অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामन

सामन

सामन

एक महत्त्वाचा खाद्य व छंद म्हणून मासेमारी केला जाणारा मासा. त्याचे ट्राउट माशाशी नाते आहे. तो उत्तर गोलार्धात सापडतो. सामनचे शरीर लांब असून त्यावर लहान चक्री य खवले असतात. एक लहान चरबीयुक्त पर पाठीवर असून तो गुदपराच्या विरुद्घ असतो. या माशात जास्त काटे नसतात. काही जाती सरोवरांमध्ये सापडतात. बहुतेक सामन मासे महासागर व सरोवरातून नद्यांमध्ये येऊन तेथे अंडी घालतात. सामान्यतः ते जेथे जन्मतात त्या ठिकाणी ते परत येतात. काही शास्त्रज्ञांच्या मते सामनला आपला मार्ग वासाच्या मदतीने सापडतो.

अटलांटिक सामन (साल्मो सलार ) अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंवर आढळतो. एके काळी तो हडसन नदीच्या उत्तरेकडील भागात सर्रास आढळत असे. सध्या तो पूर्व मेन व कॅनडातील थोड्या नद्यांतच आढळतो. प्रदूषण, नदीमुखाजवळील पार न करता येणारी धरणे, प्रमाणाबाहेरील मासेमारी, वनांच्या नाशामुळे अंडी घालण्याच्या ठिकाणांचा नाश व जलविद्युतनिर्मिती टरबाइनांत लहान माशांचा होणारा नाश यांमुळे सामनची संख्या घटली आहे. हा मासा पाच वर्षांचा झाल्यावर महासागरातून प्रथम नद्यांमध्ये स्थलांतर करतो. तेव्हा त्याचे अटलांटीक सामानवजन ३·६–७·२ किगॅ. झालेले असते. वाळूयुक्त नदीच्या तळावर तो अंडी घालतो.

पाच-सहा महिने अंडी वाळूत पुरली जातात, ती उबल्यावर पिले जन्माला येतात. मासा एक महिन्याचा झाल्यावर तो वाळूतून बाहेर पडून कवचधारी प्राण्यांवर उपजीविका करतो. त्यांच्या दोन्ही बाजूंवर गर्द उभे पट्टे व लाल ठिपके आल्यावर त्याला ‘पार’ म्हणतात. तिसऱ्या हिवाळ्याच्या शेवटी त्याच्या अंगावरील खुणा नष्ट होतात व तो रुपेरी रंगाचा होतो; तेव्हा त्याला ‘स्मोल्ट’ म्हणतात. यावेळी त्याची लांबी १२–१५ सेंमी. असते. स्मोल्ट प्रवाहाबरोबर वाहत जाऊन समुद्रात जातो. तेथे तो अन्य माशांवर आपली उपजीविका करतो. दोन वर्षांत त्याची झपाट्याने वाढ होते. नंतर प्रौढ सामन प्रवाहाविरुद्घ जाऊन अंडी घातल्यावर परत महासागरात येतो.

लँडलॉक्ड सामन (साल्मो सलार सिबॅगो ) हा अटलांटिक सामनचा एक प्रकार अमेरिकेच्या उत्तर भागातील काही सरोवरांत व मेरीटाइम प्रॉव्हिन्सेस येथे आढळतो.

पॅसिफिक सामनचा समावेश आँकोऱ्हिंकस प्रजातीत होतो. पूर्व पॅसिफिक महासागरात त्याच्या पाच जाती आढळतात. प्रौढ झाल्यावर तो नदीतून आपल्या मूळ ठिकाणी पोहचून तेथे वाळूत अंडी घालतो. किंग व कोट्टो सामनसारख्या काही जाती लांब पल्ल्याचा प्रवास करतात, तर गुलाबी व चम सामन प्रवाहाविरुद्घ थोडेच अंतर जातात. अंडी घालण्याचा हंगाम उन्हाळ्याची अखेर ते हिवाळ्याची सुरुवात असा असतो. प्रवाहाच्या तळाचा खळगा हे त्याचे घरटे असते. पॅसिफिक सामन अंडी घातल्यावर मरुन जातो. काही काळानंतर अंडयत बदल होतो, पिले प्रवाहाबरोबर जाऊन महासागरात उदरभरण करतात.

सा. लीव्हनेन्सिस ही जाती द. भारतात निलगिरी येथे आढळते. ती लॉक लीव्हन (स्कॉटलंड) येथून आणण्यात आली आहे. या माशाचा रंग हिरवट असून पार्श्विक रेषेच्या खाली ठिपके असतात. त्याचे डोके काहीसे मोठे असते.

गिबन्स स्टीलहेड (सा. गार्डनेरी गार्डनेरीस ) ही जाती मूळची कॅलिफोर्नियातील असून काश्मीर व निलगिरी येथे आणण्यात आली आहे. हा मासा सु. १,८०० मी. उंचीवरील उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांतील तळी, सरोवरे व प्रवाहात चांगला वाढतो. हिवाळ्यात त्याची पैदास होते व साधारणतः महिनाभरात अंडी उबून पिले जन्मतात. या माशाचे शरीर सापेक्षतः आखूड असून नरामध्ये मादीपेक्षा ते लांबट असते. डोके आखूड व तोंड लहान असते. रंग पोलादी निळा असतो व ताजेपणी त्यावर इंद्रधनुष्यी झाक असते. पार्श्विक रेषेच्या खाली ठिपके नसतात. आठव्या ते दहाव्या वर्षे त्याची वाढ थांबते. ६२–७१ सेंमी. लांबीचे व सु. ५·५ किगॅ. वजनाचे मासे सापडल्याचे उल्लेख आढळतात. हा मासा कीटकभक्षी आहे.

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

 

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate