অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुरेवाला हूप्पो

तुरेवाला हूप्पो

तुरेवाला हूप्पो

अतिशय डौलदार, दिमाखदार, ऐटीत असणारा हा पक्षी आहे. याची प्रत्येक हालचाल, उडण्याची पद्धत, ऐट सर्व काही खास असते. ह्या पक्ष्याची नेहेमी सुतार पक्ष्याशी गल्लत केली जाते. अर्थात त्या दोघांमधे बरेचसे साम्य असते म्हणूनच ही गल्लत केली जाते, परंतु त्यांच्या तुऱ्यातील फरकाने हुप्पो पटकन लक्षात येतो. सुताराच्या डोक्यावर सहसा तांबड्या रंगाचा नुसत्या पिसांच्या पुंजक्यासारखा तुरा असतो तर हुप्पोच्या डोक्यावर लांब आणि अगदी जपानी पंख्यासारखा उघडमीट करणारा तुरा असतो.

जेंव्हा हा पक्षी उत्तेजीत असतो किंवा त्याला धोका जाणवतो तेंव्हा तो हा तुरा पटकन उघडतो किंवा उडून बसतानासुद्धा त्याचा हा तुरा उघडून मग बंद होतो. हा तुरा बदामी रंगाचा असून त्याची टोके काळी असतात. ह्याच बदामी रंगाचे त्याचे शरीर असून पंखावर काळा रंग असून त्यावर पांढरे पट्टे असतात. उडताना हे काळे, पांढरे पट्टे अतिशय आकर्षक दिसतात. यांची चोच सुद्धा नाविन्यपुर्ण असते. इतर पक्ष्यांपेक्षा ही चोच जरा जास्त लांब, टोकदार आणि खाली वक्राकार असते. हे पक्षी घनदाट जंगलात न आढळता मोकळ्या, खुरट्या झाडांमधे आणि गवताळ कुरणांमधे दिसतात. पालापाचोळ्यामधे आणि जमिनीमधे दडलेले किटक आपल्या लांबलचक चोचीने शोधून शोधून काढून मटकावताना दिसतात. ह्या पक्ष्याच्या एकंदर ९ उपजाती जगात आढळत असल्या तरी भारतात त्यातील फक्त ३ उपजाती सापडतात. अतिशय देखणा दिसत असल्यामुळे आणि आकर्षक रंगसंगती असल्यामुळे सहसा या पक्ष्याला एकदा बघितल्यावर त्याला विसरणे केवळ अशक्य असते.

किटकांमधे यांना फुलपाखरांच्या अथवा इतर अळ्या जरी प्रिय असल्या तरी ते कोळी, गांडूळे, गोम इतकेच नव्हे तर सरडे, बेडूक आणि प्रसंगी सापसुद्धा खाताना आढळले आहेत. धीट भासणारा हा पक्षी अगदी माणसाच्या आसपाससुद्धा वावरायाला कचरत नाही. थोडासा धोका जाणवला तर अगदी लांब न उडता आपली फुलपाखरांसारखी पंख उघडमीट करणारी उडण्याची पद्धत अवलंबून जवळच उतरतो आणि परत जमिनीत चोच खुपसून खाणे शोधायला सुरवात करतो. याचे घरटे म्हणजे बिळात, फटीत, झाडांच्या ढोलीत असते आणि त्याकरता अतिशय कमी सामान वापरले जाते. ही घरट्याची जागा नर खास निवडतो आणि पुढे कित्येक वर्षे तीच तीच जागा परत परत वापरली जाते. मादी अंदाजे ८ ते १५ अंडी घालते आणि ती एकटीच ही अंडी उबवते.

साधारणत: १५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मादी आपल्या शरीरातील खास ग्रंथीतून अतिशय घाण वासाचा द्राव स्त्रवते आणि त्या घरट्यात पसरवते. अर्थातच यामुळे बऱ्यापैकी त्या घरट्याचे संरक्षण होते. नर मात्र अगदी मोठ्या शिकारी पक्ष्यांनासुद्धा घरट्यापासून हाकून लांब पळवतो. जंगलात हा पक्षी कमीच दिसत असल्यामुळे यांना शोधायला गवताळ कुरणे, खुरट्या खुडपांच्या मोकळ्या जागाच लागतात. मग तो आपल्याला अगदी शहरातसुद्धा दिसू शकतो. दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुद्धा हा तिथल्या "लॉन" वर बागडताना दिसू शकतो. मी लाल किल्ल्याची छायाचित्रे काढण्यापेक्षा तीथे याचीच जास्त छायाचित्र काढली आहेत. भरतपूर, काझीरंगा, बांधवगड अश्या राष्ट्रीय उद्यानात जीथे गवताळ प्रदेश जास्त आहे तिथे हे पक्षी सहज दिसतात. दातिवरे, अर्नाळा, अलिबाग, उरण च्या समुद्र किनाऱ्याजवळच्या झाडीमधे सुद्धा हे आपल्याला दिसतात.

भरतपूरच्या जंगलात मात्र आपण चालत किंवा सायकलने फिरत असल्यामुळे तिथे यांचे छायाचित्रण सहज शक्य होऊ शकते. अर्थातच त्याचे तुरूतुरू पळणे, जरा धोका जाणवला कि थोडे पुढे उडून जाउन बसणे यामुळे त्याच्या सतत मागे मागे फिरावे लागते. मागे एकदा एका सुक्या, वठलेल्या झाडावर ९ हुप्पो पक्षी मी बघीतले होते पण संध्याकाळ झाल्यामुळे प्रकाशाच्या अभावाने मला त्यांचे छायाचित्रण काही जमू शकले नाही. आज यांची इतकी छायाचित्रे काढल्यावर सुद्धा माझ्याकडे त्यांचे वैशीष्ट्य असलेल्या तुऱ्याचे फुलवलेल्या स्थीतीत छायाचित्र नाही.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate