অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डॉ. सलीम अली - भारताचा पक्षितज्ज्ञ

डॉ. सलीम अली - भारताचा पक्षितज्ज्ञ

“शिकार केलेल्या एका पक्ष्याच्या गळ्यावरचा पिवळा पट्टा पाहून सलीमच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं. त्या पक्ष्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या निमित्तानं ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’चे विल्यम मिलार्ड यांच्याशी सलीमची भेट झाली. सलीमची पक्ष्यांविषयीची विलक्षण उत्सुकता पाहून मिलार्ड यांनी त्याला पक्षिनिरीक्षण करण्यास प्रोत्साहन दिलं. मुंबईच्या जवळपास सापडणारे पक्षी, त्यांच्या हालचाली, सवयी यांचं निरीक्षण करण्याचा सलीमचा प्रवास इथूनच सुरू झाला...

लहानपणी पक्ष्यांची शिकार करणारा छोटा सलीम ते भारतीय पक्षिविज्ञान क्षेत्राचा जनक सलीम, असा अत्यंत समृद्ध जीवनप्रवास करणारे थोर पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली हे ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणून जगभरात ओळखले जातात. या सच्च्या पक्षिमित्राचं स्मरण करणं, त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्यच आहे! ‘पक्षी आणि परिसंस्था’ या वनराईच्या विशेषांकाच्या निमित्तानं डॉ. सलीम अली यांच्या आयुष्याचा घेतलेला हा धावता आढावा.

पक्ष्यांचा रीतसर अभ्यास करून तो सूत्रबद्ध पद्धतीनं मांडणारे डॉ. सलीम अली हे भारताचे पहिले पक्षितज्ज्ञ. अथक परिश्रम, चिकाटी न सोडता प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीनं अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाची साधीसोपी मांडणी करणं ही डॉ. सलीम अली यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्यं सांगता येतील. 12 नोव्हेंबर, 1896 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लहान असतानाच मातापित्याचं त्यांच्यावरचं छत्र हरपलं. शिकारीची आवड असलेल्या मामाच्या सान्निध्यात वाढलेल्या छोट्या सलीमलाही शिकारीची आवड वाटायला लागली. तो दहा वर्षांचा असताना घडलेल्या एका छोट्याशा घटनेनं मात्र त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शिकार केलेल्या एका पक्ष्याच्या गळ्यावरचा पिवळा पट्टा पाहून सलीमच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं. त्या पक्ष्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या निमित्तानं ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे विल्यम मिलार्ड यांच्याशी सलीमची भेट झाली. सलीमची पक्ष्यांविषयीची विलक्षण उत्सुकता पाहून मिलार्ड यांनी त्याला पक्षिनिरीक्षण करण्यास प्रोत्साहन दिलं. मुंबईच्या जवळपास सापडणारे पक्षी, त्यांच्या हालचाली, सवयी यांचं निरीक्षण करण्याचा सलीमचा प्रवास इथूनच सुरू झाला.

सेंट झेवियर्स महाविद्यालयात सलीमने प्रवेश घेतला खरा; पण इतर विषयांत, खासकरून गणितात त्याला अजिबात रस नव्हता. कौटुंबिक व्यवसायाच्या निमित्तानं त्याला म्यानमारला जावं लागलं; मात्र व्यवसायात मन न रमल्यानं तिथेही त्यानं पक्षिनिरीक्षण सुरू ठेवलं. ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. एका पक्षी अभयारण्यात त्याला ‘वाटाड्या’ची नोकरीही मिळाली; पण त्यामुळे पक्षिनिरीक्षणाला पुरेसा वेळ त्याला मिळेना. ती नोकरी सोडून पक्षिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तो जर्मनीला गेला. तिथल्या ‘बर्लिन’ विद्यापीठा’च्या प्राणिशास्त्रविषयक संग्रहालयात जाऊन पक्षितज्ज्ञ प्राध्यापक एरविन स्ट्रेसमान यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पक्षिशास्त्राचा अभ्यास सुरू केला.

पुढे भारतात परत आल्यावर डॉ. सलीम अली यांना आर्थिक अडचणींचा आणि इतर संघर्षांचा सामना करावा लागला. या काळात त्यांच्या पत्नीनं केलेलं सहकार्य आणि पक्षिनिरीक्षणाचा त्यांचा छंद जोपासण्यासाठी त्यांना दिलेला भक्कम आधार या बाबी, अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. याच काळात डॉ. अली महाराष्ट्रातल्या रायगडजवळच्या किहिम इथे स्थायिक झाले. आपसूकच त्यांना पक्ष्यांचं सान्निध्य लाभलं. डॉ. अली यांच्या महत्त्वपूर्ण अभ्यासातला ‘सुगरण (बया) पक्ष्याविषयीचा अभ्यास’ हा विषय त्यांनी इथेच पूर्ण केला. अनेक महिने, तासन्तास निरीक्षणं करून त्यांनी या पक्ष्याच्या प्रजनन पद्धतीचा अभ्यास समर्थपणानं मांडला, जो पक्षिनिरीक्षकांसाठी मार्गदर्शक समजला जातो. हा पक्षी अस्तित्वात नाही असे नंतरच्या काळात मानलं जायला लागलं; पण प्रयत्नपूर्वक प्रवास, सातत्यपूर्ण निरीक्षणं यांतून त्यांनी या पक्ष्याचं कुमाऊं टेकड्यांच्या परिसरातलं अस्तित्व शोधून काढलं.

सैबेरिअन करकोच्याविषयीचं डॉ. अली यांचं संशोधन या क्षेत्रातला मैलाचा दगड म्हणावं असंच आहे. या पक्ष्याविषयी माहीत नसलेल्या विविध बाबी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी जगासमोर मांडल्या. करकोचा हा मुख्यतः शाकाहारी पक्षी आहे, हे त्यामधलंच एक निरीक्षण जगभरातल्या शास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडणारं!

‘पक्षिशास्त्रातलं बायबल’ समजलं जाणारं ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ (1941) ही डॉ. अलींची पहिली ग्रंथरूपी देणगी. त्याचसोबत त्यांनी एस. डिलॉन रिपले यांच्यासोबत लिहिलेलं ‘हँडबुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान’चे दहा खंड, भारतीय उपखंडातल्या पक्ष्यांविषयीची चित्रमय मार्गदर्शिका; तसंच केरळ, सिक्कीम, पर्वतीय प्रदेश यांमध्ये आढळणार्‍या पक्ष्यांविषयीची पुस्तकं ही अभ्यासकांसाठी एक प्रकाशमय वाटच आहे. त्यांनी ‘द फॉल ऑफ अ स्पॅरो’ या नावानं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहेत.

पक्ष्यांच्या अभ्यासासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणार्‍या या महान शास्त्रज्ञाचा सन्मान जगभरात केला गेला. ‘ब्रिटिश ऑर्निथॉलॉजी युनियन’तर्फे दिलं जाणारं सुवर्णपदक मिळवणारे ते पहिले अब्रिटिश होते. वन्यजीव संवर्धनविषयक प्रतिष्ठेचे जे. पॉल गेटी पारितोषिक; पद्मभूषण, पद्मविभूषण हे नागरी पुरस्कार; ‘ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क’ सन्मान हे त्यामधले काही महत्त्वाचे पुरस्कार! अत्यंत नम्र असलेल्या अलींनी त्यांना मिळालेल्या विविध पारितोषिकांच्या मानधनांच्या रकमा पक्षिसंवर्धनासाठी देणगी स्वरूपात बहाल केल्या.

दोन विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट मिळालेल्या अलींनी औपचारिक पदवी शिक्षण पूर्ण केलं नव्हतं हा एक गमतीशीर योगायोग! ‘बी.एन.एच.एस.’ला सरकारी साहाय्य मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पंतप्रधानांशी बोलणी केली होती. कोणतंही मत, मग ते कितीही मोठ्या व्यक्तीनं मांडलेलं असेल; तरीही स्वतः डोळसपणे अभ्यास करून त्यावर विश्वास ठेवावा असंच त्यांचं धोरण होतं.

वयाच्या 91व्या वर्षी दि. 20 जून, 1987 रोजी डॉ. सलीम अली यांचं निधन झालं. गोव्यातल्या पक्षी अभयारण्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. हिमालयात आढळणार्‍या एका पक्षिप्रजातीला "Zoothera Salimalii' असं नाव त्यांच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. पक्षिप्रेमाबरोबरच निसर्गसंरक्षण, संवर्धन यांमध्येही डॉ. सलीम अली यांचं योगदान महत्त्वपूर्ण तसंच प्रेरणादायी असंच आहे.

लेखक: रविराज दामले, पुणे, संपर्क: ravirajdamle@gmail.com

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate