অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपुष्प वनस्पती

ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत अशा वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या तसेच पाने, खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अपुष्प वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा हे विभाग होतात. मूळ, खोड, पाने हे अवयव आणि जलवाहिन्या व रसवाहिन्या स्पष्ट असलेल्या परंतु फुले, फळे व बीजे यांचा अभाव असलेल्या अपुष्प वनस्पतींचा टेरिडोफायटा हा विभाग होतो.

थॅलोफायटा

या वनस्पतींची संरचना अतिशय साधी असते. त्या एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. त्या बहुपेशीय असल्या, तर अनेक पेशी एकत्र येऊन त्यांची वसाहत बनते किंवा पेशी एकापुढे एक जोडल्या जाऊन तंतू तयार होतात. या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. प्रजनक अंगके एकपेशीय असतात. जीवनचक्रात ‘पिढ्यांचे एकांतरजनन’ आढळून येत नाही. थॅलोफायटा या विभागांत शैवाल, जीवाणू, कवक व शोवाक (लायकेन) यांचा समावेश होतो.

शैवाल

या सर्वांत साध्या संरचनेच्या एकपेशीय तसेच बहुपेशीय हरित वनस्पती आहेत. बहुतांशी शैवाले पाण्यात वाढतात. डबकी, तळी, नद्या व समुद्र अशा विविध ठिकाणी तसेच उष्ण झर्‍यामध्ये व बर्फाखालीही त्यांचे अस्तित्व दिसते. रंगानुसार शैवालांचे वर्गीकरण केले जाते. नील-हरित शैवाले गुठळींमध्ये किंवा लांब धाग्यांच्या स्वरूपात असतात. हरित शैवाले समुद्रात सापडतात. काही शैवाले जमिनीवरच्या ओलसर पृष्ठभागावर वाढून एक हिरवा तवंग तयार करतात. शैवालांमध्ये पेशीविभाजन, खंडन, बीजाणू व युग्मक यांद्वारे प्रजनन होते. जलपरिसंस्थेतील अनेक प्राण्यांचे अस्तित्व शैवालांवर अवलंबून असते. शैवालात जीवनसत्त्वे व क्षार विपुल प्रमाणात असतात. नॉस्टॉक, अ‍ॅनाबीना, स्पायरोगायरा, क्लोरेला, लँमिनॅरिया व जेलिडियम ही शैवालांची काही उदाहरणे आहेत.

जीवाणू

अतिशय सू्क्ष्म असणारे हे एकपेशीय सजीव सर्वत्र आढळून येतात. जीवाणू हे गोल, दंडाकृती, सर्पिल, अर्धविरामाकृती आकाराचे असतात. जीवाणूंमध्ये स्वयंपोषी व परपोषी असे दोन प्रकार आढळतात. काही जीवाणूंना श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो, तर काही ऑक्सिजनविना जगू शकतात. जीवाणूंमध्ये द्विखंडन पद्धती, कलिकायन, कणी, आंतरबीजाणू व लैंगिक प्रजनन या पद्धतीने प्रजनन होते. मानवाच्या दृष्टीने जीवाणूंच्या कोलाय, लॅक्टोबॅसिलस अ‍ॅसिडोफिलस, र्‍हाझोबियम इ. प्रजाती उपयुक्त आहेत, तर क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, सेगेला, व्हिब्रिओ कॉलेरी इ. प्रजाती उपद्रवी आहेत.

कवके

हे एकपेशीय तसेच बहुपेशीय सजीव असून ते परजीवी असतात. परोपजीवी कवके सजीवांपासून अन्न मिळवितात, तर शवोपजीवी कवके मृत वनस्पती, प्राणी किंवा कार्बनी पदार्थांपासून अन्न मिळवितात. कवकाच्या शरीराला कवकजाल म्हणतात. ते कवकतंतूंचे बनलेले असते. कवकतंतूंच्या भित्ती कायटिनाच्या असतात. कवकांचे प्रजनन बीजाणूंद्वारा किंवा लैंगिक पद्धतीने होते. कवकांमुळे मृत वनस्पती व प्राणी यांचे विघटन होते. म्यूकर, र्‍हायझोमस, पेनिसिलियम, यीस्ट, तांबेरा, काजळी, भूछत्रे इ. कवकांची उदाहरणे आहेत.

शैवाक

हे कवक व शैवाल यांच्या निकट साहचर्यातून निर्माण झालेले संयुक्त सजीव आहेत. सहजीवनाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शैवालपेशी कवकजालात संरक्षित राहतात. शिवाय कवकतंतू त्यांना पाणी व क्षार यांचा पुरवठा करतात. याच्या मोबदल्यात शैवालपेशी प्रकाशसंश्लेषणात तयार झालेले अन्न कवकांना पुरवितात. अनेक शैवाकांची शरीरे मूळ कवक किंवा शैवालांपेक्षा वेगळीच असतात. अस्निया, पामेलिया, रेनडियरमॉस, ओकमॉस, ऑरसिन, दगडफूल, क्लॅडोनिया, इ. शैवाकांची उदाहरणे आहेत ब्रायोफायटा

या वनस्पतींना हरिता किंवा शेवाळी वनस्पती असेही म्हणतात. या वनस्पती एकत्र गटात वाढून पृष्ठभागावर मखमली किंवा पसरट चटया तयार करतात. या वनस्पतींना मुळे, खोड, पाने वगैरे अवयव नसतात. मात्र यांमध्ये बहुपेशीय लैंगिक अवयव असतात. त्यास स्त्रीधानी व पुंधानी असे म्हणतात. या वनस्पती स्थलवासी असल्यामुळे प्रजनन प्रक्रियेत पाणी आवश्यक असते. वनस्पतींच्या सान्निध्यात भरपूर पाणी असेल तरच पुंधानी व स्त्रीधानी यांचे फलन यशस्वी होऊन युग्मनज तयार होतो. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींच्या जीवनचक्रात युग्मकधारी व बीजाणुधारी अशा दोन अवस्था असतात. या दोन अवस्था एकामागून एक येतात. ब्रायोफायटा थंड व ओलसर जागी उत्तम वाढत असल्यामुळे त्यात इतर वनस्पतींच्या बिया रुजतात. ब्रायोफायटामुळे जमिनीची धूप थांबते. फ्युनेरिया, पॉलिट्रायकम इ. मॉस प्रकारांबरोबर रिक्सिया, मार्केन्शिया यांसारख्या लिव्हरवर्ट्सचा ब्रायोफायटामध्ये समावेश होतो..

टेरिडोफायटा

या विभागातील वनस्पती खर्‍या अर्थाने सर्वप्रथम भूनिवासी वनस्पती होत. या वनस्पतींची संरचना मूळ, खोड व पान अशा अवयवांची असते.  तसेच या वनस्पतींमध्ये रसवाहिन्या व जलवाहिन्या या वाहक ऊती स्पष्ट आढळतात. यांच्या जीवनचक्रात बीजाणुधारक अवस्था अधिक प्रगत व प्रभावी असते. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते. बीजाणू रूजल्यानंतर युग्मकधारी अवस्था सुरू होते. या विभागातील काही वनस्पतींना ‘नेचे’ असे उदा., टेरीस, नेफ्रोलेपिस. म्हणतात. सायलोटम, लायकोपोडियम, सिलॅजिनेला, एक्विसीटम इ. टेरिडोफायटाची अन्य उदाहरणे आहेत.

अपुष्प वनस्पतींतील जातींची संख्या सु. १,१०,००० असावी. त्यांचा प्रसारही फार मोठा आहे. यातील कित्येक वनस्पती फार प्राचीन आहेत. कोट्यावधी वर्षांपूर्वी टेरिडोफायटा वर्गातील वनस्पती गाडल्या गेल्यामुळे दगडी कोळसा आणि खनिज तेल वायू यांसारखी इंधने निर्माण झाली आहेत.

थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा हे वनस्पतींचे वर्गीकरण पूर्वीचे आहे. आर. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक वर्गीकरण पद्धतीनुसार (१९६९ पासून) सजीवांच्या पाच सृष्टी मानल्या जातात. त्यानुसार जीवाणू आणि कवक या वेगळ्या सृष्टी आहेत. हरित शैवाले वगळता इतर शैवालांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत होतो. म्हणजे थॅलोफायटापैकी फक्त हरित शैवाले वनस्पतिसृष्टीत येतात. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचा मात्र वनस्पतिसृष्टीतच समावेश होतो.

 

लेखक - बिजूर शोभना, देशमुख नरेंद्र

स्त्रोत: कुमार विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate