অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

देखणी रंगीत पाखुर्डी

देखणी रंगीत पाखुर्डी

आज जगभरात यांच्या १६ उपजाती आहेत, पण या सापडतात त्या फक्त आशिया आणि आफ्रीका खंडातच आढळतात. हा देखणा पक्षी सापडतो तो वाळवंटात किंवा अतिशय कोरड्या गवताळ जमीनीच्या प्रदेशात. वाळवंटात रहात असल्यामुळे अर्थातच याचा रंग मुख्यत: पिवळट, राखी असतो पण त्यावर अतिशय छान नक्षी असते आणि काही जातीत इतर छान रंगाचे पट्टे, गोल, चांदवे असतात. यांचे पंख लांब आणि निमुळते असतात आणि लहानश्या पायावर सबंध पिसे असतात. ह्या रंगीत पाखुर्डीमधे नर आकाराने मादीपेक्षा थोडे मोठे असतात. त्यांच्या कपाळावर एक काळी गडद पट्टी असते. छातीवर एक आकर्षक तपकीरी रंगाची पट्टी असते, त्याच्या आत फिकट पिवळा रंग असतो आणि मग परत एक काळी पट्टी असते. पंखांवर अशीच तपकीरी, काळ्या, पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी असते. मादीवर एवढी जरी रंगांची पखरण नसली तरी तीच्या पंखांवरसुद्धा काळ्या रंगाची बारीक बारीक नक्षी असते.

हे पक्षी त्यांच्य प्रचंड उडण्याकरता जगभरात प्रसिद्ध आहेत. वाळवंटी प्रदेशात रहात असल्यामुळे त्यांना पाण्याकरता लांबवर जायला लागते. यांची पाणी पिण्याची ठिकाणेसुद्धा ठरलेली असतात. ह्या पक्ष्यांच्या काही जाती दरदिवशी फक्त पाणी पिण्यासाठी अंदाजे १०० मैलांपेक्षा जास्त अंतर उडतात. त्यांचा उडण्याची वेगसुद्धा जबरदस्त असतो. ताशी ६० कि.मी. वेगाने ते आपल्या रहाण्याच्या जागेपासून ते पाण्याच्या जागेपर्यंत आणि परत उडत जातात. वाळवंटात किंवा गवताळ, रेताड प्रदेशात हे रहात असल्यामुळे यांचे रंग आजुबाजुच्या वातावरणात अगदी मिळून मिसळून जाणारे असतात. यामुळेच जर का जे पक्षी बाजुच्या गवतात शांतपणे बसलेले असतील तर बिलकूल दिसून येत नाहीत.

या पक्ष्यांना खाण्यासाठी गवताच्या बीया अथवा धान्य लागते. अगदी क्वचीत प्रसंगी ते छोटे छोटे किटकसुद्धा खातात. प्रत्येक जातीच्या त्यांच्या आवडीनुसार बीया अथवा धान्य हे ठरलेले असते आणि प्रामुख्याने ते पक्षी त्याच्या बीया शोधून त्यावर गुजराण करतात. या बीया खाण्यासाठी ते खाली पडलेल्या बीया खातात किंवा अगदी झाडावरच्या बीयासुद्धा खातात. हे पक्षी खाण्यानंतर कित्येक मैल लांब पाण्याकरता उडत जातात. पण काही काही जातीत ते ज्या भागात रहातात त्या भागात पाण्याचे एवढे दुर्भिक्ष असते की ते बरेच दिवस बिना पाण्याचेसुद्धा रहातात.

या पाखुर्ड्यांची जोडी कायमची असते आणि प्रत्येक वीणीच्या हंगामात ते इतर पक्ष्यांसारखे जोडीदार बदलत नाहीत. यांचा वीणीचा हंगाम त्या भागातला पाउस आणि त्यांच्या खाण्याच्या बियांच्या / धान्याच्या उपल्बधतेवर अवलंबून असतो. वीणीच्या हंगामात मादी जमीनीवरच, थोड्याफार खोलगट खडड्यात अंदाजे २/३ अंडी घालते. ही अंडी हिरवट रंगाची असून त्यावर चट्टे असतात जेणेकरून ती आजूबाजूच्या वातावरणात सहज मीळूमिसळून जातात. साधारणत: २२ ते २५ दिवसांच्या कालावधीत अंडी उबून त्यातून पिल्ले बाहेर येतात आणि लगेचच घरट्याच्या बाहेर पडतात. पिल्लांची काळजी दोघेही नर मादी घेतात. नर साधारणत: रात्री अंडी उबवतात तर माद्या दिवसा अंडी उबवतात. या पक्ष्यांची सर्वात खास बाब म्हणजे त्यांना स्वत:ला पाणी प्यायला तर ते दर दिवशी कित्येक अंतर उडतातच पण त्यांच्या पिल्लांना पाणी पाजण्यासाठी ते तेवढेच अंतर लांबवर उडतात, पाणी प्यायल्यावर त्यांच्या गळ्या, छातीजवळची पिसे ओली करतात आणि ते पाणी आणून त्यांच्या पिल्लांना पाजतात. ह्यांच्या नरांच्या छातीजवळची ती खास पिसे जवळपास १५/२० मि.ली. पानी सहज साठवून ठेवतात.

मागे एकदा रणथंभोरच्या जंगलात मी या रंगीत पाखुर्ड्यांची जोडी बघितली होती, पण त्यांना आमच्या जीपची चाहूल लागली आणि त्या उडून लांब जाउन बसल्या. त्यामुळे फक्त दुर्बिणीतून बघण्यावरच आम्हाला समाधान मानावे लागले. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी त्याच जंगलात आमच्या पुढच्या गाडीतल्या लोकांनी सांगीतले की इथे एक रंगीत पाखुर्ड्यांची जोडी होती, ती उडून गेली पण तीची दोन पिल्ले आहेत. आम्ही जीप रस्त्याच्या बाजूला थांबवून सगळीकडे शोधले पण ती पिल्ले अशी काही दडून बसली होती की आम्हाला जाम शोधता आली नाहीत. आता या वर्षी ताडोबाच्या जंगलात माळरानावर मी रातव्याचे घरटे शोधत होतो. त्याच भागात सुमारे १२ वर्षांपुर्वी मला त्याचे घरटे आणि ३ अंडी मिळाली होती.

आमची जीप त्या रस्त्यावर अतिशय हळूहळू जात असताना मला गाडीच्या डाव्या बाजूला, अगदी टायरजवळ हालचाल जाणवली म्हणून मी गाडी थांबवली तर चक्क या रंगीत पाखुर्ड्यांचे एक कुटूंबच तिथे बसले होते. नर, मादी आणि त्यांचे थोडेसे मोठे झालेले पिल्लू तिकडे जमिनीवर गवताच्या बिया टिपायला बसले होते. आमची गाडी थांबल्यामुळे त्यांना आमची चाहूल लागली, त्यामुळे नर मादी वेगवेगळे झाले अर्थात पिल्लाला मादीने बरोबर घेतले होते. पण ते थोडेसेच दूर जाउन जमिनीत अगदी दबून बसले. आता ते एतक्या जवळ होते की माझ्या लांब पल्ल्याच्या लेन्सच्या “minimum focusing distance” च्या आत होते, त्यामुळे मी गाडी हळूहळू मागे नेली आणि मगच मला त्यांची छायाचित्रे घेता आली.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate