অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अशोक -१

अशोक -१

अशोक हे नाव दोन भिन्न वृक्षांना दिले जाते. एकाला ‘लाल अशोक’ व दुसऱ्याला ‘हिरवा अशोक’ म्हणतात.

लाल अशोक : (जसवंत; हिं. सं. गु. अशोक, अशुपालव; क. अशुगे; इं. अशोक ट्री; (लॅ. सराका इंडिका; कुल—लेग्युमिनोजी ). पौराणिक महत्त्वामुळे ‘सीतेचा अशोक’ म्हणून सामान्यतः ओळखला जाणारा हा सुंदर व सदापर्णी वृक्ष श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया, बांगलादेश व भारत (कोकण, सह्याद्री, उत्तर कारवार, मध्य व पूर्व हिमालय) इ. प्रदेशांतील सदापर्णी जंगलात तुरळकपणे आढळतो, पण अनेक बागांतून मात्र तो लावलेला दिसतो. याची गणना  कांचन,  बाहवा, अंजन  इत्यादींच्या उपकुलात (सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) केली असून त्यांच्याशी काही शारीरिक लक्षणांत त्याचे साम्य आहे. याची उंची ६-९ मी.; साल गर्द तपकिरी किंवा पिंगट; संयुक्त व पिसासारखी पाने कोवळेपणी लोंबती व लालसर, एकाआड एक असून त्यांच्या बगलेत लहानसे उपपर्ण असते; दले -४–६ जोड्या व दल चकचकीत असते. याचे लाल फुलोरे (गुलुच्छ, पुष्पबंध) पानांच्या बगलेत डिसेंबर ते मेमध्ये येतात व त्यावर प्रथम पिवळसर, नंतर नारिंगी व शेवटी लाल दिसणारी फुले येतात (चित्रपत्र ५७). फुलांचे देठ, छदे व छदके [ फूल ] ही लाल असतात. पाकळ्यांच्या अभावी त्याखाली असलेला संवर्तच त्यांचे कार्य करतो. केसरदले ७ ते ८,फुलाबाहेर डोकावणारी व परागकोश जांभळट असतात. शिंबा (शेंग) गडद तपकिरी,चपटी,टोकदार व बिया ४–८ चपट्या व लांब असतात. नवीन लागवड बियांपासून होते.

अशोक शोभेकरिता पुराणकालापासून प्रसिद्ध आहे. हिंदूंनी तो पवित्र मानून कामदेवास अर्पण केला आहे. भगवान गौतम बुद्धाचा जन्म या वृक्षाखाली झाला,असे मानतात. औषधांकरिताही तो प्रसिद्ध आहे. साल फार स्तंभक (आकुंचन करणारी) असून दुधात उकळून गर्भाशयाच्या तक्रारीवर घेतल्यास गुणकारी व पौष्टिक आहे. फुले कुटून व पाण्यात कालवून रक्तातिसार, मूळव्याध व आमांश इत्यादींवर; सुकलेली फुले मधुमेहावर; बिया मूत्रविकारांवर; पाने शूलावर (तीव्र वेदनांवर) उपयुक्त व आरोग्यपुनःस्थापक (पुन्हा आरोग्य प्राप्त करून देणारी) असतात.

हिरवा अशोक : (अशुपाल, आसुफल; हिं. देवदारू, दिकेदारी; क. पुत्रजीवी; इं. इंडियन फर, मॅस्ट ट्री; लॅ. पॉलिअ‍ॅल्थिया लाँगिफोलिया, कुल—अ‍ॅनोनेसी). हा एक मोठा (१५ मी. उंच) सदापर्णी वृक्ष मूळचा भारताच्या दक्षिण टोकाचा व श्रीलंकेचा, परंतु आता भारतात इतरत्र मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा व बागेत शोभेकरिता सामान्यपणे लावलेला आढळतो. अनेक रोग बरे करण्याचा गुण त्यात असल्याच्या समजुतीने पॉलिअ‍ॅल्थिया  हे वंशवाचक नाव व त्याच्या लांब पानांच्या लक्षणांमुळे लाँगिफोलिया  हे लॅटिन जातिवाचक नाव त्याला दिले आहे. लाल अशोकाप्रमाणे यालाही हिंदू लोक पवित्र मानतात त्यामुळे हा देवळांमध्ये अनेकदा लावला जातो. याची पाने चिवट, अरुंद, भाल्यासारखी, गुळगुळीत व चकचकीत, कडा तरंगित व टोक लांबट असते; ५-६ हिरवट फुलांचे चवरीसारखे झुबके बहुधा पानांच्या बगलेत फेब्रुवारी ते मेमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे  अ‍ॅनोनेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे; फळे प्रथम हिरवी (१८X१२ मिमी.), नंतर गर्द जांभळी; ती ऑगस्ट ते सप्टेंबरात पिकतात. नवीन लागवड ताज्या बियांपासून होते.

हिरवा अशोक. (१)फुलोऱ्यासह फांदी, (२) घोसफळ.हिरवा अशोक. (१)फुलोऱ्यासह फांदी, (२) घोसफळ.

लाकूड हलके पण मजबूत असल्याने पेन्सिली, पिपे व ढोलक्याकरिता वापरतात. दुष्काळात गरीब लोक फळे खातात; एरवी पक्षी, वाघळे व माकडे खातात. सालीपासून चांगला धागा मिळतो. चीनमध्ये लाकडाचा उपयोग आग- काड्यांकरिता करतात. साल तापावर गुणकारी, पिरॅमिडासारखा दिसणारा व शक्यतो खोडाजवळ लोंबत राहणाऱ्या फांद्या असलेला अशोकाचा एक प्रकार (पेंड्यूला ) हल्ली बागेत अनेक ठिकाणी आढळतो.

लेखक : सी. ना. गाडगीळ,  शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate