অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्राह्मणी बदक

ब्राह्मणी बदक

ह्या देखण्या बदकाला इंग्रजीमधे "रूडी शेल्डक" किंवा "ब्राम्हणी डक" असे म्हणतात. ही जात बदक, कादंब आणि हंस या वर्गात येते. या बदकाच्या नावाप्रमाणेच यांचा उठावदार लालसर, पिवळा रंग असतो आणि शेपूट काळी असते. पंखांचा उडताना काळा, पांढरा रंग दिसून त्यावर एक मखमाली झळाळदार हिरव्या रंगाचा पट्टा असतो. नर मादी दोघेही दिसायला सारखेच असले तरी मादीच्या डोक्याचा रंग जरा जास्त फिकट, पांढरट असतो आणि नराला विणीच्या हंगामात गळ्याच्या खाली एक काळी बारीक पट्टी असते.

सहसा हे बदक जोडी जोडीनेच फिरताना दिसते किंवा क्वचीत त्यांचा छोटा थवा असतो. इतर बदकांपेक्षा हे आकाराने मोठे आणि उंचीने जास्त उंच असते. सर्व जगभरात ही जात आढळत असली तरी भारतात ती स्थलांतर करून येतात. एरवी कमी संख्येत असली असली तरी मागे एकदा नेपाळमधे स्थलांतराच्या वेळी त्यांच्या कित्येक हजारांचा मोठा थवा बघितल्याची नोंद आहे.
विणीच्या हंगामात मात्र ती जोडीजोडीने फिरतात आणि घरट्याच्या जागेपासून जवळच अंतरावर खाण्यासाठी नदीवर किंवा तळ्यावर आलेली आढळतात.

नवलाची गोष्ट म्हणजे विणीच्या हंगामानंतर ह्या बदकांची संपुर्ण पिसे गळून जातात आणि साधारणत: ४ आठवडे ही बदके उडू शकत नाहीत. अर्थातच ह्या वेळी शत्रुंपासून त्यांना बराच धोका असतो. घरट्याकरता त्यांना झाडांच्या ढोली, कपारी, जमिनीलगतच्या भिंतीमधले खड्डे लागतात. मादी त्यात ६ ते १६ पिवळसर, पांढरी अंडी घालते आणि ही अंडी अंदाजे ३० दिवसात उबवली जातात. ही बदके मिश्राहारी असतात. त्यांना झाडपाल्याचे कोंब, बिया जश्या लागतात तसेच त्यांना शंख, शिंपले, पाण्यातील किटक, नाकतोडे, बेडूक हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.

जगभरात या जातीच्या बदकांची संख्या खुप आहे त्यामुळे यांना अस्तंगत होण्याचा धोका तसा नाही, पण तरीसुद्धा यांची मांसाकरता शिकार मोठ्याप्रमाणावर होत असते. हे बदक तसे अतिशय सावध असते आणि स्वत:बरोबर इतर बदकांनासुद्धा ते मोठ्या मोठ्याने ओरडून धोक्याचा इशारा देतात. स्वभावाने ही भांडकुदळ असतात. खाण्यासाठी आणि इतर वेळीसुद्धा ती इतर बदकांच्या आसपास दादागिरीने फिरत असतात आणि आपल्या मोठ्या आवाजाने त्यांना घाबरवत असतात. त्यांचा एखादा थवा जर पाण्यात असेल तर त्यांचा आवाज अतिशय दुरवर ऐकू जातो.

महाराष्ट्रात किंवा बाहेरही ही आपल्याला हिवाळ्यात नदी, मोठे तलाव, बंधारे येथे हमखास दिसतात. यांचा रंग एवढा सुरेख आणि वेगळाच असतो की त्यांना एकदा तुम्ही बघितले की परत त्यांना तुम्ही सहज ओळखणारच. दिसायला जरी ही बदके सुंदर असली तरी छायाचित्रणासाठी मात्र कठीण आहेत. एकंदरच जलाशयाचा आकार मोठा असल्यामुळे जर ह्या व इतर बदकांचे तुम्हाला छायाचित्रण करायचे असेल तर मोठ्या पल्ल्याच्या लेन्सची गरज असते. ही बदके खुप सावध असतात त्यामुळे जर का त्यांना थोडी जरी धोक्याची अथवा आपली जाणीन झाली तर पोहत पोहत किंवा उडून ती लांब दूरवर पाण्यात जातात आणि मग छायाचित्रण काही शक्य होत नाही. नाशीक मधे नांदूर मधमेश्वर, सोलापूर जवळचे भिगवण, जायकवाडी, मायणी, भरतपूर अश्या ठिकाणी ही बदके हमखास तुम्हाला दिसणार.

मागे लोणार सरोवर बघायला गेलो असताना, तलावाजवळील काठावरील दाट झाडीत आम्ही विश्रांती घेत होतो. पुर्ण तळ्याला चक्क्र उन्हात मारल्यामुळे त्याचा थकवा आम्हाला जाणवत होता. अचानक मोठ्या आवाजामुळे आमची झोपमोड झाली, बघितले तर जवळच पाण्यात ह्या बदकांचा एक थवा आपापसात मारामारी करत होता. त्यांना आमची चाहूल बोलकूल न लागल्यामुळे ती आमच्यापासून एकदम जवळ होती आणि त्यामुळे आम्हाला त्यांचे अगदी निट जवळून निरीक्षण करता आले. अर्थातच त्यावेळी कॅमेरा नसल्यामुळे त्यांचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. त्यानंतरसुद्धा या बद्कांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बघितले पण यावेळी रणथंभोरच्या जंगलात पदम तलावात एक जोडी अतिशय काठाजवळ आणि आमच्या कॅंटरजवळ आली आणि त्यामुळे मला त्यांचे सहजासहजी छायाचित्रण करता आले.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate