অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंबाडा

अंबाडा

(रान-आंबा; हि. अम्रा; क. अमटे, अवटेकाई; सं. आम्रतक; इ. बाइल ट्री, इंडियन हॉग प्लम; लॅ.स्पाँडियास मँजिफेरा; कुल-अ‍ॅनाकार्डिएसी). सु. १० मी. उंचीच्या या पानझडी वृक्षाचा प्रसार ब्रह्मदेश, अंदमान,श्रीलंका, हाँगकाँग, हिंदी द्वीपसमूह व भारत (उपहिमालय प्रदेश, चिनाब ते पूर्वेकडे, पश्चिम द्वीपकल्प, महाराष्ट्रातील पानझडी जंगले, उत्तरकारवार इ.) इ. ठिकाणी आहे. साल करडी, जाड व गुळगुळीत; पाने एकांतरित, मोठी, संयुक्त, विषमदली-पिच्छाकृती [पान] दले ९-१३, समोरासमोर, लांबट, तळास तिरपी, पातळ, चकचकीत; फुले लहान, विखुरलेली, हिरवट पांढरी, एकलिंगी किंवा द्विलिंगी, मोठ्या व शेंड्याकडील परिमंजरीवर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. अश्मगर्भी (बाठा असलेले) फळ पिवळे असून नोव्हेंबर-डिसेंबरात येते; बी बहुधा एकच. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे अ‍ॅनाकार्डिएसीकुलात वर्णिल्याप्रमाणे. लाकूडनरम; सालीतून पाझरणारा डिंक काळसर व बाभळीच्या डिंकासारखा असतो. फळ आमटीत घालतात किंवा त्याचे लोणचे करतात. साल कातडी कमावण्यास उपयुक्त; पाने व फळे जनावरे खातात. साल थंडावा देणारी असते. ती आमांशावर देतात. तिचे पीठ पाण्यात कालवून संधिवातात संधींवर बाहेरून चोळतात. फळ स्तंभक (आकुंचन करणारे) व स्कर्व्ही रोगास विरोधक. पानांचा रस कानदुखीवर लावतात. डिंक शामक असतो.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate