অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्रोणकावळा

द्रोणकावळा

द्रोणकावळा : (रॅव्हन). या पक्ष्याचा कोव्हिडी पक्षिकुलात समावेश केला आहे; याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस कोरॅक्स. यूरोप उत्तर आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरीका येथे तो आढळतो भारतात तो पंजाब व राजस्थानातील रेताड प्रदेशात सापङतो, बाकीच्या भागात तो व्कचित दिसतो कोरड्या आणि ओसाड प्रदेशात आढळतो.

द्रोणकावळा हे डोमकावळ्याचे मोठे स्वरूप आहे असे म्हणता येईल, सामान्यतः घारीएवढा तो असतो. याचा रंग काळा कुळकळीत असून त्यावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाची तकाकी असते. चोच बरीच मोठी व भक्कम असते, गळ्यावरची पिसे विसकटलेली असतात. नर व  मादी दिसण्यात सारखी असतात.

विणीच्या हंगामात याला एकांतवास जरी आवङत असला तरी इतर वेळी १५-२० पक्ष्यांचे थवे  खेड्यांच्या आणि गावांच्या शिवेवरील जमिनीवर भक्ष्य़ शोधीत भटकत असतात. कावळ्यासारखाच हा दुराचारी, जागरूक आणि धीट असतो. हा सर्वभक्षी असल्यामूळे साफ सफाईचे बरेचसे काम याच्याकडून होते. नर आणि मादी यांचा जोडा जन्मभर टिकतो. यांची झोपी जाण्याची पद्धत कावळ्यासारखीच असते पन्नाससाठ पक्षी संध्याकाळी एखाद्या झाडावर जमून गोंगाट करीत असतात. व अंधार पडल्यावर तेथेच झोपी जातात.

विणीचा हंगाम डिसेंबरपासून मार्चपर्यत असतो. घरटे मोठ्या झाडावर फांदीच्या दुबेळक्यात किंवा खडकाच्या कंगोऱ्यावर बांधलेले असून मोठे, मजबूत आणि काटक्यांचे असते; आतल्या खोलगट भागाला लोंकर केस किंवा चिंध्यांचे अस्तर असते. मादी ४-६ अंडी घालते; ती हिरवट निळ्या किंवा मळकट पिवळसर रंगाची असून त्यांवर काळसर तपकिरी, पिवळसर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके असतात.

 

लेखक: ज. नी. कर्वे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate