অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंबगूळ

आंबगूळ

(हिं. घिवैन; इं. बॅस्टर्ड ओलिअ‍ॅस्टर; लॅ. एलेग्नस लॅटिफोलिया, कुल—एलेग्नेसी ). हे मोठे वर चढणारे झुडूप भारतात बहुधा सर्वत्र डोंगराळ भागात (महाराष्ट्रात कोकण, माथेरान, महाबळेश्वर, अंबोली इ.) आढळते. शिवाय श्रीलंका, मलाया व चीन येथेही सापडते. एलेग्रेसी या कुलातील [ मिटेंलिझ] सर्व वनस्पतींच्या भागावर रुपेरी खवले असतात. पाने साधी, चिवट, वरील बाजूस फिकट हिरवी परंतु खालील बाजूस रुपेरी; फुले लहान, नियमित, विभक्तलिंगी किंवा उभयलिंगी, फिकट, पिवळट पांढरी, पानाच्या बगलेतील झुबक्यांत नोव्हेंबर ते जानेवारीत येतात. देठ व चार परिदले रुपेरी [फूल], अश्मगर्भी (आठळी असलेले) फळ लहान, बोराएवढे, लांबट व मृदू असून त्यावर सतत वाढलेल्या परिदलाचे आवरण असते; फळाच्या आठळीवर आठ उभे कंगोरे व सर्वांत बाहेर गुलाबी रंगावर उठून दिसणारे पांढरट खरबरीत ठिपके असतात. बाहेरील मांसल भाग आंबूस व खाद्य; आठळीच्या आतील भागावर पांढरट लोकरीसारखे आवरण असते; बी एकच, लहान व चकचकीत असते. फुले स्तंभक (मळ घट्ट करणारी) व दीपक (भूक वाढविणारी); फळ स्तंभक असून त्यापासून जेली, सामोसे इ. करतात. ही वेल शोभेकरिता बागेत लावतात.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश


अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate