অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वीणा पक्षि

वीणा पक्षि


वीणा पक्षी मेन्युरा सुपर्ब (नर).

वीणा पक्षि : पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (यष्टिसादी) गणातील मेन्युरी उपगणात या पक्ष्याचा समावेश होतो. हा मेन्युरिडी कुलातील असून ह्याच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव मेन्युरा सुपर्ब असे आहे. हा पक्षी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात राहणारा असून याच भागात पण फक्त दाट वर्षारण्यात राहणारी याची आणखी एक जात मे. आल्बर्टाय आढळते. स्वरूप आणि आचरण या दोन्ही दृष्टींनी हा पक्षी असामान्य आहे .


इ. स. १७९८ मध्ये या पक्ष्याचा प्रथम शोध लागला; त्या वेळी त्याला वेगवेगळी नावे दिली गेली; पण याच्या पूर्णपणे पसरलेल्या शेपटीचे ग्रीक वीणेशी असलेले साम्य नजरेस आल्यामुळे, १८२० च्या सुमारास याला लायरबर्ड (वीणा पक्षी) हे नाव देण्यात आले. याच्या सुशोभित शेपटीमुळे पुष्कळांना या पक्ष्याविषयी आस्था वाटू लागली.

वीणा पक्षी साधारणपणे कोंबडीएवढा असतो. पिसारा तपकिरी रंगाचा असतो. शेपूट लांब आणि शोभिवंत असते; पण ज्या वेळी तो ती पसरतो त्या वेळी ती फारच सुंदर दिसते. शेपटीमध्ये १२ तंतुरूप पिसे, २ तारेसारखी पिसे (यांना अभिमर्शक म्हणतात) आणि २ तितकीच लांब पण जास्त जाड आणि मजबूत (सरासरी ७६ सेंमी. लांब व ४ सेंमी. रूंद) पिसे असतात; या लांब व जाड पिसांची खालची बाजू रूपेरी-अंजिरी रंगाची असून तिच्यावर सोनेरी-उदी रंगाची चंद्रकोरीच्या आकृतीची चिन्हे असतात आणि त्यांची वाकलेली टोके काळी असतात. मादी इतर बाबतीत नरासारखीच असते, पण तिची शेपटी बळकट असली, तरी शोभिवंत नसते. याचे पाय, पावले आणि बोटांवरील नखर फार मजबूत असतात. हा पक्षी गांडुळे, किडे आणि इतर लहान प्राणी खातो. खाद्य शोधण्यासाठी जमीन उकरून माती वरखाली करण्याकरिता आणि घोळण्याकरिता त्याला नखरांचा उपयोग होतो. पंख आखूड असतात व त्यांच्या मदतीने थोड्याफार लांबवर तो उडू शकतो; पण याचे उडणे बरेच मर्यादित असते. तो एका झाडावरून किंवा खडकावरून जवळच्या दुसरया झाडावर अथवा खडकावर उडत जातो.

वीणा पक्ष्याचा विणीचा हंगाम शरद ऋतूच्या मध्यापासून वसंत ऋतूच्या सुरूवातीपर्यंत असतो. या दिवसांत ज्या लहानलहान प्राण्यांवर यांचा उदरनिर्वाह चालतो ते विपुल असतात. प्रियाराधनाच्या काळात नर अरण्यात थोडीशी जमीन साफसुफ करून त्यावर सु ९० सेंमी. व्यासाचा एक थोडा उंच ‘मंच’ तयार करतो. अशा प्रकारचे १० किंवा अधिक मंच एका पक्ष्याच्या मालकीचे असू शकतात. या मंचांवर नर आपल्या सुंदर शेपटीची पिसे मोठ्या थाटाने पसरून व उभारून डौलाने नाचतो. शेपटी पसरताना तिच्यातली दोन जाड पिसे शरीराच्या दिन्ही बाजूंना वळविलेली असतात आणि या दोहोंच्या मधली तंतुरूप बारा पिसे पूर्णपणे पसरून शरीरावरून पुढच्या बाजूकडे वाकविलेली असतात. (मे. सुपर्ब या वीणा पक्ष्याची पसरलेली पिसे व सुटे पीस यांसाठी मराठी विश्वकोशाच्या खंड ९ मधील क्र. ४६ व५० ची चित्रपत्रे अनुक्रमे पहावीत). नाचत असताना किंवा ठुमकत मुरडत चालत असताना नर मोठ्या उत्साहाने गात असतो. हा संपूर्ण देखावा फारच सुंदर असतो. इतर पक्षी व प्राणी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यात हा पक्षी फार तरबेज आहे.

घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिल्लाला खाऊ घालून त्यांचे संगोपन करणे इ. कामे मादी करते. घरटे मोठे घुमटाकार असून काटक्यांचे बनविलेले असते. त्याच्या एका बाजूवर दार असते. घरटे मोठ्या झाडांच्या खोडावर, खुंटावर किंवा उंच ठिकाणी फांद्यांच्या दुबेळक्यात अथवा खडकांच्या कंगोर्य़ादवर बांधलेले असते. मादी जांभळट तपकिरी रंगाचे एकच अंडे घालते आणि पाचसहा दिवसांनंतर ते उबवायला सुरूवात करते. सरासरी सहा आठवड्यांनी अंडे फुटून पिल्लू बाहेर पडते. त्याचे शरीर काळ्या मऊ पिसांनी झाकलेले असते व त्याला मुळीच दिसत नाही. मादी त्याचे रक्षण करते. संकटाचा संशय येताच पिल्लू कानठळ्या बसतील इतक्या मोठ्या कर्कश आवाजात ओरडते.

केवळ शेपटीकरिता म्हणून माणसाने हजारो वीणा पक्ष्यांची क्रूरपणे हत्या केली आहे. लोकांनी शेपट्या विकण्याचा धंदा सुरू केला. अशा परिस्थितीत हा पक्षी केव्हाच नामशेष झाला असता; पण कायद्याने याला संरक्षण मिळाल्यामुळे तो अजून अस्तित्वात असून विलुप्त होण्याची  भीती नाही.

लेखक - ज. नी. कर्वे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate