অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एक्टोप्रॉक्टा

एक्टोप्रॉक्टा

(ब्रायोझोआ). जलीय (पाण्यात राहणाऱ्या) स्थानबध्द निवहप्राण्यांचा (वसाहत करून राहणाऱ्या प्राण्यांचा) समूह. पूर्वी हा समूह फोरोनिडा आणि ब्रॅकिओपोडा यांच्याबरोबरच मॉलस्कॉयडिया संघातील एक वर्ग मानीत असत. परंतु हल्ली याला वर्गीकरणात स्वतंत्र संघाचे स्थान दिलेले आहे. यांना शैवाल प्राणी, प्राणिद्रुम (झाडांसारखे प्राणी), पॉलिझोआ वगैरे नावेही दिलेली आहेत. यांच्या सु. ३,००० जिवंत जाती असून बहुतेक समुद्रात राहणाऱ्याआहेत. पण काही गोड्या पाण्यातही राहतात.  समुद्री जाती उथळ त्याचप्रमाणे खोल पाण्यातही आढळतात. निवह खडकांना, समुद्रतृणांना किंवा इतर पदार्थांना चिकटलेले असतात; काही विणलेल्या चटईसारखे तर काही खडकांवर पातळ पापुद्र्यासारखे पसरलेले असतात.

निवहातील प्रत्येक सामान्य प्राणी सूक्ष्म व द्विपार्श्व-सममित (दोन सारखे भाग पडणारा) असतो; त्याला जीवक (निवहातील व्यक्ती) म्हणतात. त्याचे शरीर मऊ व नाजूक असून ते नलिकाकार, कायटिनी, कॅल्शियममय किंवा श्लेषीय (सरसासारख्या पदार्थाच्या) आवरणात (जीवकधानीत म्हणजे जीवकाच्या घरात) असते. ब्युग्यूलासारख्या काही जातींमध्ये जीवकधानीच्या बाह्य पृष्ठावर पक्ष्याच्या डोक्याच्या आकाराचे चंचुभप्रवर्ध (पुढे आलेले चोचीसारखे भाग) असतात; यांच्या चोचीसारख्या भागाची उघड-मीट होत असते. आगंतुक प्राण्यांपासून संरक्षण करणे हे यांचे कार्य असून ते रूपांतरित जीवक असावेत असा समज आहे. आहार-नाल (अन्नमार्ग) पूर्ण व U अक्षराच्या आकाराचा असून देहगुहेत (मध्यस्तरापासून उत्पन्न झालेल्या व मध्यस्तराचे अस्तर असलेल्या शरीरातील पोकळीत) असतो; मुखाभोवती प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणारे) लोफोफोर (घोड्याच्या नालाच्या आकाराचे इंद्रिय) असून त्याच्यावर पक्ष्माभिकामय (केसासारख्या बारीकतंतूंनी युक्त) संस्पर्शक (स्पर्शज्ञान, पकडणे, चिकटणे वगैरे कामांसाठी उपयोगी पडणारी लांब सडपातळ व लवचिक इंद्रिये) असतात. गुदद्वार लोफोफोरच्या बाहेर असते. देहगुहा मोठी असून तिला पर्युदराचे (पातळ पटलाचे) अस्तर असते. परिवहनांगे (द्रव पदार्थांचे अभिसरण करणारी इंद्रिये), वृक्कक (निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकणारी नळीसारखी इंद्रिये) किंवा श्वसनांगे नसतात; मुख आणि गुदद्वार यांच्या मध्ये तंत्रिकागुच्छिका (मज्जातंतूंच्या पेशींचा समूह) असते. बहुतेक एक्टोप्रॉक्टांच्या देहभित्तीच्या ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांमध्ये) स्रवणाने कॅल्शियममय कंकाल (सांगाडा) तयार झालेला असतो.

अन्न मिळविण्याकरिता संस्पर्शक पूर्णपणे लांब करण्यात येतात; त्यांच्या पक्ष्माभिकांच्या हालचालींमुळे पाण्यात प्रवाह उत्पन्न होऊन तो एकसारखा मुखाकडे ढकलला जातो व त्यातून अन्न (सूक्ष्मजीव) मुखात जाते.

एक्टोप्रॉक्टांचे जनन लैंगिक पद्धतीने होते. प्राणी सामान्यत: उभयलिंगी (एकाच प्राण्यात नर व मादी यांची जननेंद्रिये असणारे) असतात. जनन-ग्रंथी देहगुहेच्या अस्तरापासून तयार होतात. अंड्यांचे निषेचन (अंडे आणि शुक्राणू यांचा संयोग) देहगुहेत होतो आणि देहगुहेच्या एका परिवर्तित भागात (अंडौकात म्हणजे भ्रूण ठेवण्याच्या जागेत) त्यांच्या विकासाने भ्रूण तयार होतात; भ्रूणाच्या वाढीने ट्रोकोफोर डिंभ [अळीसारखी अवस्था  डिंभ] तयार होतो आणि त्याच्यापासून रूपांतरणाने प्रौढ प्राणी उत्पन्न होतो. प्रत्येक प्राण्याच्या मुकुलनाने (बारीक अंकुरासारखे उंचवटे उत्पन्न होऊन नवीन प्राणी तयार होण्याने) निवह तयार होतो. गोड्या पाण्यातील जातींचे निवह स्टॅटोब्लास्टांपासून (प्राण्याच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या आणि प्राणी मेल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या ‘हिवाळी अंड्यां’ पासून) तयार होतात. पुष्कळ एक्टोप्रॉक्टांच्या अंगी पुनरुत्पादनाची बरीच शक्ती असते. निवहाचे नाहीसे झालेले भाग, संबंध जीवकधानी अथवा तिचे भाग पुन्हा उत्पन्न होतात.

एक्टोप्रॉक्टात क्रिस्टॅटेला, प्लुमॅटेला, ब्युग्यूला, फ्लुस्ट्रा, पॅल्युडिसेला इ. वंशांचा समावेश होतो. ब्युग्यूला सगळीकडे आढळणारा वंश असून समुद्राच्या उथळ पाण्यातील एखाद्या वस्तूला चिकटलेला असतो. क्रिस्टॅटेला व प्लुमॅटेला हे गोड्या पाण्यात आढळणारे वंश आहेत.

कित्येकदा गोड्या पाण्यातील एक्टोप्रॉक्टांची पाण्याच्या नळांमध्ये इतकी वाढ होते की, त्यातून पाणी वाहू शकत नाही.

लेखक : ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate