অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थापट्या...

थापट्या...

आपल्याकडे आढळणाऱ्या बदकांपैकी हे एक आकर्षक, बहुरंगी बदक. याला मराठीत "थापट्या" किंवा इंग्रजीमध्ये "शॉव्हलर" म्हणतात. यांची चोच जरा जास्तच लांब आणि पुढे अगदी चपट फावड्यासारखी असते म्हणूनच यांची ही नावे आहेत. ही लांब आणि चपट चोच अगदी अडीच इंच लांब असते आणि त्यावर जवळजवळ ११० अतिबारीक छिद्रे असतात ज्यातून त्यांचे अन्न पाण्यातून गाळले जाते. या थपट्यांच्या नराचे डोके चमकदार, झळाळणारे, हिरवे असते. छाती पांढरीशुभ्र असते तर पोट आणि पंख चमकदार पिवळे, तपकीरी असतात. पंखावर खांद्याच्या इथे चमकदार राखाडी, निळसर धब्बा असतो.

पंख उघडले तर त्यावर चमकणारा, झळाळणारा हिरव्या रंगाचा पट्टा असतो. यांची चोच काळी असते तर पाय उठावदार भगव्या रंगाचे असतात जे पाण्यात पोहतानासुद्धा सहज दिसून येतात. थापट्यांची मादी मात्र अगदीच साध्या रंगाची असते. तीचा पिवळसर रंग तपकीरी ठिपक्या ठिपक्यांचा असतो. उडताना तीच्या पिसांची टोके राखाडी निळसर दिसतात तर त्याच्या खालची पिसे ही गडद हिरव्या रंगाची असतात. हीचा एकंदर अविर्भाव हा मॅलार्ड आणि गढवाल या बदकांच्या माद्यांसारखाच असतो.

या बदकांची जोडी कायम असते आणि ते त्यांचे जोडीदार दर हंगामात बदलत नाहीत. नर मादीला आकर्षित करायला अनेक क्लुप्त्या वापरतो. मिलनानंतर यांची घरटी उथळ पाण्याजवळच्या गवताळ प्रदेशात किंवा खुरट्या झुडपांमधे असतात. यांना गोड्य अथवा खाऱ्या पाण्याच्या जवळच्या जागासुद्धा चालतात. पाण्याजवळच काड्यांच्या आधाराने त्यांचे घरटे बांधलेले असते. यात मादी अंदाजे ९ अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली त्यांची पिल्लावळ ही पुढे कित्येक दिवस पाण्याजवळच्या दाट झाडीत लपवली आणि वाढवली जाते.

नंतर मात्र ती त्यांच्या पालकांबरोबर उघड्यावर, पाण्यात त्यांच्या पाठोपाठ पोहताना दिसतात. ही बदकाची जात स्थलांतरीत आहे आणि आपल्याकडे थंडीच्या मोसमात उत्तरेकडून येतात. इतर सर्व बदकांप्रमाणेच ही जलद आणि लांब उड्डाणाकरता प्रसिद्ध आहेत. पाण्यामधे आपली फताडी चोच इथून, तिथून फिरवून हे त्यांचे खाद्य मिळवतात. पाण्यातले मासे, किटक, शंख याच बरोबर पाण वनस्पतींच्या बिया, त्यांची मुळे, कंद, शेवाळ हे त्यांचे मुख्य अन्न असते. आज जगभरात यांची संख्या कमी नसली तरी शिकारीमुळे आणि त्यांच्या अधिवासाच्या नाशामुळे त्यांची संख्या रोडावत आहे.

साधारणत: १० वर्षांपुर्वी श्रिहरीकोटा इथल्या पुलिकतच्या तळ्यांमधे या बदकांना मी सर्वप्रथम बघितले. बीएनएचएस संस्थेतर्फे पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी आम्ही "बर्ड रिंगींग" करत होतो. दिवसभर जाळ्यांमधे अनेक विविध जातींचे पक्षी पकडून त्यांची मोजमापे, वजन घेऊन, त्यांची नोंद ठेवून मग त्यांच्या पायात विशीष्ट्य अनुक्रमांक असलेली कडी घालून मग आम्ही त्यांना मोकळे सोडून द्यायचो. प्लोव्हर, सॅंडपायपर, स्टिंट, टर्न याच बरोबर हे थापट्या बदकसुद्धा आम्हला एकदा सापडले. आपला विश्वास बसणार नाही एवढे त्यांचे पंख मऊ असतात आणि तेवढेच त्यांच्यावर अप्रतिम रंग असतात. त्याला अगदी जवळून बघितल्यावर, कडी घालून त्याला मोकळे सोडले आणि ते लगेच भन्नाट वेगाने उडून गेले. त्यानंतर या आणि इतरही बदकांना मी भरतपूर, नांदूर मधमेश्वर, जायकवाडी अश्या अनेक ठिकाणी बघितले.

जलाशयांची मोठी व्याप्ती आणि या पाणपक्ष्यांचे उघड्यावर असणारे वास्तव्य यामुळे ते नेहेमीच आपल्यापासून त्यांच्यात दूर अंतर ठेवतात. अर्थातच यामुळे त्यांच्या छायाचित्रणासाठी मोठी, लांब पल्ल्याची लेन्स जरूरी ठरते. या बदकांना आपली जर जरी चाहूल लागली तर ते पाण्यात आपले वल्ह्यासारखे पाय मारत दूर निघून जातात. त्यांच्यात आणि आपल्यात जर का अगदीच कमी अंतर उरले तर मात्र ते लांब उडून सुद्धा जातात. आता नुकताचे मी बारामती जवळच्या भिगवणला जाउन आलो तेंव्हा तिकडच्या डिकसळ, कुंभारगाव या भागात मात्र मला ही बदके अगदी जवळून बघता आली. तिकडच्या नितळ पाण्यात या बदकांचे अनेक खेळ सुरू होते. खाण्याकरता होणारी त्यांची धावपळ, दोन नरांची आपापसात चढाओढ, तर पंख झटकण्याकरता केलेली पंखाची फडफड हे बघणे आणि कॅमेरात टिपणे म्हणजे एक वेगळाच आनंददायी अनुभव होता.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate