অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूर्यमासा

सूर्यमासा

सेंट्रार्किडी मत्स्यकुलातील अनेक प्रजातींमधील गोड्या पाण्यातील माशांना व मोलिडी मत्स्यकुलातील सागरी जातींच्या गटाला हे नाव देतात. सागरी सूर्यमासे बहुधा समशीतोष्ण व उष्णकटिबंधांतील समुद्रांत पाण्याच्या पृष्ठभागाजवळ विश्रांती घेत असलेले आढळतात.

सागरी सूर्यमाशाच्या मोला प्रजातीत दोन जाती आहेत. दोन्ही जातींचे मासे मोठे, बळकट व दणकट असतात. त्यांचे तोंड लहान; श्रोणिपक्ष व वाताशय नसते; त्वचा खरबरीत व जाड असल्याने ते बंदुकीच्या गोळीने जखमी होत नाहीत. ते शेपूट नसल्यासारखे दिसतात. सामान्य सागरी सूर्यमासा (मोला मोला) व तीक्ष्ण शेपटीचा सूर्यमासा (मॅस्टुरस लॅसिओलॅटस ) हे जवळजवळ ३·३५ मी. पर्यंत लांब असून त्याचे वजन दोन टनांपर्यंत असते. ते सागराच्या पृष्ठभागावर तरंगणारे विविध प्रकारचे अन्न आणि अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) जीव व लहान मासे खातात. शांत वातावरणात ते सूर्यस्नान करताना (पाण्यात डुबक्या मारताना) आढळतात. ते एकावेळी ३,००० दशलक्षांपर्यंत अंडी घालू शकतात; परंतु त्यातील बरीचशी अंडी मृत असतात.

गोड्या पाण्यातील सूर्यमाशांत ब्ल्यूगिल (लेपोमिस मॅक्रोकिरस) पंपकिन सीड (ले. गिब्बोसस ), हिरवा सूर्यमासा (ले. सायनेलस ) इत्यादींचा समावेश होतो. सामान्यतः त्यांचे शरीर फुगीर, दोन्ही बाजूंनी काहीसे चापट असून त्याचा रंग चमकदार हिरवा ते ऑलिव्हासारखा असतो; मात्र ब्ल्यूगिलमध्ये त्याच्या दोन्ही बाजूंवर नारिंगी ते लाल ठिपके असतात. बहुतेक जातींमध्ये कल्ल्यांच्या झाकणाच्या वरच्या कोपऱ्यात सुस्पष्ट व गर्द पापुद्र्यासारखी झडप असते.

सूर्यमासा (लेमोमिस गिब्बोसस)

सूर्यमासे डबकी, सरोवरे व संथ प्रवाहांत राहतात. त्यांना वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्रौढ अवस्था प्राप्त होते. त्यावेळी नर आपल्या शेपटीचा व शरीराचा उपयोग करुन तळाशी वाळूत सु. ६० सेंमी. रुंद उथळ घरटे तयार करतो. मादीने अंडी घातल्यानंतर त्यांचे निषेचन (फलन) झाल्यावर नर तिला तेथून हुसकावून लावतो. अंड्यातून पिले बाहेर पडून ती घरट्याबाहेर पडण्याइतपत मोठी होईपर्यंत नर घरट्याचे रक्षण करतो.

ब्ल्यूगिल सूर्यमासा सरासरीने १७–२० सेंमी. लांब असून त्याचे वजन २२० ग्रॅ. असते. तथापि त्याची चांगली वाढ झाल्यावर तो ३०–३५ सेंमी. लांब होतो आणि त्याचे वजन ६५० ग्रॅ. होते; परंतु त्यांची संख्या भरमसाट वाढल्यास कवचधारी प्राणी, गोगलगायी,सूर्यमासा (लेपोमिस गिब्बोसस) कीटक व डिंभ (अळ्या) हे त्यांचे खाद्य कमी पडल्यामुळे त्यांची शारीरिक वाढ खुंटते. जेथे परिस्थिती अनुकूल असेल तेथे शेतातील खाचरात काळ्या बासबरोबर ब्ल्यूगिल सूर्यमासा विस्तृत प्रमाणावर आणतात.

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate