অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोनमासा

सोनमासा

सोनमासा : या माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या (सांगाडा अस्थींचा बनलेला असतो अशा माशांच्या) सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कॅरॅसियस ऑरॅटस आहे. ही जाती घरगुती जलजीवालयात पाळण्याच्या दृष्टीने फारच लोकप्रिय आहे. ती मूळची पूर्व आशियातील असून तिचा प्रसार पुष्कळ देशांत झालेला आहे. आपल्या मूलस्थानात ती उथळ तळी व प्रवाहांत सापडते. यूरोप व उत्तर आशियातील क्रुसियन कार्प (कॅरॅसियस कॅरॅसियस) माशीशी तिचे जवळचे नाते आहे. रंग व लांब पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचाल व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी स्नायुमय घडी) या बाबतींत या दोन्ही जातींचे सामान्य ⇨ कार्प (साप्रिनस कार्पिओ) माशाशी साम्य आहे; परंतु त्यांच्या ओठावर सामान्य कार्पप्रमाणे सडपातळ स्पर्शग्राही रोम नसतात, हा यांच्यातील भेद आहे.

क्रुसियन कार्प या माशाची उत्परिवर्ती जाती म्हणून सोनमाशाचा उगम चीनमध्ये झाला. संग राजघराण्याच्या काळात [६००-१०७० (९२६-१२२९) याच्या दरम्यान] प्रथम सोनमासा माणसाळविला गेला. त्यानंतर तो १५०० च्या सुमारास जपान, १७०७ मध्ये यूरोप व १८७५ मध्ये अमेरिकेत नेला गेला. उष्ण कटिबंधातील इतर मासे पाळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सोनमासा कमी प्रमाणात पाळला जाऊ लागला, तरीही जपान व चीनमध्ये सोनमाशाचे प्रदर्शन, पालन व पैदास आणि त्याच्या वाणांची निवड या गोष्टी अजूनही विशेष लोकप्रिय आहेत.

सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस)
नैसर्गिक अवस्थेत सोनमाशाचा रंग सामान्यतः हिरवट तपकिरी किंवा करडा असतो. शरीराचा आकार व पर सामान्य कार्पसारखे असतात. त्याच्या रंगात खूप विविधता आढळते. पृष्ठपक्ष नसण्याची शक्यता असते आणि शेपटीचा पर त्रिखंडी असतो. डोळे प्रमाणापेक्षा बटबटीत असतात, असा खूप असामान्यपणा त्याच्यात आढळतो. चिनी व जपानी लोकांनी शतकानुशतके काळजीपूर्वक प्रयोग केल्यामुळे सोनमाशाच्या सव्वाशेहून अधिक अभिजाती निर्माण झालेल्या आहेत. जलजीवालयातील सोनमासा आपल्या नैसर्गिक अधिवासात गेला, तर काही पिढ्या झाल्यानंतर त्याला क्रुसियन कार्पसारखा शरीराचा आकार आणि हिरवा ते ऑलिव्ह रंग पुन्हा येतो.

सोनमासा सर्वभक्षक असून पाठीचा कणा नसलेले सूक्ष्म प्राणी व विशेषेकरून लहान कवचधारी प्राणी, कीटकांच्या अळ्या, कृमी, बेडकांची अंडी, गोगलगायी व मासे खातो, याचबरोबर विविध प्रकारच्या पाणवनस्पतीही खातो. पिलांची वाढ, प्रौढाचा आकार व रंग हे त्याच्या योग्य आहारावर अवलंबून असतात. घरात ठेवलेल्या जलजीवालयातील माशांच्या आहारात बारीक केलेल्या डासांच्या अळ्या, लहान जलकृमी, पूर्ण उकडलेल्या अंड्यांचा बारीक केलेला बलक, गोमांस, तृणधान्य इ. खाद्यांचा समावेश असतो.

सोनमाशांची मादी एक वर्षाची किंवा ७·५ सेंमी. लांब वाढली म्हणजे अंडी घालू लागते आणि पुढे सहा, सात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अंडी घालते. अंडी घालण्याचा हंगाम वसंत ऋतू किंवा उन्हाळा असून तो तापमानावर अवलंबून असतो. हंगाम जवळ आला म्हणजे रंग जास्त तेजस्वी होतो, मादीचे पोट वाढते. तसेच नराच्या कल्ल्यांच्या आच्छादनांवर टाचणीच्या डोक्याएवढी बारीक व तात्पुरती टेंगळे येतात. अशीच टेंगळे कधी कधी पाठीवर व अंसपक्षांवर (छातीवरील परांवर) सुध्दा येतात. अंडी घालण्यापूर्वी मादी खूपच हालचाल करू लागते. मादीचा पाठलाग नर करतो. अंडी बाहेर पडणे सुलभ व्हावे म्हणून ते आपली पोटे एकमेकांवर आपटतात. मादी ५००-२,००० अंडी घालते. अंडी बाहेर निसटल्यावर नर त्यांचे फलन करतो. नंतर अंडी पाण्यात बुडतात व आपल्या चिकट पृष्ठभागांनी पाणवनस्पतीला चिकटून बसतात. ५-९ दिवसांत व १८·३३°  से. तापमानास अंडी फुटून पिले बाहेर पडतात. पिले पुढील तीन दिवस त्या वनस्पतींना चिकटून राहतात व दरम्यान अंड्यांतील बलक शोषूक घेतात. त्यानंतर ती मुक्तपणे पोहू लागतात व खाणे सुरू करतात. ती करड्या हिरव्या रंगाची असून जलद वाढतात. ८-१० महिन्यांत आपला मूळ रंग धारण करतात. ती सु. ३० सेंमी.पर्यंत लांब वाढतात. पाळलेला सोनमासा २५ वर्षे जगतो; परंतु सरासरी आयुर्मान बरेच कमी असते.

उत्तर अमेरिकेत सोनमाशाचे पुढील सामान्य प्रकार आढळतात : (१) कॉमेट : शरीर चमकदार असते व शरीराचा आकार नैसर्गिक निवासस्थानांतील माशांपेक्षा वेगळा असतो. (२) व्हेलटेल : पर मोठे असून शेपटीचे खंड दोनऐवजी तीन किंवा चार असतात. (३) टेलिस्कोप किंवा पाँपेई : डोळे पुढे आलेले असतात. (४) सेलेशिअल : डोळे पुढे आलेले व वर वळलेले असतात व पृष्ठपक्ष नसतो. (५) लायनहेड : पृष्ठपक्ष नसतो व त्याचे डोके गोळीदार कोशिका समूहांनी झाकलेले असते. साधा लाल व्हेलटेल प्रकारचा सोनमासा सर्वांच्या परिचयाचा असून दुकानात विक्रीस ठेवलेला असतो.

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

सेलेशिअल सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस) कॉमेट सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस)
लायनहेड सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस) व्हेलटेल सोनमासा (कॅरॅसियस ऑरॅटस)

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate