অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गिधाडांचे महत्त्व आणि गिधाड- संवर्धनाचे प्रयत्न

गिधाडांचे महत्त्व आणि गिधाड- संवर्धनाचे प्रयत्न

“निसर्गात आढळणार्‍या प्रत्येक घटकाला मग तो लहान किडाकीटक असो, वनस्पती असो, अथवा प्राणी असो; प्रत्येकाला इथे काही-ना-काही विशेष कार्य सोपवलेले आहे. निसर्गसाखळीतील असा एखादा जरी दुवा नाहीसा झाला, तरी संपूर्ण निसर्गसाखळी कमकुवत होईल आणि असे होणे अतिशय धोकादायक ठरू शकते...”

आपला भारतीय उपखंड मोसमी पावसाचे आणि त्यासोबतच अतिशय संपन्न अशा निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश आहे. या संपन्न निसर्गाचे संगोपन होण्यासाठी आपल्या संस्कृतीत पशुपक्षी, वृक्ष यांना खास महत्त्व दिलेले आहे. अशाच सांस्कृतिक संचितातून रामायणात वानर, अस्वल, खार यांचे उल्लेख आलेले दिसतात. सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी प्राणपणाने लढलेल्या जटायू पक्ष्याचा उल्लेख रामायणात आलेला आहे. हा पक्षिराजा जटायू म्हणजे गिधाडांचा राजा!

गिधाड हा पक्षी गरुड या पक्ष्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान असतो, तरीही तो शिकार न करता प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून आपले पोट भरत असतो. त्यामुळे कासव व कावळा यांच्याप्रमाणेच गिधाड हा पक्षीसुद्धा ‘निसर्गातील सफाई कामगार’ म्हणून ओळखला जातो. हे सर्व जण कोणताही पगार वा बोनस न घेता, तसेच केव्हाही सुट्टी न घेता; निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे कामइमानेइतबारे करत असतात. मनुष्य असो वा इतर प्राणी, त्यांच्या मृतदेहांची योग्य रितीने विल्हेवाट लावणे फार महत्त्वाचे असते. अन्यथा, रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. प्राण्याच्या मृतदेहांची विल्हेवाट लावून रोगराई रोखण्याचे काम आजतागायत समर्थपणे करून या गिधाडांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. गिधाडांच्या या निसर्गॠणाचा उल्लेख ज्ञानेश्वर, तुकाराम अशा सर्वच संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये जागोजागी केल्याचे दिसून येतेे.

निसर्गात आढळणार्‍या प्रत्येक घटकाला मग तो लहानकिडा-कीटक असो वा वनस्पती अथवा प्राणी असो; प्रत्येकाला इथे काही ना काही विशेष कार्य सोपविलेले आहे. निसर्ग साखळीतील असा एखादा जरी दुवा नाहीसा झाला, तरी संपूर्ण निसर्ग साखळी कमकुवत होईल आणि असे होणे अतिशय धोकादायक ठरू शकते.

निसर्गाची साफसफाई करणारी गिधाडे आपण वर्षानुवर्षे पाहत होतो. मग अलीकडेच अचानक असे काय झाले की, शेकडोंच्या संख्येने दिसणारी ही गिधाडे नाहीशी झाली. 1990च्या दशकात ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध पशुवैद्यकीय उपचारासाठी वापरात आले. विशेषतः प्राण्यांच्या अवयवांवर आलेली सूज आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी हे औषध वापरले जात असे. त्या काळात इतर औषधांच्या तुलनेत ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध स्वस्त असल्याने ते खूप लोकप्रिय झाले. या औषधाच्या वापरातून प्राण्यांचे रोग बरे होत असले, तरी औषधातील अंश त्यांच्या शरीरभर पसरलेला असे. परिणामी, औषधाचा वापर केलेले जनावर मेल्यानंतर त्यांचे दूषित मांस खाणार्‍या गिधाडांच्या शरीरात या ‘डायक्लोफिनॅक’ औषधाचे विष जाऊ लागले आणि गिधाडांच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊन ती मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडू लागली. ‘पेरेग्रीन फंड, इंग्लंड’ आणि ‘ऑर्निथॉलॉजिकल सोसायटी ऑफ पाकिस्तान’ या संस्थांच्या संयुक्त अभ्यासात पाकिस्तानमध्ये सर्वप्रथम 2000 साली डायक्लोफिनॅकमुळे गिधाडे मृत्यूमुखी पडत असल्याचे पुरावे मृत गिधाडांच्या शवविच्छेदनात मिळाले. दक्षिणपूर्व आशियातील कंबोडिया, म्यानमार या देशात मात्र ‘डायक्लोफिनॅक’ऐवजी काही विषारी औषधे देऊन मारलेली जनावरे खाण्यात आल्याने गिधाडे मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. असे सांगितले जाते की, 1990च्या मध्यापर्यंत अंदाजे 90 टक्क्यांपेक्षा जास्त गिधाडे मृत्युमुखी पडली. ‘International Union for Conservation of Nature's’ या संस्थेकडून गिधाड हा पक्षी नष्टप्राय (Critically Endangered) म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

पूर्वी एखाद्या गावात मृत जनावर गावाबाहेर टाकल्यावर तिथे काही तासांतच शेकडोंच्या संख्येने गिधाडे उतरत असत. एकदोन तासांत सर्व काही सफाचाट करून टाकत. हेच काम भटकी कुत्री आणि जंगली जनावरेसुद्धा करतात; पण हे काम करण्याची त्यांची क्षमता गिधाडांच्या तुलनेत फारच कमी असते. याखेरीज हे मांस रोगयुक्त असले, तरी ते सहजासहजी पचवण्याची क्षमता फक्त गिधाडांमध्येच पाहायला मिळते. गिधाडे अतिशय उंचावर सतत घिरट्या घालत फिरत असतात आणि इतक्या उंचावरून या गिधाडांना रानात, माळावर पडलेल्या मृतदेहांचा पत्ता अचूकपणे लागतो आणि बघताबघता ती त्या ठिकाणी सर्वांत प्रथम हजर होतात.

आपल्याकडे प्रामुख्याने दोन प्रकारची गिधाडे आढळतात. एक म्हणजे ‘ओरियंटल व्हाइट बॅक’ - पांढर्‍या पाठीची गिधाडे आणि दुसरी ‘इंडियन’ किंवा ‘लाँगबिल्ड’ - लांब चोचीची गिधाडे. पांढर्‍या पाठीची गिधाडे झाडांवर, तर लांब चोचीची गिधाडे उंच डोंगरकड्यांवर खोबणीत आपली घरटी करतात. दोन्ही प्रकारची गिधाडे एखाद्या मृतदेहावर उतरतात आणि इतके जास्त प्रमाणात खातात की, त्यांना पटकन उडणेसुद्धा कठीण होऊन बसते. मग ती आपले पंख पसरून त्यांना साफ करत उन्हात बसून राहतात. गावात राहणार्‍या वयस्कर लोकांनी त्यांच्या तरुणपणी या सगळ्याचा अनुभव नक्कीच घेतला असेल; पण आता गिधाडे दिसेनाशी झाल्यावर आजच्या आणि भावी पिढीला हे सर्व अज्ञातच असणार आहे. फक्त टी.व्ही.वरच्या एखाद्या माहितीपटातूनच या गोष्टी त्यांना पाहायला मिळतात, मिळतील.

1992मध्ये स्थापन झालेली ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ ही आमची संस्था प्रामुख्याने कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्ट्यांवर व त्यांच्या आंतरभागात काम करते. संस्थेची सुरुवातच मुळात पक्षी, प्राणी, वनस्पती यांचा अभ्यास; त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यांसाठी झाली. सुरुवातीच्या काळात आम्ही कोकण किनारपट्टीवरील पांढर्‍या पोटाचा समुद्री गरुड आणि ऑलिव्ह रिडले समुद्री कासव यांवर काम सुरू केले. हे काम करताना या भागात आकाशात घिरट्या घालणारी गिधाडे फार क्वचितच दिसायची. त्याबाबत आणखी निरीक्षण केल्यानंतर लक्षात आले की, या भागात गिधाडे आणि त्यांची वसतिस्थाने फार कुठे आढळत नाहीत. साहजिकच, गिधाडांचे संरक्षण व संवर्धन उपक्रम राबवण्याचा निर्णय संस्थेकडून घेण्यात आला. त्यानुसार, सुरुवातीला गिधाडांच्या वसतिस्थानांची शोधमोहीम सुरू झाली. 2003मध्ये दापोली तालुक्यात मुरुड व आंजर्ला या गावांत नारळांच्या झाडांवर पांढर्‍या पाठीच्या गिधाडांच्या दोन वसाहती असल्याचे आम्हांला आढळून आले. याच भागात एकदोन ठिकाणी सड्यावर (डोंगरावरच्या उघड्या माळरानाच्या भागावर) टाकलेल्या मृत गुरांना खाण्यासाठी गिधाडे येत असत. यांत लांब चोचीची गिधाडेसुद्धा असायची. या ठिकाणांना सातत्याने भेटी देऊन आम्ही माहिती जमवायला सुरुवात केली. चिपळूण-आंजर्ला हे अंतर 80 कि.मी. आहे. त्यामुळे रोज प्रत्यक्ष भेट देणे शक्य नव्हते, मग तिथल्या स्थानिक तरुणांना या गिधाडांच्या सर्वेक्षणाचे काम समजावून सांगितले. आणि त्यांच्या सहकार्याने काम सुरू केले.

दरम्यान 2006 साली ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध जनावरांच्या उपचारासाठी वापरण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली. काही पर्यायी औषधेदेखील बाजारात आली होती. मग गावागावांत त्याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रके वाटून, ग्रामसभा घेऊन, चर्चासत्रे आयोजित करून जनजागरणाचे कामही जोरात सुरू झाले. संपूर्ण दापोली तालुक्यातील औषधांची दुकाने, जनावरांचे डॉक्टर, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना ‘डायक्लोफिनॅक’चे दुष्परिणाम समजावून सांगून पर्यायी औषध वापरण्यास सांगितले. पुढे संपूर्ण कोकणातील सर्व औषध दुकानदारांशी व डॉक्टरांशी संपर्क साधून ही मोहीम पूर्ण केली. या सर्व कामात वन विभागाचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत होते.

यानंतर आम्ही आंजर्ला इथे गिधाडांच्या वसाहती असलेल्या ठिकाणी, विशेषतः एका गिधाडाच्या घरट्याजवळ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा लावला. त्याचे कनेक्शन जवळच्या एका घरातील टीव्हीला देण्यात आले. घरट्यात प्रत्यक्ष काय घडते याबाबतचे फुटेज टीव्हीवर पाहून निरीक्षण करण्यात येऊ लागले आणि घरट्यात होणार्‍या दिवसभरातील घडामोडींच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. या निरीक्षणातून एक विलक्षण गोष्ट निदर्शनास आली होती. गिधाडाची जोडी घरट्यात अंडे न घालताच त्या जागी आलटूनपालटून अंडी उबवण्याच्या कामासाठी बसत होती, पक्षिअभ्यासात ह्या प्रकाराला खोटी उबवणूक (Fauls Incubation) असे म्हटले जाते. यात अंडे न घालताच ते उबवण्याची ऊर्मी तिथे सतत बसून पूर्ण केली जाते. बरेचसे पक्षी दुष्काळाच्या प्रसंगी अन्नपुरवठा होत नसला की अंडी घालत नाहीत किंवा अंडी घालतात, पण न उबवताच सोडून देतात.

या गिधाडांना पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्याने असे केले जात असावे असा आमचा कयास होता. कारण मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात ‘संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना’अंतर्गत जे कार्यक्रम हाती घेतले गेले, त्यात गावात मृत होणारी जनावरे जमिनीत पुरून टाकण्याची पद्धत सुरू करण्यात आली होती. याचा परिणाम गाव स्वच्छ होण्यात झाला, मात्र त्यामुळे परिसरातील गिधाडांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला; म्हणूनच गिधाडांना खाद्य उपलब्ध करून द्यायचे असे आम्ही ठरवले.

यासाठी आंजर्ला परिसरातील 50 ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्यात आला. ग्रामस्थांनी त्यांच्या गावातील मृत जनावरे आमच्या माणसांच्या ताब्यात द्यावी असे आवाहन गावागावांत रिक्षा फिरवून, पत्रके वाटून ग्रामस्थांना केले. गावात जर एखादे जनावर मृत झाले, तर ते ताब्यात घेऊन आंजर्ला येथे आणण्यासाठी एका स्थानिक माणसाची व्यवस्था त्या-त्या गावात केली. तो माणूस ते मृत जनावर टेंपोमध्ये टाकून घेऊन येत असे आणि आंजर्लाच्या सड्यावर गिधाडांसाठी खाद्य म्हणून आणून टाकत असे. या ठिकाणी लोखंडी तारांचे कुंपण घालून 100x20x4 फूट आकाराची जागा संरक्षित केलेली होती. उद्देश हा की, तिथे फक्त गिधाडे उतरतील आणि स्थानिक कुत्री, जंगली जनावरे तेथे पोहोचू शकणार नाहीत.

आम्ही या गिधाडांना खाद्य पुरवल्याचे चांगले परिणाम दिसू लागले. गावागावात मृत पावणारी जनावरे गिधाडांसाठी द्यावीत या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. दर आठवड्यात एकदोन मृत जनावरे या गिधाड खाद्यकेंद्रात पोहोचायला लागली. त्या वीणहंगामात एकूण 40 मृत जनावरे खाद्य म्हणून गिधाडांना उपलब्ध झाली. दुसर्‍या वर्षीच्या वीणहंगामात आदल्या वर्षीप्रमाणे खोटी उबवणूक न करता प्रत्यक्ष अंडी घालून काही पिल्लांचा जन्म झाला आणि ती यशस्वीपणे मोठी होऊन कळपात सामील झालेली दिसून आली. पुढील दोन वर्षांतले चांगले परिणाम म्हणजे खोटी उबवणूक करणार्‍या गिधाडपक्ष्यांचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत कमी झाले होते, तर घरट्यातून पिल्ले मोठी होऊन उडून जाण्याचे प्रमाण 16 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढले.

गिधाडांचे घरटे असणारे नारळाचे झाड, तसेच त्याच्या आसपासची झाडे गिधाडांच्या वास्तव्यामुळे, त्यांच्या हालचालींमुळे, तसेच त्यांची अतिउष्ण विष्ठा झाडांवर पडल्यामुळे मृत्युपंथाला लागतात. अर्थात, त्या झाडांच्या नारळांच्या उत्पादनाला झाडाचा मालक मुकतो. त्यामुळे नारळ बागमालकांचा या गिधाडांना तेथून हुसकावून लावण्याचा आणि त्यांची झाडावरील घरटी पाडून टाकण्याचा प्रयत्न असतो. हे रोखले जावे यासाठी गिधाडांमुळे होणार्‍या नारळांच्या झाडांची नुकसानभरपाई महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य असलेले भाऊ काटदरे यांनी वन विभागाकडून नारळ बागमालकांना मिळवून दिली. जेणेकरून, या गिधाडांच्या वास्तव्याला विरोध होणार नाही. त्याचबरोबर गेल्या चारपाच वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून नारळमालकांना सातत्याने आर्थिक मदतही केली जात आहे.     अनेक वेळा पंखांत पूर्ण ताकद येण्यापूर्वीच गिधाडांची पिल्ले भरारी घेतात आणि खाली पडून जखमी होतात. अशा पिल्लांसाठी स्थानिक लोकांच्या आणि वन विभागाच्या सहकार्यातून आम्ही सातत्याने गिधाडांच्या वेगवेगळ्या वीणवसाहतींमध्ये अशी एक व्यवस्था उभारत असतो, ज्यातून गिधाडांच्या जखमी पिल्लांवर औषधोपचार करता येतील आणि ते आकाशात व्यवस्थित भरारी घेऊ शकतील इतपत त्यांचे संगोपन केले जाईल.

आजमितीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये गिधाडसंवर्धनाचे आमचे कार्य सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विहाली; तर रायगडमध्ये नाणेमाची, करनवडी, पाटणूस येथे लांब चोचीच्या गिधाडांच्या; आणि श्रीवर्धन, चिरगाव येथे पांढर्‍या पाठीच्या गिधाडांच्या वीणवसाहती आहेत. इथे सर्व मिळून 70 ते 80 घरटी प्रतिवर्षी होत असतात असे दिसून आले आहे.

गेल्या दहाबारा वर्षांत या पक्ष्यांसाठी केलेल्या संरक्षण, संवर्धन मोहिमेनंतर या पक्ष्यांची सद्यःस्थिती खूपशी सुधारलेली नसली; तरी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश मिळाले आहे असे म्हणता येईल. त्यांची संख्या सध्या स्थिर आहे, मात्र निसर्गचक्राच्या साखळीतील हा एक महत्त्वाचा दुवा नामशेष होण्यापासून वाचवणे ही पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे. आणि याची जाणीव संपूर्ण मानवजातीने ठेवणे आवश्यक आहे.

लेखक: विजय महाबळ, सदस्य, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, जि. रत्नागिरी

संपर्क:09423049203

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 3/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate