অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सापशिडी/साप सुरळी

साप सुरळी

ही गणेश, गणपती, सापाची मावशी व चोपई या स्थानिक नावांनीही ओळखली जाते. सापसुरळी सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या स्किंकिडी कुलातील प्राणी आहे. जुन्या जगात (युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांतील) उष्णकटिबंधात तिच्या सु. ४० प्रजाती आणि सु. ६०० जाती आढळतात.

वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांची लांबी १० ते ५५ सेंमी. पर्यंत असते. हालचालींसाठी चार पाय असून डोके त्रिकोणी व नाजूक असते. शेपटी लांब असून ती लवक्रर तुटते. शरीर बाह्यावरण ऑस्टिओडर्मपासून बनलेल्या चकचकीत खवल्यांचे असते. खवल्यांचा आतील भाग हाडांचा बनलेला असतो. ही हातात धरून ठेवता किंवा पकडता येत नाही. पंजाच्या तळाला आडवे तकट असून त्यावरील पेशींमध्ये हुकासारखी वाढ झाल्याने ती सिमेंटच्या भिंतीवर तसेच तक्तपोशीवरही चालू शकते. सापसुरळ्यांमध्ये घाणेंद्रिय तीक्ष्ण असून, काही वाळवंटी जाती जमिनीत पुरलेले कीटकही शोधून काढतात.

सापसुरळी ( माबुया कॅरिनॅटा)सापसुरळी ( माबुया कॅरिनॅटा)भारतात स्किंकिडी कुलातील माबुया लायगोसोमा, लीओलॉपिझ्मा, रिओपा व रिस्टेला या प्रजातींतील सापसुरळ्या आढळतात. माबुया प्रजातीत सु. १०५ जाती आहेत. माबुया कॅरिनॅटा ही सामान्य भारतीय जाती असून ती जंगलांत तसेच निमशहरी भागांत आढळते. ती जमिनीवर राहणारी असून दिनचर आहे. तिची लांबी सु. २९ सेंमी. असून शरीराचा वरील बाजूचा रंग तपकिरी, हिरवट वा काळपट असतो, तर खालील बाजू पांढरी किंवा पिवळसर रंगाची असते. कीटक व लहान पृष्ठवंशी प्राणी हे तिचे अन्न आहे.

सॅण्ड फिश

(ॲफिओमॉरस ट्रायडॅक्टिलस ). हिची लांबी सु. १८·५ सेंमी. असून ती वाळूत बिळे करून राहते. ती उ. आफ्रिका व द. आशियात भारत (राजस्थान) आणि पाकिस्तान येथे आढळते. ती निशाचर असून भुंगेरे व वाळवी हे तिचे अन्न आहे. ती हिवाळ्यात सुप्तावस्थेत जाते.

स्नेक स्किंक

(रिओपा पंक्टॅटा ). हिची लांबी सु. ८·५ सेंमी. असून तिचे लांबट शरीर सापासारखे दिसते. तिच्या पायांना पाच बोटे असतात. शरीराचा वरील बाजूचा रंग तपकिरी व खालच्या बाजूचा रंग पिवळसर पांढरा असतो. शरीराच्या वरील बाजूस ४ ते ६ रेषा दिसतात. ती बिळात राहते.

काही सापसुरळींच्या कानावर पडदे असून काहींमध्ये सापाप्रमाणे डोळ्यावर पारदर्शक व न हलणारा पडदा असतो (उदा.अब्लेफेरसकिटैबेलिफ्टिझिंगेरी ). कॅल्साइड सेप्सॉइड ही जाती सापाप्रमाणे अंग वाकडे तिकडे करून चालते. ट्रॅकिडोसॉरस रुगोसस् या जातीमध्ये डोक्याप्रमाणेच शेपटी आखूड व गोल असते आणि शत्रूंपासून संरक्षण करताना शेपटीकडूनही ती जोरात पळते. सामान्य जातींमध्ये स्वसंरक्षणाचे वेळी शेपटी लवक्रर तुटते व पुन्हा वाढते. स्किंकस स्किंकस ही जाती काही सेकंदांत सु. ९० सेंमी. पर्यंत स्वतःला जमिनीत पुरून घेऊ शकते.

ऱ्याच जाती पालापाचोळा, लाकूड, दगडाचे ढीग अथवा ओल्या जमिनीत बीळ करून राहतात. ट्रोपिडोफोरस ही जाती जलप्रमी आहे. मोठ्या जाती (उदा., सॅण्ड फिश) खादाड असून फळांचे तुकडे आणि किडे खातात. लहान जाती (उदा., स्नेक स्किंक) शांत व एकमेकांत मिसळणाऱ्या असतात, तर मोठ्या भांडखोर असतात. यूमेसेस सेप्टेंरिओनॅलिस आणि यू. ऑब्सोलेटस या जातींतील सापसुरळ्यांचा चावा वेदनाकारक; परंतु बिनविषारी असतो.

काही जाती पिलांना जन्म देतात. मात्र काही ६ ते १० अंडी घालून ५-६ आठवडे उबवितात. जुन्या जगातील कॉमन स्किंक ही जाती अल्जीरिया व आफ्रिकेमध्ये अन्न म्हणून खातात, तर अरब ती औषधी म्हणून खातात. बहुतेक जातींमध्ये आयुर्मान साधारण ५ ते ९ वर्षांचे आहे.

सापसुरळीपासून औषधी तेल काढतात.

---------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate