অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिरभिरणारी भिंगरी

भिरभिरणारी भिंगरी

भिरभिरणारी भिंगरी

पाकोळ्या आणि भिंगऱ्या (स्विफ्ट आणि स्वॉलो) हे हवेत लिलया उडणारे आणि कसरती करणारे पक्षी आहेत. यांचा उडण्याचा वेग आणि कसब हे खरोखरच अचंबित करणारे असते. ह्या पक्ष्यांचे प्रमुख अन्न उडते किटक असते आणि ते मिळवण्यासाठी ते हवेतल्या हवेतच त्यांची शिताफीने शिकार करतात. ह्या पक्ष्यांची चोच जर आपण बारकाईने बघितली तर ती अगदीच लहान असते आणु त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की हे पक्षी उडता उडता सिकार कसे करतात ? पण जर का आपण ह्यांचे तोंड बघितले तर ते प्रचंड प्रमाणात वासले जाते त्यामुळे उडता उडता त्यांना मोठ्या प्रमाणात किटका त्यांच्या ह्या वासलेल्या तोंडात पकडता येतात. ह्यांच्या चोचीला त्यांच्या तोंडाजवळ मिशीसारखे काही उलट वळलेले केससुद्धा असतात. ह्या उलट्या केसांचा फायदा त्यांना बारीक किटक तोंडातच अडकवून ठेवण्यासाठी होतो.

खास करून ह्या जातीची भिंगरी ही पाण्याजवळ आढळते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर ती त्या पाण्यावर असलेल्या माश्या, डास आणि इतर किटक ह्यांचा फन्ना उडवते. ह्या पक्ष्यांचा वावर संपुर्ण भारतभर आणि आसपासच्या देशांमधे असला तरी हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीमधे हे पक्षी दक्षिणेकडे उबदार प्रदेशात स्थलांतर करताना आढळतात. ही भिंगरी आकाराने लहान म्हणजे साधरणत: चिमणीएवढी असते. तीच्या शरीरावरचा रंग गडद चमकदार निळा असुन डोके फक्त लालसर तपकीरी असते. बाकी छाती आणि पोटाकडचा भाग हा अगदी कापसासारखा पांढरा शुभ्र असतो. त्यांना ओळखायची सर्वात महत्वाची खुण म्हणजे ह्यांच्या शेपटीला अगदी पातळ तारेसारखी दोन कडेला दोन पिसे असतात.

नराला ही पिसे लांब असतात तर मादीची पिसे आखुड असतात. ह्या पिसांवरूनच त्यांना इंग्रजीमधे "वायर टेल्ड स्वॉलो" असे म्हणतात. ह्या भिंगऱ्या त्यांच्या आयुष्याचा बराच काळ आकाशात उडता उडताच घालवतात. अगदी त्यांचे खाणे आणि पाणी पिणेसुद्धा हवेतल्या हवेत उडता उडताच होते. हे पक्षी पाण्याजवळून चिखल जमा करून जवळच्या कपारीत, खोबणीत किंवा हल्ली अगदी शहरांमधे इमारतींच्या छज्ज्यांखालीसुद्धा अर्धवतुळाकार, खोलगट वाडगा बनवून त्यात सुमारे ४/५ अंडी घालतात. यांच्या काही जाती एकेकटी घरटी करतात तर काही जाती समुहाने अगदी शेकड्याने घरटी एकत्र करतात. ह्या पक्ष्यांचे पाय अगदी लहान आणि दुबळे असल्यामुळे सहसा हे जमिनीवर, फांदीवर चालतच नाहीत.

अगदी घरट्यातसुद्धा पिल्लांना भरवताना जेमतेम ते ह्या पायाने घरट्याच्या भिंतीचा आधार घेउन उडता उडताच पिल्लांना अन्न भरवतात. गेल्याच आठवड्यात ठाण्याच्या खाडीवर मुनीया पक्षी किंवा इतर काही स्थलांतरीत पक्षी आले आहेत का ? यासाठी गेलो असताना अगदी सुरवातीलाच पाण्यामधे एका फांदीवर ह्या पक्ष्यांची जोडी बसलेली आढळली. सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात त्यांच्या पोटाकडचा पांढराशुभ्र भाग अतिशय छान चमकत होता एवढ्यात त्यातील लांब शेपुट असणारा नर उडून गेला आणि आम्ही हिरमुसले झालो. त्यात ती मादीसुद्धा लगेच उडून गेली. आम्ही आपले हताश होऊन पुढे जाउ या असा विचार करून कॅमेरे सरसावून निघालो. एवढ्यात ती मादी परत त्याच फांदीवर येउन बसली. ह्यावेळी ती पाठमोरी असल्यामुळे त्यांच्य पंखावरचा निळा रंग उन्हात अगदी झळाळत होत.

आम्ही आमचे कॅमेरे सज्ज करून बसलो. थोड्याच वेळात नर सुद्धा परत आला आणि मला त्यांची छायाचित्रे मिळाली. मन भरत नसल्यामुळे आम्ही तिथेच रेंगाळलो. चक्क त्यांचे मोठे झालेले पिल्लू उडत त्यांच्या मधे येउन फांदीवर बसले आणि मला त्यांचा "फॅमिली फोटो" मिळाला. यामुळे एकंदरच काहीही ठरवले नसताना चक्क नशिबानेच मला ह्या डास, माश्यांवर पेस्ट कंट्रोल करणाऱ्या भिंगऱ्यांची छायाचित्र मिळून गेली.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate