অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोलांट्या मारणारा निलकंठ

कोलांट्या मारणारा निलकंठ

पावसाळा झाला आणि आपण जरा शहराबाहेर पडलो तर आपल्याला हा पक्षी हमखास रस्त्याच्या आजूबाजूला टेलीफोनच्या अथवा इतर तारांवर बसलेला दिसणार. गजबजलेल्या शहरात हा का दिसत नाही कोण जाणे ? पण जरा शहराची हद्द ओलांडली तर ह्याचे दर्शन नक्कीच होणार. वर्षाच्या इतर काळात हा न दिसण्याचे कारण म्हणजे हा स्थलांतरीत पक्षी आहे, पण याचे स्थलांतर स्थानीक असल्यामुळे हा पावसाळ्यानंतर लगेचच आणि अचूक येतो.

आपल्या महाराष्ट्रात म्हणे हा हिमालयातून येतो. याचा आकार साधारणत: लहान कबुतराएवढा असतो आणी तो असतो पण तसाच गुबगुबीत. याची चोच काळ्या रंगाची, पोट, गळा, मान पिवळसर तर पंखांचा रंग गडद निळा आणि टोकाला काळे पट्टे असतात. एकूण काय अनेक रंगाची नजाकतदार उधळणच याच्यावर आढळते. याचे नाव जरी "निलकंठ" असले तरी ह्याचा कंठ मात्र निळा नसतो त्यामुळे याला हे नाव का पडले हे कोडेच आहे. हा पक्षी बसलेला बघण्य़ापेक्षा उडतानाच बघावा, त्याच्या पंखांच्या अश्या काही मखमली निळ्या रंगछटा दिसतात की त्याला तोड नाही.

पिकांच्या ऐन हंगामात हा उत्तरेतून आपल्याकडे मुक्कामाला येतो.हा पिकावरचे किडे मोठ्या प्रमाणावर फस्त करतो. या शिवाय सरडे, सापसुरळ्या, पाली, सापसुद्धा याला आवडतात. जमिनीवर जरा हालचाल दिसली की याने हवेतून सूर मारलाच म्हणून समजा. याच कारणाकरता शेतकरीसुद्धा त्याला आपला मित्र समजतात आणि सहसा त्याची शिकार केली जात नाही. मार्च ते जुलै हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. झाडांच्या ढोलीत हा घरटी करताना आढळतो. प्रसंगी सुतार, घूबड यांनी वापरलेली आणो सोडून दिलेली घरटीसुद्धा ह्याला चालतात. या घरट्यात मादी करड्या रंगाची ४/५ अंडी घालते. अंड्यांचे आणि पिल्लांचे संगोपन दोघेही नर, मादी करतात. या काळात मादीचे मनोरंजन करण्यासाठी नर अगदी उंच जाउन, पंख पसरवून अगदी दणकन जमिनीवर आदळतो अशी कोलांटी मारतो आणि अगदी जमिनीच्या जवळ आला की सफाईने वर परत आकाशात उंच झेपावतो. अर्थातच अश्या कसरती केल्यामुळे बहुतेक मादी त्याच्याशी जोडी जमवत असावी. ह्या त्याच्या कोलांट्या उड्या मारण्यामुळेच त्यला इंग्रजीमध्ये "ईंडीयन रोलर बर्ड" असे किंवा "ब्लू जे" असेसुद्धा म्हणतात.

हा जरी आपल्याकडे गावाबाहेर आढळत असला तरी त्याचे छायाचित्रण तिथे व्यवस्थीत होत नाही, कारण एकतर तो कृत्रीम तारेवर बसलेला असतो आणि त्यातूनही जरा चाहूल लागली की तो पटकन उडून लांब जातो. माझ्या दृष्टीने तरी ह्याचे छायाचित्रण करण्यासाठी कान्हा, बांधवगड सारखे उत्तम जंगल नाही. ह्या जंगलात ते अतिशय निर्धास्तपणे रस्त्यावर, बाजूच्या फांदीवर बसलेले आढळतात. आपण जीपमधून फिरत असल्यामुळे आपलीसुधा उंची जास्त असते आणि मग यांचे छायाचित्रण सहज शक्य होते. बऱ्याच वेळेला तर आपण जीपमधून फिरताना हा अगदी जीपच्या समोर रस्त्यावर कोलांटी मारून उतरतो आणि आपला रस्ताच थांबवतो.

या वेळी त्याच्या पंखावरची निळ्या रंगाची झळाळी आणि रंगसंगती एवढी मोहक असते की त्याला डावलून तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. त्यातूनही तो तिकडून उडून जवळच्याच फांदीवर जाउन बसतो आणि मग तुम्हाला त्याचे "क्लोज अप" छायाचित्र मिळून जाते. मागे एका वर्षी कान्हाच्या जंगलात त्यांच्या विणीच्या हंगामाचा सर्वोत्त्म काळ होता. कारण प्रत्येक जागी, रस्त्यांवर त्यांच्या जोड्याच दिसत होत्या. नर मादीला सरडे पकडून आणून प्रेमाने भरवत होता, काही ठिकाणी तो कोलांट्या उड्या मारत होता तर काही ठिकाणी आम्हाला चक्क त्यांचे मिलनसुद्धा बघायला मिळाले.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate