অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकदांडी

एकदांडी

एकदांडी ही ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी अ‍ॅस्टरेसी कुलातील एक तणासारखी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ट्रायडॅक्स प्रोकम्बेन्स आहे. ही वनस्पती जमिनीवर सरपटत वाढणारी, ३०-६० सेंमी. उंचीची व केसाळ असून मूळची मध्य अमेरिकेतील आहे. श्रीलंकेत व भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्रात तिचा प्रसार सर्वत्र आहे.

एकदांडीची पाने साधी, जाड, समोरासमोर अंडाकृति-दीर्घवृत्ताकार, टोकदार, दातेरी काठाची व ग्रंथियुक्त असतात. लहान पिवळे फुलोरे एक एकटे असून लांब व बारीक दांड्यावर वर्षभर येतात. फळ एक बी असलेले, कठिण व राठ केसांनी झाकलेले असून त्याच्या एका बाजूला पांढरा पिसासारखा रोमगुच्छ असतो. एका झाडावर सु. १,५०० बिया येतात. वार्‍यामार्फत या बियांचा सहज प्रसार घडून येतो. कापणे, खरचटणे व जखमा यांवर एकदांडीच्या पानांचा रस लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते.

 

लेखक -ढेपे राजा

स्त्रोत: कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate