অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाण्यातले चमचे

पाण्यातले चमचे

पाण्यातले चमचे
आज जगभरात या पक्ष्यांच्या सहा उपजाती आढळतात. मोठ्या आकाराचे हे पक्षी पाणथळ जागी दिसतात. मोठे तलाव, नद्या, खाड्या ही यांची आवडीची ठिकाणे. साधारणत: यांच्या सर्व जाती ह्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या असतात, फक्त यातील एकच जात ही आपल्या गुलाबी फ्लेमींगोसारखी गुलाबी असते. मात्र भारतात ही जात काही सापडत नाही. भारतातील जात पांढऱ्या रंगाचीच असून प्रौढ पक्ष्यांच्या चोचीचे टोक पिवळे असते.

विणीच्या हंगामात त्यांच्या डोक्यावर डौलदार तुरा फुलतो आणि छातीवर पिवळा पट्टा दिसतो. यांच्या पिल्लांची चोच मात्र गुलाबी असते. यांचे शरीर जरी पांढरेशुभ्र असले तरी उडताना मात्र पंखांच्या टोकाला काळा रंग प्रामुख्याने नजरेत भरतो. या सर्वच पक्ष्यांची चोच खास आकाराची असते. अगदी आपल्या चमच्यासारखी ती दिसते आणि तसेच कामसुद्धा करते म्हणूनच यांचे नाव "चमच्या" किंवा इंग्रजीमध्ये स्पूनबील असे सार्थ आहे. हे पक्षी उथळ पाण्यात उभे रहातात आणि आपली लांब चमच्यासारखी चोच पाण्यात आडवी फिरवत रहातात.

चोचीला काही मासे, बेडूक किंवा तत्सम खाद्यपदार्थ लागले तर ती चोच पटकन बंद करून ते तो प्राणी गिळून टाकतात. विणीच्या हंगामात नर मादी मोठ्या झुडपांवर काटक्यांचा ढिग जमवून त्याचे घरटे करतात. सहसा हे पक्षी बगळ्यांसारखे एकत्र घरटी करून रहातात. मादी घरट्यात ३ ते ५ अंडी घालते. अंड्यांचे आणि पिल्लांचे पालन पोषण नर मादी जोडीने करतात. या पक्ष्याला मी सर्वप्रथम बघितले ते म्हैसुर जवळच्या श्रीरंगपट्ट्नम येथील रंगनथिट्टू या पक्षी अभयारण्यात.

सकाळच्या वेळी बोटीतून फेरी मारताना अनेक नविन पक्षी दिसत होते. मधेच एखादी मगर वरून पडलेले बगळ्याचे पिल्लू गट्टम करत होती. तिथेच एका मोठ्या खडकाजवळ यांची ३/४ लहान पिल्ले पाण्यात खेळत होती आणि मध्येच पाण्यात आपल्या चमच्या चोचीने मासे पकडून खात होती. त्या अवखळ पिल्लांचे पाण्यात खेळणे आणि त्यांच्या गुलाबी चोची उन्हात चमकताना बघणे हे दृष्य कायम लक्षात रहाण्यासारखे होते. त्यावेळी फिल्म कॅमेरे असल्यामुळे आणि लांब पल्ल्याची झूम लेन्स नसल्यामुळे मला काही त्यांची छान छायाचित्रे काढता आली नाहीत पण ते दृष्य अजुनही मी कधीच विसरू शकत नाही. यानंतर उरण येते स्थलांतरीत पक्षी बघण्यासाठी नियमीत जाताना लहान मोठ्या बगळ्यांच्या गर्दित हे पक्षी मला परत दिसले.

बगळ्यांसारखेच पांढरे पण काहीचे मोठे आणि त्यांची चोच जर बारकाईने बघितली तर त्यांचे वेगळेपण सहज लक्षात यायचे. उडताना हे पाय ताणून आणि चोच सरळ पुढे ठेवून उडतात. त्यामुळे उडतानासुद्धा त्यांच्या चोचीचे वेगळेपण सहज ओळखता येते. त्यातून सहसा हे एकदम उडले की मोठ्या थव्याने उडतात त्यामुळे आकाशात त्यांचे उडणे हे पटकन वेगळे जाणवते. नांदूर माधमेश्वर, भिगवण, भरतपूर अश्या ठिकाणी हे आपल्याला हमखास बघायला मिळणार.

गेल्या वर्षी वेलावदार ला काळवीटे बघायला जाताना मधे लोथलच्या जवळ एका पाणवठ्यावर मोठ्या प्रमाणावर आम्हाला पेलीकन आणि हे चमचे दिसले. अर्थातच पेलीकन आमच्याकरता नविन असल्यामुळे आम्ही त्यांच्या छायाचित्रणाच्या मागे लागलो. पण सतत पेलीकनच्या आसपास या चमच्यांची लुडबुड जाणवत होती. त्या तीथून पुढे वेलावदारला पोहोचल्यावर तिथल्या तळ्यात सुद्धा आम्हाला पेलीकन आणि हे चमचे दिसले. पेलीकनच्या तावडीतून सुटलेल्या माश्यांवर बहुतेक हे चमचे ताव मारत असावेत, कारण पेलीकनच्या आसपासच हे आपली लांब चोच पाण्यात घालून मान सतत डावीकडे, उजवीकडे हलवत आत पाण्यात मासे पकडायचे.

मासा मिळाला की तो ते पटकन गिळायचे आणि परत चोच पाण्यात बुडवून मासे शोधायचे. कधी कधी एकाच माश्याच्या मागे लागल्यामुळे त्यांची धावपळ आणि मारामारीसुद्धा व्हायची. स्थीर कॅमेरात हे सर्व काही टिपणे शक्य नसले तरी ही दृष्ये कायम लक्षात राहाण्यासारखी आहेत.

लेखक : युवराज गुर्जर

स्त्रोत : युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate