অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुरेवाला सर्पगरूड

तुरेवाला सर्पगरूड

तुरेवाला सर्पगरूड

एखाद्या दाट जंगलात गेलो की हा गरूड आपल्याला आकाशात तरळताना सहज दिसतो. अगदी दिसला जरी नाही तरी याचा जोरदार आवाज तर आपण सहज ओळखू शकतो. हा आहे तुरेवाला सर्पगरूड किंवा क्रेस्टेड सर्पंट ईगल. संथ तरळताना हा कर्कश्य ३/४ लांबलचक शिट्या मारतो. या गरूडाचा वरचा रंग गडद तपकीरी असतो.

डोक्यावर डौलदार काळा तुरा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. सहसा ह्या तुऱ्याची पिसे मानेवर पडलेली असतात. पण आक्रमक झाल्यावर तो तुरा फुलवलेला पण दिसू शकतो. ह्याच्या पोटाकडचा रंग एकदम फिकट बदामी असतो आणि त्यावर आकर्षक पांढऱ्या गोळ्यागोळ्यांची नक्षी असते. उडताना याच्या शेपटीवर पांढरी पट्टी अगदी उठून दिसते आणि उडता उडता याला ओळखायला पण सोपी ठरते. गरूड म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जर भला मोठा, अवाढव्य पक्षी येत असेल तर ते चुक आहे. विष्णू देवाचे वाहन गरूड आहे म्हणून खरे तर आपण असा समज करून घेतला असेल. पण हा तुरेवाला सर्पगरूड जेमतेम आपल्या घारीपेक्षा थोडाफार मोठा असतो. हा गरूड भारतात सर्वत्र आढळतो आणि सहज तो एकटा किंवा जोडीने उडताना दिसतो. यांच्या विणीचा हंगाम उन्हाळ्याच्या सुरवातीस असतो आणि याची मादी एक्च एक अंडे घालते. यांचे मुख्य खाद्य म्हणजे साप, सरडे, उंदीर असते. पण प्रसंगी बेडूक, खेकडे, ल्हान पक्षी सुद्धा ते खाउ शकतात.

गरूड असल्याने अर्थातच याची शिकारी पक्ष्यात वर्गवारी केली जाते. हे पक्षी संपुर्ण मांसाहारी असतात आणि सहसा स्वत: शिकार करून हे पक्षी त्यांचे भक्ष्य पकडतात. या शिकारी पक्ष्यांच्या जाती आणि आकारसुद्धा विविध आहेत त्यामुळे ते छोटे सस्तन प्राणी, पक्षी, सरिसृप, बेडूक, खेकडे, किटक त्यांच्या खाण्यासाठी वापरतात. हे पक्षी नुसती शिकार करतात म्हणून "शिकारी" पक्षी ठरत नाहीत तर त्यांची अशी वर्गवारी करण्याची त्यांची तीन खास शारीरीक वैशिष्ट्ये आहेत. मजबूत, वक्राकार, धारदार चोच, अणुकुचीदार नख्या असलेले दणकट पंजे आणि पाय, अतिशय तिक्ष्ण, तेज नजर यामुळे ते शिकारी पक्षी म्हणून गणले जातात.

शिकारी पक्ष्यांची चोच बघितली की लगेच कळते की हे पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा काही वेगळे आणि खास आहेत. त्यांच्या चोची वक्राकार, दणकट, टोकेरी आणि धारदार असतात. खालची आणि वरची चोच एकमेकात अशी काही पकडीसारखी घट्ट बसते की भक्ष्याच्या मांसाचे लचके त्यांना सहज तोडता येतात. यांचे मजबूत पाय, दमदार तळवे आणि टोकदार वळलेल्या नख्या त्यांना एखाद्या शस्त्रासारख्या वापरता येतात. बऱ्याच शिकारी पक्ष्यांत तीन नख्या पुढे वळलेल्या असतात आणि एक नखी मागे वळलेली असते. या तळव्यांनी ते भक्ष्यावर जोरदार दाब देउ शकतात.

गरूड आणि ससाणे तर ह्या तळव्यांच्या सहाय्याने भक्ष्याची मान मोडून त्याला मारण्यात पटाईत असतात. यांची नजर तिक्ष्ण असायचे कारण म्हणजे त्यांच्या बुबूळाचा मोठा आकार आणि डोळ्याचे स्नायु जे जलद "फोकस" करतात. दिवसा उडणारे शिकारी पक्षी तर वेगवेगळे रंगसुद्धा ओळखू शकतात. वेगवान आणि संथ तरळत उडण्याच्या पद्धतीकरता हा गरूड प्रसीद्ध आहे. त्यामुळे बसलेल्या स्थीतीत या गरूडाचे छायाचित्र मिळण्याकरता बरेच फिरावे लागते. जर का त्याच्यी घरटयाची जागा मिळाली तर मात्र त्याच्या सारखी संधी नाही. रणथंभोरच्या जंगलात ह्या गरूडाने नुकताच एक पक्षी मारून खाल्ला होता.

आमची जीप त्या ठिकाणी थोडी उशीरा पोहोचल्यामुळे मला त्याची खाताना काही छायाचित्र मिळाली नाहीत पण तरीसुद्धा पायामधे त्या पक्ष्याची पिसे आणि मनसोक्त पोट भरलेला तो गरूड खरोखरच छान दिसत होता. दुसऱ्या छायाचित्रात जो गरूड दिसतो आहे तो चक्क पाणी प्यायला जंगलातल्या ओढ्यावर उतरला होता. एवढ्या खालच्या पातळीत असल्यामुळे आणि तो पाणी पीत दंग असल्यामुळे त्याची मनसोक्त छायाचित्रे काढता आली.

 

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate