অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंतःप्रजनन

अंतःप्रजनन

निकट संबंध अथवा जवळचे नाते असलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या लैंगिक संबंधापासून होणाऱ्या प्रजोत्पादनाला (प्रजननाला) अंतःप्रजनन म्हणतात. माणसामध्ये जवळच्या नातलगांच्या (उदा., भाऊ-बहिण, बाप-मुलगी, आई-मुलगा इ.) लैंगिक संबंधापासून होणाऱ्या प्रजोत्पादनालाही हेच नाव दिले जाते. अशा प्रकारच्या प्रजननासंबंधी निरनिराळ्या समाजांत भिन्न कल्पना आहेत. काही समाजांत चुलत, मावस आणि मामेभावंडांचा विवाह निषिद्ध मानला जातो, तर काही समाजांत आतेमामे-भावंडांचा विवाह श्रेयस्कर मानतात. काही समाजांत, वधूवरांच्या मूळ पूर्वजांपासून मोजले असता निदान एका पिढीचे तरी अंतर दोघांत असावे, असे मानतात.

निषेचनाच्या वेळी म्हणजे अंडाणू व शुक्राणू यांच्या संयोगाच्या वेळी पुरुष आणी स्त्री यांच्या युग्मकातील (पक्व कोशिकांतील) ‘जीनां’चे एकीकरण होते. जीन हे मागच्या पिढीतील गुणदोषांचे वाहक असून यांच्यामुळेच ते गुणदोष पुढच्या पिढीत उतरतात. अशा जीनांपैकी काही प्रभावी तर काही अप्रभावी असे असतात. पिढ्यान्‌पिढ्या अंतःप्रजनन होत राहिले तर हे अप्रभावी गुण खालच्या पिढ्यांत अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. हे अप्रभावी गुण बहुधा इष्ट नसल्यामुळे पिढ्यानपिढ्या अंतःप्रजनन नसावे असे मानण्यात येते.

वनस्पती व प्राणी यांच्या प्रजनन-प्रकारांमध्ये काही फरक दिसून येतात. बहुतेक वनस्पती उभयलिंगी (पुरुषजातीची व स्त्रीजातीची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणे) असल्यामुळे त्यांच्यातील प्रजननात दोन प्रकार दिसतात : (१) स्वनिषेचित प्रजनन : या प्रकारात एका झाडाच्या फुलामधील परागकणांपासून त्याच फुलातील अंडाणूचे (अंड्याचे) निषेचन होऊन प्रजनन होते. (२) परनिषेचित प्रजनन : या प्रकारात एका झाडाच्या फुलांमधील परागकण आणि अंडाणू एकाच वेळी पक्व होत नसल्यामुळे अथवा काही विशिष्ट नैसर्गिक रचनेमुळे स्वनिषेचन होऊ शकत नाही, अशा वेळी वाऱ्याबरोबर अथवा कीटकांचा शरीराला चिकटलेले परागकण दुसऱ्या झाडाच्या फुलांतील अंडकोशावर पडून अंडाणूचे निषेचन होऊन प्रजनन होते.

प्राण्यांच्या बाबतीत काही कनिष्ठ वर्गांतील उभयलिंगी प्राण्यांमध्ये (उदा., पट्टकृमी) स्वनिषेचन होऊ शकते, पंरतु उभयलिंगी असूनही गांडुळासारख्या प्राण्यांत विशिष्ट शरीररचनेमुळे स्वनिषेचन होऊ शकत नाही. वरिष्ट वर्गांतील प्राणी एकलिंगी (नर आणि मादी वेगळे) असल्यामुळे त्यांच्यात स्वनिषेचन होणे शक्यच नसते.

अंतःप्रजनन अपायकारकच असते असे नाही. एखाद्या विशिष्ट गुणाची परंपरा निर्माण करण्यासाठी अंतःप्रजननाचा उपयोग करतात. हे विशिष्ट गुण असलेले नर आणि मादी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संततीमध्ये ते गुण प्रकर्षाने दिसतात. पिढ्यान्‌पिढ्या असे अंतःप्रजनन करून ते गुण संततीमध्ये येण्यासाठी अंतःप्रजननाचा उपयोग करतात, उदा., शर्यतीचे घोडे, पुष्कळ लोकर देणाऱ्या मेंढ्या आणि विपुल दूध देणारी जनावरे. या अंतःप्रजनन-प्रकाराला ‘परंपरा-प्रजनन’ असे म्हणतात. अशा परंपरा-प्रजननामुळे कदाचित अप्रभावी जीनांमुळे काही संततीत दोषही उत्पन्न होण्याचा संभव असतो. अंतःप्रजननामुळे एखाद्या कुलात अथवा समाजात असलेल्या अप्रभावी जीनांमुळे उत्पन्न होणारे दोष ओळखता येऊन नष्ट करणे शक्य होते.

एखाद्या घराण्यात चालत आलेला विशिष्ट गुण पुढच्या पिढीत उतरावा म्हणून प्रयत्न करण्यात येतो. यामुळे अंतःप्रजनन करावयाच्या कुटुंबाची निवड करणे अधिक परिणामकारी होऊ शकते. अंतःप्रजननामुळे ती कुटुंबे इतर समाजापासून पृथक् दिसू लागतात; त्या कुलातील कुटुंबे पुष्कळ बाबतीत एकसारखी होत जातात आणि इतर कुलांशी संबंध न ठेवता ती कुले आपली संख्या वाढवू शकतात. त्यामुळे अशा कुलांतील कुटुंबांमध्ये विशिष्ट गुणसमुच्चय दिसून येतो.

असे असले तरी मागच्या पिढीतील प्रभावी गुणांबरोबरच अप्रभावी गुणही (दोष) पुढच्या पिढ्यांतून उतरत जाऊन तेच प्रभावी बनले तर अंतःप्रजनन एकूण कुलाच्या अपकर्षासच कारणीभूत होण्याचा संभव असल्यामुळे अंतःप्रजननाला उत्तेजन देण्यात येत नाही. काही देशांत त्याला कायद्याने व रूढीने बंदी घातली गेली आहे. सगोत्र विवाह निषिद्ध मानण्याचे मूळ कारणही या कल्पनेतच असावे.

संदर्भः Crow, W.B. Synopsis of Biology, Bristol, 1960.

लेखक : द. र. रानडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate