অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्षी दुनिया

पक्षी दुनिया

निसर्ग खर तर वर्णन करायला अवघड आणि समजून घ्यायला खूप कठीण असा विषय आहे पण ह्या शिवाय कुठला हि सजीवाला अस्तित्वच नाही. उत्क्रांती मध्ये एक पेशीय सजीवापासून ते गुंतागुंतीच्या अनेक पेशीय सजीवापर्यंत सगळ्यांच्या घटकांचा तो एक अविभाज्य अंग आहे. आज आपण त्यातलाच एक महत्वाचा घटक असलेल्या पक्षी ह्या घटकाबद्दल थोडी माहिती करून घ्या.

सरपटण्यार्या प्राण्यापासून उक्रांती झालेल्या ह्या सजीवाची विविधता खूप मोठी आहे.  आकार, रूप, रंग ह्यात विविधता असलेली पक्षी हे वेगवेगळया गोष्टीने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहेत. अगदी बालवयापासुनच माणसाची पक्ष्यांशी ओळख होते.  चिमणी, कावळा, पोपट, कबुतर अशा ह्या पक्ष्यांशी अगदी अजाणतेपणी मैत्री होते. शाळेत गेल्यावर बडबडगीतामध्ये सुद्धा मोर, कोंबडा अशा पक्ष्यांची गाणी आपण शिकतो ते अगदी मोठे झाल्यावर रामायण आणि महाभारत ह्यामध्ये ही आपल्या पक्ष्यांचे दाखले मिळतात.  लोककथा, आख्यायिका, कीर्तन ह्या सर्वांमधून पक्षी आपल्याला भेटत राहतात अगदी हिंदू धर्मात मृत्यूनंतरचे विधी सुद्धा पक्ष्याशिवाय पूर्ण होत नाहीत.

तर असा हा पक्षी. पक्षी कुणाला म्हणाव?  सरसकट उत्तर येत की उडणाऱ्या गोष्टी म्हणजे पक्षी पण काही पक्षी उडत नाहीत किंवा काही प्राणी उडतात.  उदा. वटवाघुळ, काही सरडे किंवा उडती खार. त्यामुळे हे कारण तितक संयुक्तिक वाटत नाही. मग पक्षी कुणाला म्हणायच तर पिसे आणि पंख असे दोन्ही गोष्टी असलेल्या प्राण्याला पक्षी म्हणायचं.

पक्ष्यांची विविधता ही खूप प्रचंड प्रमाणात आहे.  त्यांचा परिसंस्थेमधली भूमिका ही खूप मोठी आहे.  अन्नसाखळी मध्ये दुय्यम भक्षक किंवा काही अन्नसाखळ्यामध्ये तर सर्वोच भक्षक आहे. बीजप्रसार,  परागीभवन, सफाई कामगार,  नैसर्गिक कीटकनाशक अशा वेगवेगळ्या भूमिका पक्षी निभावत असतात.

अंगठ्यावर मावणाऱ्या छोट्या हमिंग पक्ष्यापासून ते प्रचंड अश्या शहामृग पक्षी इतके प्रकार ह्या पक्षीगणात आहेत. भारतात असलेला सर्वात छोटा पक्षी हा फुलटोच्या आहे आणि सर्वात मोठा सारस हा आहे.  पक्ष्याच्या खाण्याच्या सवयी आणि त्यांचा अधिवास ह्यामुळे त्याच्या शरीरात बदल होत गेले आहेत.  त्यामध्ये रस पिणारे, फळ खाणारे,  मांस खाणारे,  मासे व इतर जलचर खाणारे, धान्य किंवा बिया खाणारे, किडे खाणारे, मेलेली जनावरे खाणारे इतकी विविधता आहे. अधिवासानुसार त्यांचे प्रकार पाडायाचे ठरवले तर जंगलात राहणारे, गवताळ प्रदेशात राहणारे, पाण्यात राहणारे, गोड्या पाण्याजवळ राहणारे,  समुद्रात राहणारे, बेटावर राहणारे, डोंगरात राहणारे असे कितीतरी प्रकार होतील. रंग, आकार, रूप ह्यात विविधता असणारे खूप कमी सजीव आहेत त्यापैकी पक्षी एक म्हणावे लागतील.

जगात १०,४२६ (स्त्रोत birdlife international) प्रजाती आढळतात. त्यात १३% संकटग्रस्त आहेत. भारताचा विचार केला तर ही प्रजाती संख्या १२१२ (स्त्रोत BNHS) इतकी आहे.

सध्याच्या पर्यावरणाचा विचार करता सगळ्यात मोठी समस्या ही आहे की झपाट्याने कमी होत जाणारी जैवविविधता. पक्षी ही त्याला कसे अपवाद असतील. कमी होत जाणारा अधिवास, रासायनिक कीटकनाशक व खताचा वापर,  शिकारी  व पक्ष्यांच्या होणारी तस्करी,  अन्नसाखळी आलेले असंतुलन, जागतिक तापमानवाढ ही पक्ष्यांच्या नष्ट होत जाण्याची महत्वाची कारणे आहेत.  जगात १६ प्रजाती आता अतिसंकटग्रस्त प्रकारात आहेत आणि हे निश्चितच चांगल नाही.  ह्या दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजातीच्या अस्तित्त्वास धोका हा त्या अन्नसाखळीला धोका आहे तर माणसावर सुद्धा त्याचा दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

पक्षी वाचवण्यासाठी खूप उपाय केले जात आहेत हे नक्कीच आशादायक आहे पण ते शाश्वत असावेत. कारण तात्पुरती मलमपट्टी ही फारशी उपयोगी ठरत नाही.  लोक सहभागाशिवाय कोणते ही संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे पक्षी संवर्धन करताना स्थानिक लोक सहभाग हा खूप मोठा असला पाहिजे.  तरची पक्षी जगतील, वाढतील नाहीतर काही दिवसानी काही पक्षी हे चित्रात आपल्या साहित्यातच राहतील.

लेखिका: श्रुती कुलकर्णी

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate