অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची

द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची

“या चित्रपटातला स्पर्धेचा, ईर्षेचा भाग सोडला; तरी हा चित्रपट पक्ष्यांबद्दल रुची असणार्‍यांच्या कुतूहलाचे थोडेफार शमन करतोच. याशिवाय पक्ष्यांबद्दल रुची नसणार्‍या लोकांमध्ये ती निर्माण करण्याबाबतची दिग्दर्शकाची धडपडसुद्धा कौतुकास्पद वाटते! ... प्रसंगनिष्ठ विनोद, हलकेफुलके संवाद आपापली भूमिका चोख बजावतात. जरा हटके विषयावरचं हे दिग्दर्शकाचं भाष्य असल्यानं अभ्यासू पक्षिनिरीक्षकांबरोबरच हौशी पक्षिनिरीक्षकांनाही पक्ष्यांच्या मागावरच्या या सफरी रोमांचक वाटतील यात शंकाच नाही!...”

‘द बिग इयर’ फक्त तीन शब्द; पण नावावरून त्यात अंतर्भूत असणार्‍या त्याच नावाच्या स्पर्धेची, तिच्या काठिण्याची, ती पार करताना समोर येणार्‍या खाचखळग्यांची आपल्याला कणभरही जाणीव न होऊ देणारा चित्रपट! The Big Year : A Tale of Man, Nature and Fowl Obsession हे मार्क ओबमॅस्मिक यानं लिहिलेलं, 1998 सालच्या ‘द बिग इयर’ या स्पर्धेवर बेतलेलं प्रचंड खपाचं पुस्तक. याच कथासूत्राभोवती हा चित्रपट फिरतो.

या चित्रपटाचे रूढार्थाने तीन नायक आहेत. निवृत्तीचं वय जवळ येऊन ठेपलेला, आवड म्हणून पक्षिनिरीक्षण करण्याची इच्छा असलेला, एका प्रथितयश कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टु प्रेस्स्लर (स्टीव्ह मार्टिन); पक्षिनिरीक्षणाचे स्वतःचेच विक्रम सतत मोडीत काढणारा आणि पक्षी पाहण्याच्या वेडापोटी झपाटलेला (याची दोन लग्नं यासाठी आधीच मोडलेली असतात.) असा कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) केनी बॉस्टिक (ओवेन विल्सन); आणि कंपनीतून बाहेर फेकला गेलेला, मन मारून नावडीचा जॉब करणारा एक घटस्फोटित सॉफ्टवेअर इंजिनिअर ब्रॅड हॅरिस (जॅक ब्लॅक). या तिघांची, त्यांच्या ढासळत्या-उभरत्या कौटुंबिक जीवनाची ही गोष्ट ‘द बिग इयर’ स्पर्धेभोवती घुटमळणारी!

प्रथम ‘द बिग इयर’ स्पर्धेविषयी थोडंसं. अमेरिकेत प्रसिद्ध असणार्‍या या स्पर्धेत कुणीही पक्षिनिरीक्षक भाग घेऊ शकतो. या स्पर्धेची अट एकच; ती म्हणजे वर्षभरात 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंतच्या काळात एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशातल्या पक्ष्यांच्या जास्तीतजास्त जाती/प्रजाती पाहायच्या किंवा त्यांचे आवाज ऐकायचे आणि या माहितीची नोंद, अर्थातच काळजीपूर्वक ठेवायची. वर्षाच्या शेवटी ज्याचे पक्षी सर्वांत जास्त भरतील, त्याचा अर्थातच पहिला नंबर!

तर आपले हे तीन पक्षिनिरीक्षक जय्यत तयारीनिशी कामगिरीवर निघतात... तिघांचेही ‘द बिग इयर’ या स्पर्धेत सहभागी होण्यामागचे हेतू निःसंशय वेगवेगळे आहेत; पण पक्षीवेडाचं झपाटलेपण तिघांच्याही रक्तात ठासून भरलं आहे हे मात्र नक्की! स्टु एका महाबलाढ्य कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ); पण ‘द बिग इयर’ या स्पर्धेत सहभागी होणं हे त्यानं हयातभर जपलेलं स्वप्न! ब्रॅडनं कौटुंबिक, आर्थिक, मानसिक अशा सगळ्याच आघाड्यांवर अपयशाची चव चाखलेली, केवळ आवाजावरून पक्ष्याचं नाव सांगायचं दुर्मीळ कसब अंगी असणारा हा ‘कान’सेन. बॉस्टिक मात्र सगळ्यांमध्ये उठून दिसणारा. जास्तीतजास्त पक्षी पाहणं हे त्याचं निवळ स्वप्न नसून तो त्याचा ध्यास आहे, श्वास आहे. कुठंही नव्या पक्ष्याचं आगमन झाल्याची कुणकुण जरी लागली, तरी बॉस्टिक महाशय कामगिरीवर सरसावलेच म्हणून समजा! वेळप्रसंगी, कौटुंबिक आयुष्य पणाला लावूनदेखील!

पुढं हे तिघं या स्पर्धेत कायकाय कामगिरी बजावतात, वेगवेगळ्या अडथळ्यांवर कशी मात करतात आणि ‘द बिग इयर’चं प्रथम पारितोषिक कोण पटकावतं हे पडद्यावरच पाहणं इष्ट !

पक्ष्यांची, त्यांच्या निरीक्षणाची आवड तुम्हां-आम्हां सर्वांमध्येच एका मर्यादेपर्यंत मूलतः असते. कोणताही पक्षी हा माणसासारखाच ‘आहार-निद्रा-भय-मैथुन’ याच चक्रात जगणारा असला, तरीही केवळ उडण्यामुळं माणसापासून वेगळा ठरणारा. असा हा पक्षी चिऊ-काऊच्या गोष्टींपासून आपल्या ओळखीचा! असं असलं, तरी ‘द बिग इयर’ ही स्पर्धा हे पक्षिनिरीक्षण अनोखं ठरवणारी. नेहमीच्या बघण्यात असणार्‍या चिमणी, कावळा, गरुड, घार, साळुंकी, मैना, पोपट यांच्या व्यतिरिक्तच्या पक्ष्यांना तुमच्या अवकाशात भरारी घ्यायला लावणारी; तुमच्या निरीक्षणकौशल्याचा कस लावू पाहणारी; सगळी ज्ञानेंद्रिये जागी करणारी. या सगळ्यांतूनही वर्षभराचं सातत्य टिकवणं हे अजूनच अवघड! यासाठी तुमचं मनापासून प्रेम हवं या पक्ष्यांवर, तरच हे झोकून देणं शक्य होतं.

एका पक्षिनिरीक्षकाला खरोखर सगळ्या प्रांतांच्या, देशांच्या सीमा ओलांडून; गळ्यात दुर्बीण घेऊन, पायाला भिंगरी लावून नि डोळस दृष्टीनं धावावं लागतं. थंडी-वारा-ऊन-पाऊस यांच्या बरोबरीनंच त्याला निसर्गातल्या अत्यंत प्रतिकूल हवामानाचाही सामना करावा लागतो. अलास्काजवळच्या अट्टू बेटावर पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. 1998 साली एल निनो फॅक्टरमुळं इथं अचानक वेगवेगळ्या पक्ष्यांनी स्थलांतर केलं. ‘द बिग इयर’वाल्यांसाठी त्या काळात ती ‘पक्ष्यांची पंढरी’ ठरली! ‘आपल्याला मोर हवा असेल, तर आपणच मोर व्हायचं’ या पु. शि. रेगेंच्या उक्तीप्रमाणे, द बिग इयरमधले हे तिन्ही पक्षिनिरीक्षक जणू वर्षभर स्वतःच पक्षी होत स्वतःच्या ध्येयाकडे धावत असतात; कधी घरच्यांना न जुमानता; कधी व्यावसायिक बांधीलकीकडे पाठ फिरवत; तर कधी साध्यासुध्या अपयशाचा सामना धैर्यानं करत...

या चित्रपटातला स्पर्धेचा, ईर्षेचा भाग सोडला; तरी हा चित्रपट पक्ष्यांबद्दल रुची असणार्‍यांच्या कुतूहलाचे थोडेफार शमन करतोच. याशिवाय पक्ष्यांबद्दल रुची नसणार्‍या लोकांमध्ये ती निर्माण करण्याबाबतची दिग्दर्शकाची धडपडसुद्धा कौतुकास्पद वाटते! उत्साहाच्या भरात तपशिलाच्या काही चुका घडल्या आहेत. जसं की, ग्रेट ग्रे आउल हे पक्षी व्हर्जिनिया प्रांतात कधीच आढळत नाहीत; मात्र ते इथं असल्याचं दाखवलं आहे. तरीही प्रसंगनिष्ठ विनोद, हलकेफुलके संवाद आपापली भूमिका चोख बजावतात. जरा हटके विषयावरचं हे दिग्दर्शकाचं भाष्य असल्यानं अभ्यासू पक्षिनिरीक्षकांबरोबरच हौशी पक्षिनिरीक्षकांनाही पक्ष्यांच्या मागावरच्या या सफरी रोमांचक वाटतील यात शंकाच नाही! अर्थात, ‘द बिग इयर’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला वर्षभरात रिकामा काढता येईल असा वेळ, कुटुंबाचा भरभक्कम पाठिंबा आणि गाठीशी पुष्कळ पैसा या तीनही गोष्टी असल्या पाहिजेत असा संदेश हा चित्रपट आपल्यापर्यंत आपसूक पोहोचवतोच!

या चित्रपटाचा आपल्या दृष्टीनं विचार केला; तर जाणवतं की, परिसंस्थेतल्या पक्षी या घटकाला जपण्यासाठी केवळ स्पर्धा हेच निमित्त का बरं ठरावं? शेवटी स्थानिक पक्षिनिरीक्षकांनी नियमितपणे पक्षिनिरीक्षण करणं, मिळालेल्या माहितीचं सातत्यानं दस्तएवेजीकरण करणं आणि आपल्या माहितीची देवाणघेवाण इतर निरीक्षकांसोबत वेळोवेळी करणं हेही पक्षिनिरीक्षणाबद्दल छोट्या समूहापासून मोठा आवाका गाठू शकणारं, जागरूकता वाढवणारं असं गटकार्य आहे ना!

लेखिका; सुप्रिया कुलकर्णी-खोत, संपर्क: mee.supriya@gmail.com

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate