অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उद्याने व उपवने २

उद्याने व उपवने २

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील उद्याने : सतराव्या-अठराव्या शतकांत ‘नैसर्गिक मांडणी हीच सर्वश्रेष्ठ मांडणी होय’, असा विचार विल्यम केंट (सु. १६८६–१७४८), ‘केपेबिलिटी’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला लान्सेल्ट ब्राउन (१७१६–१७८३) इ. स्थलशिल्पज्ञांनी मांडून एक नवीन स्थलशिल्पशैली निर्माण केली. त्यातूनच पुढे नैसर्गिक रस्ते, पायवाटा, हिरवळी, झाडे, खडक, मानवनिर्मित निर्झर इत्यादींचा उद्यानांसाठी वापर होऊ लागला. कृत्रिम साधनांचा वापर न करण्यावर एकोणिसाव्या शतकातील स्थलशिल्पज्ञांचा कटाक्ष होता. ही पद्धती कालांतराने जास्त क्लिष्ट होऊ लागली. उद्यानास वैचित्र्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी कृत्रिम पडकी देवळे किंवा वास्तू यांची योजना करण्यात येत असे. याशिवाय एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या उद्यानांवर पौर्वात्य स्थलशिल्पाची छाप पडू लागली. प्रवास, नवीन वसाहती व वाढते साम्राज्य यांमुळे अनेक लोकांचा पौर्वात्य उद्यान-मांडणीशी संबंध आला व विशेषतः निसर्गसदृश अशा जपानी व चिनी मांडणीची आवड या काळात निर्माण झाली. वाळू, दगड, बांबूची बने, नेचे, लहान शिल्पे इत्यादींचा बागबगीचांत उपयोग करण्यात आला. बारमाही पावसाच्या जंगलात आढळणारी वनशोभा काही उद्यानांत व उपवनांत कृत्रिम रीतीने निर्माण करण्यात आली. यासाठी अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, झुडपे यांची संमिश्र योजना करून देखावे, दूरदृश्ये व वाटिका उभारण्यात आल्या. यासाठी नैसर्गिक भूभागाचा पूर्णपणे अभ्यास व विचार करण्यात येई व त्याला योग्य अशीच मांडणी करण्यात येई. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शहरांची अनिर्बंध वाढ होऊ लागली व जागेच्या समस्येमुळे शहरातील उद्यानांचे प्रमाण फारच कमी झाले. निसर्ग व मानव यांतील अंतर कमी करण्यासाठी उद्याननगरी, राष्ट्रीय उद्याने व उपवने, राखीव जंगले यांची शहरांभोवती योजना करण्यात आली. अमेरिकेत व इतर पाश्चात्त्य देशांत त्यांची फार झपाट्याने वाढ झाली. चौक, फुलांचे ताटवे, मोठ्या खिडक्या, अंगणातील वा गच्चीवरील बागा, पाण्याची कारंजी यांचा योग्य उपयोग करून वास्तू व निसर्ग यांची एकत्रित सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला व येत आहे.

पौर्वात्य उद्याने : एकांत, मनन व निसर्गावलोकन यांसाठी खास निसर्गसदृश दिसणाऱ्या वाटिका, उद्याने व उपवने निर्माण करणे, हे चिनी स्थलशिल्पज्ञांचे वैशिष्ट्य आहे. डोंगर व पाणी यांच्या योजनेतून निर्माण होणाऱ्या ‘शानसुई’ चित्रशैलीकरिता चिनी चित्रकार प्रसिद्ध आहेत. या शैलीचा चिनी उद्यानरचनेवर परिणाम झालेला दिसून येतो. लहानलहान विविध दृश्ये डोळ्यासमोर उलगडत जावी, या हेतूने उद्यानांची मांडणी केली जाई व यासाठी उद्यानांतील पाऊलवाटांच्या बाजूला त्या प्रकारच्या देखाव्यांची मांडणी केली जाई.

चिनी स्थलशिल्पकलेवर ताओच्या विचारांचा मोठा पगडा आहे. या विचारांप्रमाणे डोंगर, पर्वत हे पृथ्वीचे मणके वा सांगाडा असून पाणी हे तिचे जीवन आहे. यास्तव चिनी स्थलशिल्पात नैसर्गिक वा कृत्रिम दगडांचा, ते पर्वत आहेत असे कल्पून, फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तळ्याच्या मध्यभागी असलेली बेटे, त्यांवर जाण्यासाठी लाकडी बांधणीचे पूल तसेच बांबू, पाइन इ. वृक्षांचा सांकेतिक वापर हे शैलीमुळेच प्रचलित झाले. मंडपाचा वापर, अष्टकोनी वा वर्तुळाकृती दरवाजे, जमिनीच्या ढाळाप्रमाणे बदलणाऱ्या भिंती ही सर्व या शैलीची वैशिष्ट्ये इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून प्रचलित होती. नैसर्गिक दृश्यांचे चित्रण करण्याची पद्धती सुंग कालखंडात (सु. ९६०–१२८०) पूर्णत्वास पोहोचली. तेव्हापासून आजपर्यंत तिचा चिनी स्थलशिल्पावर कमीअधिक प्रमाणात पगडा कायम आहे.

जपानी स्थलशिल्पाच्या कल्पना निसर्गाशी अधिक प्रमाणात तादात्म्य पावलेल्या आढळतात. निसर्गात दिसणाऱ्या अनेक दृश्यांपैकी, ज्या दृश्यांमुळे प्रेक्षकाला आनंद होईल, अशाच दृश्यांना उद्यानांत समावेश केला जातो व याकरिता नैसर्गिक रीतीने झिजलेले दगड, लाकडाचे ओंडके, धातूची भांडी, शिल्पाकृती यांचा वापर करण्यात येतो. अनेक वृक्ष व वेली यांचा विविध ऋतूंचे आगमन दर्शविण्यासाठी वापर केला जाई. उद्यानाभोवती भिंत बांधण्याची जपानमध्ये प्रथा होती. डोंगरउतारावरील व सपाटीवरील असे बागांचे दोन प्रकार करण्यात येत. लहान किंवा अल्पाकृती झाडांचा (बोन्साई) वापर करून निर्माण केलेल्या अल्पाकृती बागा हे जपानचे खास वैशिष्ट्य आहे. या बागांची मांडणी मोठ्या लाकडी थाळ्यांमध्ये वाळू, भुसा, माती वगैरे वापरून केली जाते. क्योटो येथील काटसुरी राजवाड्याची उद्यानरचना ही जपानी शैलीचे उत्तम प्रतीक आहे.

इ. स. पू. पाचव्या शतकात इराणी साम्राज्य तत्कालीन साम्राज्यांत फार मोठे होते. तेथील राजकीय सुस्थिरतेमुळे उद्याननिर्मितीसारख्या कला वाढीस लागल्या होत्या. भौमितिक व समप्रमाण मांडणी हे इराणी उद्यानांचे वैशिष्ट्य आहे. अनेक पाट, बंधारे, वाहते पाणी, ओळीने लावलेली सुरूसारखी प्रमाणबद्ध झाडे, रंगीत लाद्या यांचा इराणी उद्यानांत वापर होत असे. गुलाबाच्या ताटव्यांचा भौमितिक आकृतीच्या उद्यानात वापर केल्यामुळे त्यास एखाद्या गालिचाचे स्वरूप प्राप्त होई. या मांडणीचा परिणाम नंतरच्या मोगल व अरबी तसेच पश्चिमेकडे स्पेन व मोरोक्को येथील उद्याननिर्मितीवर झाला. अल् हम्ब्रा येथील उद्यानांच्या मांडणीवर ख्रिस्ती व इस्लामी संस्कृतींचा पगडा दिसतो. पाण्याची कारंजी, धबधबे, भौमितिक शिल्पाकृती, कमानी, स्तंभावली, अनेक दालनांचे चौक इत्यादींनी या उद्यानांस शोभा आणली जाई. सोळाव्या शतकात ग्रानाडा येथे मूरिश स्थलशिल्पज्ञांनी अनेक संमिश्र पद्धतीच्या उद्यानयोजना केल्या. सेव्हिल येथील अल् काझर हे उद्यान अरबी व ख्रिस्ती स्थलशिल्पशैलींच्या संयोजनाचे उत्तम उदाहरण आहे.

भारतीय उद्यानांची परंपरा इ. स. पू. २००० पर्यंत पोहोचते. या उद्यानांची मांडणी तळी किंवा मोठे चौक यांच्याभोवती असे. संस्कृत साहित्यात पुष्पवाटिका, उद्यान इ. प्रकारचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. या उद्यानांत अनेक प्रकारची फळझाडे, फुलझाडे, वेली, लहान चबुतरे, लतामंडप, झोपाळे, धारागृहे यांची योजना असे. सार्वजनिक उद्यानांची कल्पना नसली, तरी ऋषींच्या आश्रमाभोवती वन्य पशूंपासून वा राक्षसांपासून संरक्षित अशी वने व उपवने अस्तित्वात होती. किंबहुना आश्रमांची योजना अशा उपवनांतच असे. अनुकूल हवामानामुळे वृक्ष, वेली व फुलझाडे यांची उपवनांत गर्दी असे. हरिण, मोर यांसारखे प्राणी उपवनांत फिरत असत व तशी वर्णनेही जुन्या ग्रंथांतून आढळतात. उद्यानांची मांडणी समप्रमाण नसली, तरी मांडणीबाबत काही योजना झालेल्या असाव्यात.

अकराव्या शतकापासून तुर्की व नंतर मोगली व इराणी उद्यानरचनांची छाप भारतीय उद्यानांवर पडली. सार्वजनिक व खाजगी उद्याने या काळानंतर अस्तित्वात आली. मोगलांच्या काळात सतराव्या शतकापर्यंत काश्मीरात तसेच आग्रा, दिल्ली इ. ठिकाणी इराणी शैलीची अनेक उद्याने बांधण्यात आली. काश्मीरमधील शालिमार बाग व निशात बाग या त्यांपैकी प्रसिद्ध बागा आहेत. पीर पिंजर खिंडीजवळ जहांगीराने मोठी बाग बांधली. बागेच्या सभोवताली दालने व स्तंभावल्या होत्या आणि आत विहार करण्यासाठी वाटा व फुलांचे ताटवे यांची योजना होती. दाल सरोवराजवळ शालिमार बागेची रचना करण्यात आली. मुख्य सरोवराशी एका नाल्याने तिचा संबंध जोडलेला आहे. उद्यानाची मांडणी तीन टप्प्यांवर असलेल्या पाच मोठ्या पायऱ्यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यावर दिवाण-इ-आमसारखी सार्वजनिक सभेची वास्तू, दुसऱ्या टप्प्यावर खास समारंभासाठी दिवाण-इ-खाससारखी वास्तू व तिसरा टप्पा अंतःपुरासाठी राखून ठेवलेला होता. बागेच्या मध्यभागी मोठा पाट असून त्याचे पाणी कारंजी, तळी व धबधबे यांद्वारे सर्वत्र खेळविले आहे. एका बाजूला दाल सरोवर तर दुसऱ्या बाजूला पर्वतराजी असल्यामुळे या उद्यानाला अवर्णनीय सृष्टिशोभा प्राप्त झाली आहे. आग्रा येथील ताजमहालाच्या परिसरातील बगीचा शहाजहानच्या मृत्यूनंतर सर्वांना खुला करण्यात आला. याव्यतिरिक्त अजमेर येथील अनासागर तलावाजवळील दौलतबाग, पुष्कर सरोवराजवळील बाग व अलाहाबाद येथील खुश्रू बाग यांची मांडणी प्रेक्षणीय आहे. राजपूत राजे व सरदार यांनी मध्ययुगात व नंतरच्या काळात बिकानेर, जोधपूर, जैसलमीर, उदयपूर, अंबर व जयपूर येथे अनेक उद्याने बांधली. तळी, बारादरी, नाले व पाट आणि भौमितिक मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

पेशवे व इतर मराठे सरदार यांनी उभारलेल्या उद्यानांच्या मांडणीवर मोगल शैलीचा प्रभाव दिसून येतो. पुण्यातील सारस बागेची मांडणी प्रमाणबद्ध नसून नैसर्गिक वनराजीवरच तीत जास्त जोर दिला असावा. म्हैसूरमधील वृंदावन उद्यान व केरळ-कर्नाटक सीमेवरील पेरियार तलावाजवळील उद्यान ही अलीकडील प्रसिद्ध उद्याने होत. बोरीवली येथे राष्ट्रीय उद्यान व इतर हवेच्या ठिकाणी सरकारतर्फे उद्याने बांधण्यात येत आहेत. त्यांची मांडणी संमिश्र स्वरूपाची असून पाश्चात्य स्थलशिल्पशैलीची त्यांवर दाट छाप दिसून येते.

स्थलशिल्पशास्त्र : स्थलसिल्पसाधनेत वापरावयाच्या वस्तूंच्या प्रथम विचार करावा लागतो. स्थलशिल्पांसाठी झाडे, वेली, प्राणी, दगड, शिल्पे इ. साहित्य लागते.

झाडे व वेली : स्थलशिल्पज्ञाला वनस्पतींची पूर्ण माहिती असावी लागते. झाडे, वेली व झुडपे यांचे रंग, आकार, वाढीला लागणारा काळ, जमीन व हवामानाची गरज, त्यांना येणारी फुले व फळे, पानांची मांडणी व फूट, सदाहरित की गळणारी पाने इ. सर्व दृष्टींनी वनस्पतींचा विचार करावा लागतो. वनस्पतींच्या योग्य निवडीचा उद्यानाच्या मांडणीवर व त्याच्या काळानुरूप बदलणाऱ्या दृश्यावर फार मोठा परिणाम होतो. वनस्पतींचा उपयोग संरक्षण, पडदा, सावली, पोत, रंगसंगती, उठाव देणे इत्यादींसाठी होऊ शकतो. देशपरत्वे झाडांच्या वाढीवर कोणते परिणाम होतात याचाही स्थलशिल्पज्ञाला विचार करावा लागतो. हरितगृहे व झाडांची माहिती देणारी पुस्तके यांच्याद्वारे स्थल शिल्पज्ञास तयार माहिती व साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.

पाणी : वनस्पतींच्या वाढीसाठी पाणी आवश्यक असतेच; पण त्याचबरोबर उद्यानाला शोभा आणण्यासाठी पाण्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. तलाव, सरोवरे यांसारखे मोठे जलाशय उद्यानाला उठाव देतात; तर कारंजी, पाट, लहान धबधबे यांनी उद्यानाला ठिकठिकाणी शोभा आणता येते. अवकाशाचे स्वरूप, योजनेची सुसंबद्धता, थंडावा व मांडणीचे एकसूत्रीकरण यांसाठी पाण्याचा विविध प्रकारे वापर करण्यात येतो. पंपाच्या साहाय्याने त्याच पाण्याचा पुनःपुन्हा वापर करता येतो व पाणी विस्तृत क्षेत्रात खेळविता येते. पाण्याच्या साहाय्याने चमत्कृतिजन्य आभासही निर्माण करता येतात. शिंपले व खवले असलेले ढाळ, खडकाळ पात्र यांचा वापर केल्यास पाण्याचा ध्वनी निर्माण होऊन उद्यानास जिवंतपणा आणता येतो.

शिल्पे व दगडी वास्तू : मानवाचे निसर्गावरील प्रभुत्व किंवा मानवाच्या अस्तित्वाचे व कार्याचे दृश्य प्रतीक म्हणून उद्यानात उत्तम शिल्पे वापरली जातात. उद्यानातील ठळक स्थानी तसेच एखाद्या दृश्याच्या शेवटी, हिरवळीवर, तळ्यात इ. अनेक जागी शिल्पांचा वापर केला जातो. उद्यानात दगडांचा किंवा वास्तूंचा वापर दृश्यांना उठाव देण्यासाठी करतात. पुतळ्यांची मांडणी व त्यामागील कल्पना यांमध्ये सुसंगती येण्यासाठी स्थलशिल्पज्ञ व शिल्पकार यांचे सहकार्य आवश्यक आहे.

भिंती, ढाळ, टप्पे व पायऱ्या : पाश्चिमात्य उद्यानांच्या रचनेत भिंतींना फार महत्त्व आहे. खाजगी उद्यानांभोवती ज्याप्रमाणे भिंती बांधल्या जातात, त्याचप्रमाणे वास्तूची निसर्गाशी वा उद्यानाशी पुरेशी सांगड घालण्यासाठी दगडी अथवा विटांच्या भिंती उद्यानरचनेत वापरल्या जातात. इटलीमधील उद्यानांत भिंती, टप्पे व पायऱ्या वापरून अवकाशाची व विलोभनीय दृश्यांची निर्मिती केली जाते. टप्प्यांचा वापर केल्यामुळे खोऱ्यात किंवा डोंगराच्या उतारावर असलेल्या उद्यानाला जास्त शोभा येते. पायऱ्यांची किंवा टप्प्यांच्या भिंतींची बांधणी दगड, विटा वा ओंडके यांची करतात. बांधकामाच्या सांध्यांमधे फुलझाडे, वेली अथवा हिरवळ योजून बागेची शोभा वाढविता येते. पायऱ्यांची मांडणी मोठ्या, कमी उंचीच्या व दृष्टीला आकर्षक अशा जागी करण्यात येते. पायऱ्यांच्या वापरामुळे लहान उद्यानात मोठ्या अवकाशाचा आभास निर्माण करता येतो.

मांडणीची तत्त्वे : वास्तुशिल्पाप्रमाणेच स्थलशिल्पशास्त्राची काही ठळक तत्त्वे उद्याननिर्मितीसाठी वापरण्यात येतात. उद्यानाच्या वा उपवनाच्या वापराप्रमाणे त्याची निर्मिती कशी करावी, यासंबंधीचे विचार यामध्ये आढळतात. वास्तुशिल्पातील बाह्य अवकाशपरिणाम आंतर अवकाशाच्या परिणामाशी निगडित करावा लागतो व त्यासाठी स्थलशिल्पज्ञास वास्तुशिल्पज्ञाची मदत घ्यावी लागते. वास्तुशिल्पज्ञाचे कार्य वास्तूच्या निर्मितीनंतर पूर्ण होते; पण स्थलशिल्पज्ञाला उद्यानाकडे सतत लक्ष पुरवावे लागते. उद्यानाची किंवा स्थल शिल्पाची मांडणी सदैव आकर्षक राहण्यासाठी सतत मेहनत व खर्च आवश्यक असतो व त्यामुळे मांडणी करताना याचाही विचार स्थलशिल्पज्ञाने करणे आवश्यक असते. हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीची ठेवण इ. गोष्टींचा विचार करून मगच उद्यानाची प्रमुख रूपरेषा ठरविली जाते.

योजनेची एकसूत्रता : मांडणी करताना उद्यानाची जागा जरी मोठी असली, तरी एकूण मांडणीत सूत्रबद्धता असणे आवश्यक आहे. बागेतील अनेक दृश्यांचा किंवा मांडणीचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी पाणी, हिरवळ, बांध, कुंपणे, पाऊलवाटा अशा अनेक क्लृप्त्यांचा वापर केला जातो. मोगल उद्यानांत पाण्याचा, प्रबोधनकालीन यूरोपातील उद्यानांत कातरलेल्या झुडपांचा, आधुनिक उद्यानांत भिंतींचा उपयोग अशाच प्रकारे केलेला आहे.

उद्यानाच्या मांडणीत काही विशिष्ट प्रकार प्रचारात आहेत. एका प्रकारची उद्याने आतून, तर दुसऱ्या प्रकारची उद्याने बाहेरून बघण्यासाठी योजली जातात. प्रत्येक उद्यानात एकांत, वनक्रीडा व मनन यांसाठी काही खास जागा योजण्यात येतात. मांडणीच्या दृष्टीने सलग हळुवारपणे बदलत जाणाऱ्या पातळ्या व फिरते आकार वापरून काही आधुनिक उद्यानांची योजना आखतात; तर अष्टकोनी, चौकोनी अशा आकारांचा वापर उद्यानास भौमितिक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी केला जातो.

प्रमाण : उद्यान प्रमाणबद्ध दिसण्यासाठी त्याच्या अनेक अंगांचे एकमेकांशी योग्य प्रमाण असणे जसे आवश्यक असते, तसे संपूर्ण उद्यान हे सभोवतालच्या सृष्टीशी किंवा वास्तूशी प्रमाणशीर असणे आवश्यक असते. खाजगी उद्यानांचे प्रमाण व्यक्तीशी, मोठ्या शहरातील उद्यानांचे प्रमाण सभोवतालच्या वास्तूंशी व जनसमुदायाशी, उपवनांचे व राष्ट्रीय उद्यानांचे प्रमाण त्यांच्या आसपासच्या पर्वत, तळी किंवा इतर नैसर्गिक गोष्टींशी असणे आवश्यक असते. मोठे राजरस्ते किंवा उपवनातील रस्ते यांवरून वाहने फार वेगाने जात असल्यामुळे झाडांची मांडणी लांब अंतरावर असलेल्या मोठ्या वृक्षसमुदायाची असावी. वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या फार जवळ झाडे असल्यास धोका निर्माण होऊन झाडांची शोभा अनुभवण्यासही अवधी मिळत नाही. भराभर बदलणाऱ्या जवळच्या दृश्यांपेक्षा लांबवरचे वृक्षसमुच्चय जास्त आल्हाददायक ठरतात. उजेडाचे व सावल्यांचे पट्टे, उघडा व बंदिस्त असा दृष्टिकोन, दृष्टीच्या बदलणाऱ्या पातळ्या यांमुळे येणारे दृश्यांतील नावीन्य सतत कायम ठेवण्याच्या दृष्टीने कृत्रिम रीत्या वृक्षरचना करण्यात येते.

काळ : उद्यानरचनेत काळाचा विचार करणे आवश्यक आहे. कारण सर्वस्वी वृक्ष व वेलींवर अवलंबून असलेली मांडणी कालांतराने बिघडण्याची शक्यता असते. फरशी, शिल्पे, बांधकाम, जमिनीचे आकार व दूरचे सृष्टिसौंदर्य या सर्वांच्या मिलाफातून निर्माण झालेली मांडणी जास्त काळ प्रमाणबद्ध राहू शकते.

उजेड व सावल्या : घनदाट झाडांची योजना करून गूढ वातावरण, तर हिरवळीचा वापर करून हलके आल्हाददायक वातावरण उद्यानात निर्माण करता येते. यासाठी रचनेत प्रकाश व सावल्या यांची सांगड घालावी लागते. कापलेली झुडपे, फुलांचे ताटवे व कातरलेल्या आकाराच्या पानांची झाडे यांची योजना करून उजेड व सावल्यांचा खेळ साध्य करता येतो.

पोत : इराणी व मोगल उद्यानांत पोताचा वापर प्रकर्षाने केलेला आढळतो. अनेक तऱ्हेच्या फरशा, कोरीवकाम केलेले चबुतरे, बारादऱ्या इ. वापरून उद्यानांची रचना केलेली असल्यामुळे अनेक पोत दृष्टीसमोर येतात. वाळू, दगड, बांबू, सागवान यांचे नैसर्गिक पोत जपानी स्थलशिल्पज्ञ फार कौशल्याने वापरतात. जपानी उद्यानाचे रसग्रहण करताना उद्यानाचे पोत व त्याच्या साहाय्याने निर्माण केलेले आभास, विरोधाभास व अवकाश हे महत्त्वाचे ठरतात. झाडांच्या किंवा हिरवळीच्या प्रकारानुरूप नैसर्गिक पोत बदलतो. मोठ्या उपवनांचे नियोजन यांवर अवलंबून असते.

रंग व छटा : उद्यानात अनेक रंगांची झाडे व फुले असल्यामुळे अनेक रंगसंगती व रंगयोजना करणे शक्य होते. गालिचासारखे अनेक भडक रंग प्रबोधनकालीन उद्यानांत वापरले जात. इटलीत गडद हिरव्या रंगाच्या सुरूच्या वृक्षांसमोर पांढरी संगमरवरी शिल्पे योजत;तर मोगल उद्यानात फुलांच्या ताटव्यांचे रंग वापरीत असत. आधुनिक उद्यानांत एकमेकांत मिसळत जाणारे किंवा विरोधी रंग वापरून शोभा आणली जाते किंवा निळसर वा करड्या रंगाची झुडपे पार्श्वभूमीसारखी योजली जातात.

वृक्षांचा आडोसा : अनेक वृक्ष ओळीने व दोन-तीन रांगांत लावले, तर सोसाट्याचा वारा, दूषित हवा, धूर इत्यादींपासून संरक्षण प्राप्त होते. अनेक स्थलशिल्पज्ञ व नगररचनाकार अशा नैसर्गिक संरक्षणाचा उपयोग करतात. मोकळ्या जागी किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ उद्यानाची मांडणी केलेली असल्यास अशा संरक्षक रांगांची आवश्यकता भासते. अशा वृक्षांच्या पट्ट्यांची कार्यक्षमता झाडांच्या उंचीवर अवलंबून असल्यामुळे निरनिराळ्या उंचीची झाडे राखतात.

उद्यानांचा वापर : उद्याने किंवा उपवने यांच्या वापराप्रमाणे त्यांच्या मांडणीत फरक पडतो. खास शोभेची किंवा अवलोकनाची उद्याने आणि खेळ व क्रीडांसाठी वापरावयाची उद्याने असे दोन विभाग पडतात. झाडांचे प्रकार, जमिनीची मांडणी, फरशा व पाण्याचा वापर या सर्वांत उद्यानाच्या उपयोगानुरूप बदल करावे लागतात. क्रीडा-उद्यानांत मोठ्या हिरवळी लवकरच खराब होतात; अशा जागी वाळू, नदीतील गोटे किंवा फरशा यांची योजना उपयुक्त ठरते. शाळा, कारखाने यांच्याजवळील उद्यानात खेळण्याची व्यवस्था असावी व झाडे एका कडेला किंवा सीमेवरच लावावी. वस्तीच्या जवळील उद्यानांत लहानथोरांची विहारव्यवस्था करून मांडणीत लहान बागेसारखी आखणी करून विभाग पाडले, तर ते जास्त शोभिवंत दिसतात. उद्यानात विविध प्रकारचे साहित्य व वास्तू योजण्यात येतात व त्यांत उद्यानांच्या प्रकारांनुसार फरक करण्यात येतो. (चित्रपत्रे ६५, ६६).

संदर्भ: 1. Baily, L. H. Standard Cyclopaedia of Horticulture, New York, 1960.

2. Gothein, M. M.; Trans. Archer-Hind, A History of Garden Art, 2 Vols., 1928.

3. Walls, I. G. Creating Your Garden, London, 1967

4. Whitehead, G. E. Garden Designs and Construction, London, 1966.

5. Whitehead, S. B. A Modern Guide to Good Gardening, London, 1967.

लेखक :  गो. कृ. कान्हेरे,  रा. मो. चौधरी,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate