অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिमाखदार शेकाटया

दिमाखदार शेकाटया

दिमाखदार शेकाटया
शेकाटया किंवा ब्लॅकवींग्ड स्टिल्ट हा आपल्याला सहज आपल्या शहराच्या, गावाच्या आसपास पाणवठयावर दिसणारा पक्षी आहे. फ्लेमींगो सोडले तर पाणथळीतील पक्ष्यांतील हा सर्वात लांब पायाचा पक्षी आहे. त्याचा डौलदार अविर्भाव, चमकदार काळे पंख आणि संपुर्ण पांढरेशुभ्र शरीर त्याला एकदम "सुटाबुटातला" आभास देतात. लालभडक पाय आणि त्याच रंगाचे डोळे त्याच्या दिमाखात अधिकच भर घालतात. यांचे चोच काळ्या रंगाची, धारदार, सरळ आणि टोकदार असते जी त्यांच्या शरीराला एकदम साजेशी असते.

भारतात काही ठिकाणी शेकाटया स्थानीक रहिवासी आहे तर काही ठिकाणी तो स्थलांतर करू येतो. दर हिवाळ्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे ते छोटया समूहामधे उडडाण करतात आणि पाणथळ जागा, तलाव, नद्या आणि खाडीच्या परिसरामधे मुक्काम करतात. उन्हाळ्याच्या शेवटी परत एकदा ते दक्षिणेकडून उत्तरेकडे त्यांचा परतीचा प्रवास करतात. उत्तर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्थान येथे त्यांच्या विणीच्या जागा आहेत. शेकाटयांचे लांबलचक पाय चक्क दहा इंच लांब असतात आणि उडताना हे लांब पाय शेपटीच्या मागे सरळ असतात. त्यामुळे हा पक्षी उडतानासुद्धा ओळखणे अतिशय सोपे असते. अर्थातच ह्या त्यांच्या लांब पायांमुळे त्यांना जास्त खोल पाण्यात जाउन खाणे सहज शक्य होते आणि यामुळे इतर पक्ष्यांशी खाण्याकरता होणारी स्पर्धा कमी होते. तसेच त्यांना खाण्याकरता जास्त जागा वापरता येतात. यांची चोच लांब, सरळ आणि पातळ असल्यामुळे त्यांना पाण्यातून, चिखलातून त्यांचे खाणे मिळवणे सोपे जाते.

जेंव्हा पाणी नितळ असते आणि त्यांचे खाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तेंव्हा हे त्वरेने त्यांची चोच पाण्यात घुसवून, लगबगीने त्यांचे खाणे खाताना आढळतात. शेकाटे सहसा समुहामधे रहातात आणि हा थवा २० ते १०० पक्ष्यांचा असू शकतो. त्यांचा विशीष्ट आवाज, पंख फडफडवण्याची पद्धत आणी मागे लांबलचक असणारे सरळ पाय यामुळे लांब अंतरावर किंवा अगदी प्रकाशाच्या विरूद्ध दिशेनेसुद्धा आपण त्यांना पटकन ओळखू शकतो.

 

अगदी भल्या पहाटे यांची खाण्याकरता लगबग सुरू होते. पाण्यामधे एकेकटे, जोडीने किंवा अगदी थव्यानेसुद्धा हे आपली मान डावीकडे, उजवीकडे करत भक्ष्य शोधत भराभर फिरत असतात. एकेक भाग असा पिंजून काढल्यावर नवीन ठिकाणी उडून परत ते असेच घाइघाइने खाताना पाहून असे वाटते की एकतर हे भयंकर उपाशी आहेत किंवा त्यांना कुठेतरी जायची भलतीच घाई आहे. टळटळीत दुपारी मात्र ते दगडावर, काठावर आपला एक पाय दुमडून, एकाच पायावर विश्रांती घेताना आढळतात. अगदी सहज आणि शहरातसुद्धा दिसत असल्यामुळे या पक्ष्याचे नावीन्य असे काही नाही. पण याचा डौलच असा काही न्यारा असतो की दरवेळेस कॅमेरा अगदी आपोआप उचलला जातो. तसा लाजराबुजरा स्वभाव असल्यामुळे हे पटकन छायाचित्र काढून देतील याचाही काही भरोसा नसतो.

मागे उरणला पक्षीनिरीक्षण करताना आम्हाला यांची घरटयांची जागा मिळाली होती मात्र तिथे छायाचित्रण शक्य झाले नव्हते. या वेळेस नल सरोवर, गुजराथ च्या भेटीत मात्र मला यांची थोडीफार छायाचित्रे काढता आली. एका छायाचित्रात शेकाटयाचे सगळे रंग आकार सहजासहजी दिसत आहेत तर दुसऱ्यामधे "सिल्होट" प्रकारचे छायाचित्र असल्यामुळे प्रखर पार्श्वभुमीवर, सुर्योदयाच्यावेळी फक्त शेकाटयाची गडद बाह्यरेखाकृती दिसत आहे.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate