অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊद

ऊद

(हिं. लुबान; लोबान; गु. कोडयोलोबान; सं. तुरष्क सयामधूप; कपर्दक ऊद; इं. गम बेंझोइन, गम बेंजामिन). सुगंधी धुपाकरिता वापरात असलेल्या ह्या राळेसारख्या परिचित पदार्थाचे उत्पादन मलाया, मलाक्का, जावा, सुमात्रा, इ. प्रदेशांत ‘गम बेंझोइन ट्री’ (लॅ. स्टायरॅक्स बेंझोइन) नावाच्या स्टायरेसी कुलातील लहान सदापर्णी वृक्षापासून होते व तो तेथून भारतात आयात करतात. पूर्व भारतात (बंगाल व आसाम) व ब्रम्हदेशात आढळणाऱ्या स्टायरॅक्स सेऱ्यालेटम  या दुसऱ्या मोठ्या जातीपासून कमी प्रतीचा ऊद काढतात व चांगल्या उदात भेसळ करतात.

पहिल्या जातीचा वृक्ष लहान असतो. त्याची पाने दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी, लांबट टोकाची, एकाआड एक व साधी असून खालच्या बाजूस तारकाकृती केसांची लव असते; पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या शेंड्यांवर लहान लवदार पांढरी, द्विलिंगी व आकर्षक फुले मंजरीवर येतात. संवर्त (फुलाचे सर्वांत बाहेरचे मंडल) पेल्यासारखा; पुष्पमुकुट लहान, ५ पाकळ्यांचा, नलिकाकृती; केसरदले १०, नलिकेच्या वरच्या भागास चिकटलेली. किंजपुट ऊर्ध्वस्थ; प्रथम ३ व पुढे एकच कप्प्याचा; बीजके थोडी [ फूल]. फळ गोलसर, चिवट, ८ मिमी. व्यासाचे, लवदार, अनियमितपणे तडकणारे व संवर्ताने वेढलेले; बिया सपुष्क (बियांतील गर्भाचे पोषण करणारा अन्नद्रव्ययुक्त भाग असलेल्या).

यूरोप, चीन, जपान, अमेरिका इ. प्रदेशात स्टायरॅक्सच्या काही जाती शोभेकरिता लावतात.

उदाच्या झाडाच्या सालीवर चरे पडतात व त्यांतून स्रवणारा पिवळट पदार्थ सुकून घट्ट झाल्यावर जमा करून स्वच्छ करतात. ह्यात दोन प्रकार असतात. स्टायरॅक्स टोकिनेन्स  व स्टा. बेंझाइड्स  या वृक्षापासून पिवळा किंवा तपकिरी व त्यात पांढरे ठिपके असलेला, कठीण व ठिसूळ ऊद (सयामी ऊद) मिळतो. स्टा. बेंझोइन  वृक्षापासून मिळालेला ऊद (सुमात्रा ऊद) लालसर किंवा करडा तपकिरी असतो. उदाचे खडे किंवा पूड मंदिरात किंवा घरात जाळतात. सयामी ऊद सरस असून उत्तेजक व कफोत्सारक म्हणून औषधात वापरतात. अनेक त्वचारोगांत ऊद, कोरफडीचा रस व अल्कोहॉल मिसळून लावल्यास गुणकारी असतो. यांशिवाय उदबत्ती, सुगंधी तेले, अत्तरे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतधावने इत्यादींत आणि धूप व धुरी देण्याच्या पदार्थांतही ऊद घालतात.

लेखक : शं. आ परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate