोचून आणि चोच-ओठ खाऊन तिच्यावर आक्रमण करावे, असे आम्हाला वाटले. अर्थात मुळातच आम्ही शहाणे, म्हणून भलते काही केले नाही. असो. आम्ही ती घरटी शेजारणीला देऊन टाकली. त्या ‘रेडिमेड’ घरट्याला सुरुवातीला बंदिवान पक्ष्यांनी झिडकारले. नंतर नाइलाजाने त्यांनी त्या घरट्यात छानशी अंडी दिली. आपली कुणा पक्ष्यांना मदत झाली हे समजल्याने बरे वाटले. ‘किमानपक्षी’ आम्ही पिंजर्‍यातल्या चिमुकल्या पक्ष्यांना सेकंड हँड का होईना... घर दिले होते. तिकडे रेडिओवर गाणे लागले होते, ‘आकाशी झेप घे रे पाखरा... तोडी सोन्याचा पिंजरा...’

...गाणे ऐकताना आमचे तोंड चिमणीएवढे झाले होते.

लेखक: आश्लेषा महाजन, पुणे

संपर्क : 9860387123

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate