অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकायनोडर्माटा २

एकायनोडर्माटा २

एकायनोडर्माटा हा फार प्राचीन प्राण्यांचा समूह असून त्याचा मागे कँब्रियन कल्पापर्यंत (सु. ६०–५१ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) माग काढता येतो. या प्राण्यांची जरी अरीय सममिती असली तरी ते द्विपार्श्व-सममित पूर्वजांपासून उत्पन्न झालेले असावेत, असे मानण्यास पुरेसा पुरावा मिळतो. यांचे डिंभ द्विपार्श्व-सममित असतात आणि प्रौढांची अरीय सममिती गौण असते (कारण भ्रूणाच्या विकासात ती बरीच उशीरा उत्पन्न होते). या वस्तुस्थितीवरून वरील गोष्ट जास्त स्पष्ट होते. खुद्द प्रौढ प्राण्यातसुध्दा वरवर दिसणार्‍या अरीय सममितीच्या खाली द्विपार्श्व-सममिती दडलेली असते. सगळ्या अपृष्ठवंशी प्राण्यांपैकी एकायनोडर्म प्राणी हेच रज्जुमान (पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. एकायनोडर्माटांचे डिंभ आणि बॅलॅनोग्लॉससाचा डिंभ यांत पुष्कळच साम्य आहे. या साम्याच्या पुराव्यावरून असे स्पष्ट दिसून येते की, एकायनोडर्म प्राणी आणि रज्जुमान प्राणी एकाच समान पूर्वजापासून उत्पन्न झालेले असले पाहिजेत.

जीवाश्म : कॅल्शियमी पदार्थांचे पत्रे, काड्या किंवा बारीक तुकडे त्वचेत बसवून यांचा सांगाडा तयार झालेला असल्यामुळे त्यांच्या सांगाड्यांचे जीवाश्म होणे शक्य असते. पुष्कळशा एकायनोडर्माटांचे सांगाडे एखाद्या कवचासारखे किंवा डबीसारखे असतात व ते पत्रे, तुकडे इत्यादींसारखे सुटे घटक एकमेकांस घट्ट जोडून तयार झालेले असतात. अशांच्या संपूर्ण कंकालांचे जीवाश्म वारंवार मिळतात. पण कित्येक एकायनोडर्माटांचे कंकाल हे अनेक घटक म्हणजे तुकडे सैलसर जोडून तयार झालेले असतात. त्यांच्या कंकालांचा संपूर्ण जीवाश्म सामान्यत: होत नाही. त्यांचे घटक इतस्तत: विखुरले जातात व सामान्यत: नाश पावतात.

कंकालाचे घटक कॅल्शियम कार्बोनेटाचे बनलेले असतात. त्यांची रचना जाळीदार असते पण गुणधर्म कॅल्साइटासारखे असतात व प्रत्येक पत्रा, तुकडा किंवा काडी म्हणजे कॅल्साइटाचा बाह्य आकार नसलेला व जाळीदार असा एक स्फटिक असतो. मृत एकायनोडर्माटांचे देह गाळात पुरले गेल्यावर त्यांचे मऊ भाग अर्थात कुजून जातात व कंकालाच्या घटकांवर पाण्याची क्रिया होते व त्यांच्यातील छिद्रांत पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेले कॅल्शियम कार्बोनेट साठविले जाऊन ती छिद्रे बुजविली जातात. कॅल्शियम कार्बोनेट साठविण्याची क्रिया ही मूळच्या घटकाच्या स्फटिकाची सुसंगत वाढ होईल अशा रीतीने घडून येते, त्यामुळे घटकाच्या मूळच्या स्फटिकांत भर पडते व त्याचे पाटन (भंग पावण्याची पातळी) अधिक ठळक होते. म्हणून एकायनोडर्माटांचे जीवाश्म किंवा त्यांचे तुकडे कॅल्साइटाच्या पाटनास अनुसरून फुटतात. मुरणार्‍या पाण्याच्या क्रियेने बरेचसे कॅल्साइट साठविले जाऊन व त्याच्या पाटनाचा विकास होऊन जीवाश्माच्या मूळच्या जैव संरचना पार नाहीशा होणे शक्य असते व अशी उदाहरणेही वारंवार आढळतात. मृत एकायनोडर्माटांची ताजी म्हणजे जीवाश्म न झालेली कवचे फुटली, तर भंग पावलेले पृष्ठ वेडेवाकडे व जीवाश्मांच्या भंग पावलेल्या पृष्ठाहून अगदी वेगळ्या प्रकारचे असते. कॅल्शियमी स्पंजांच्या जीवाश्मांचा अपवाद वगळला, तर कॅल्शियमी सांगाडे असणार्‍या इतर कोणत्याही प्राण्याच्या जीवाश्मांचे भंजन-पृष्ठ एकायनोडर्माटांच्या जीवाश्मांच्या भंजन-पृष्ठासारखे असत नाही. त्यांच्या तुटलेल्या भागाची संरचना तंतुमय वा पत्री असलेली आढळते.

एकायनोडर्माटांपैकी आज प्रमुख असणारे प्राणी म्हणजे एल्युथेरोझोआ गटातील प्राणी होत; पुराजीव महाकल्पात (२७.५–२४.५ कोटी वर्षांपर्यंतच्या कालात) ते गौण असत व पेल्मॅटोझोआ प्रमुख असत. पण त्या महाकल्पाच्या अखेरीस पेल्मटोझोआंचे बहुसंख्य वर्ग निर्वंश झाले. क्रिनॉयडिया उरले पण त्यांची संख्या व प्रकार उत्तरोत्तर कमी होत गेले. उलट एल्युथेरोझोआंचे बहुतेक वर्ग शिल्लक राहिले व उत्तरोत्तर त्यांचा उत्कर्ष होत गेला.

इतिहास : एकायनोडर्माटांचा संघ हा प्रदीर्घ इतिहास असणार्‍या प्राण्यांच्या संघांपैकी एक असून एकायनोडर्माटांच्या आजच्या सर्व वर्गांचे प्रातिनिधिक प्राणी पुराजीव महाकल्पातही कमीअधिक संख्येने असत. त्यांच्याशिवाय काही इतर वर्गही पूर्वीच्या, विशेषत: पुराजीवी महाकल्पाच्या काळात असत. त्या निर्वेश वर्गांचा समावेश करून तयार केलेली वर्गीकरणाची एक योजना व त्या योजनेतील प्रत्येक गटाचा आयु:कालावधीही पुढील पानावरील कोष्टकात दिला आहे. या कोष्टकात दिलेल्या गटांपैकी निर्वंश झालेल्या गटांचीच माहिती येथे व जिवंत गटांची माहिती त्या त्या गटाच्या स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.

 

एकायनोडर्माटा संघातील वर्ग व त्यांचा आयुःकालावधी

 

वर्गाचे (गटाचे ) नाव

आयुःकालावधी

 

उपसंघ पेल्मॅटोझोआ

 

 

१.

इओक्रिनॉयडिया

– निर्वेश

मध्य-कँब्रियन ते ऑर्डोव्हिसियन

पॅराक्रिनॉयडिया

– निर्वेश

मध्य-ऑर्डोव्हिसियन

कारपॉयडिया

– निर्वेश

मध्य-कँब्रियन ते पूर्व-डेव्होनियन

सिस्टीडिया

– निर्वेश

कँब्रियन ते पर्मियन

ब्लॅस्टॉयडिया

– निर्वेश

सिल्युरियन ते पर्मियन

एड्रिअँस्टरॉयडिया

– निर्वेश

पूर्व-कँब्रियन ते कारबॉनिफेरस

क्रिनॉयडिया उपसंघ एल्युथेरोझोआ

 

पूर्व-ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यंत

एकिनॉयडिया

 

ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यत

स्टेलेरॉयडिया

 

 

 

अँस्टरॉयडिया (गण)

 

ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यंत

 

ऑफियूरॉयडिया (गण)

 

ऑर्डोव्हिसियन ते आतापर्यंत

 

सॉमॅस्टरॉयडिया (गण)

 

ऑर्डोव्हिसियन ते उत्तर-डेव्होनियन

 

-निर्वश

ओक्रिनॉयडिया : यांचा प्रावरक (संरक्षण आवरण) गोलसर किंवा पेल्यासारखा किंवा पिशवीसारखा व अनेक पत्रे जुळून तयार झालेला असे. पत्र्यांची एकूण संख्या अल्प असे. मंडलाकार जुळविलेल्या पत्र्यांचे एकावर एक मजले होतील अशा रीतीने ते रचलेले असतात. पत्रे छिद्रहीन असतात. सर्वांत वरच्या मंडलाच्या पाचही पत्र्यांना प्रत्येकी एक द्विश्रेणी बाहुक (पत्र्यांच्या दुहेरी रांगांनी बनलेला लहान बाहू) जोडलेला असतो. काही गोत्रांचे बाहुक द्विशाखी असतात. बाहुकांची मडांणी स्थूल मानाने अरीय असते. बाहुकांच्या आतल्या पृष्ठांवर लहानलहान पत्र्यांनी झाकलेल्या अन्न-खोबणी (अन्न असलेला पाण्याचा प्रवाह मुखाकडे नेणार्‍या खोबणी) असतात. मुख असलेल्या भागाच्या विरुध्द टोकास खोड (देठासारखी रचना) असे. ते एकावर एक पत्रा रचून झालेल्या एकेरी चळतीचे असे. यांचे जीवाश्म क्वचित मध्य-कँब्रियन (सु. ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या) व ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) कल्पांच्या खडकांत आढळलेले आहेत.

पॅराक्रिनॉयडिया : अनेक पत्रे जुळून यांचा प्रावरक बनलेला असतो. पत्र्यांचे आकारमान व आकार अगदी सारखे नसतात व त्यांच्यात छिद्र-संहती (छिद्रयुक्त रचना) असते. काही गोत्रांना एकश्रेणी म्हणजे पत्र्यांच्या एकेरी रांगेचे बाहुक व त्या बाहुकांना एकश्रेणी शाखा असतात. काही गोत्रांचे बाहुक सुटे नसून वळविले गेलेले व प्रावरकाच्या पृष्ठास चिकटून पसरलेले असतात. छिद्र-संहतियुक्त पत्र्यांच्या बाबतीत पॅराक्रिनॉयडियांचे सिस्टिडियांच्या पत्र्यांशी व एकश्रेणी बाहुकांच्या बाबतीत क्रिनॉयडियांच्या बाहूंशी साम्य असते. यांचे जीवाश्म फक्त मध्य-आर्डोव्हिसियन कालातील खडकांत आढळलेले आहेत.

कार्‌पॉयडिया : या वर्गात काही विलक्षण व विपथगामी (मार्ग सोडून गेलेले) अशा गतकालीन एकायनोडर्माटांचा समावेश केला जातो. कॅल्शियमी पत्रे जुळून तयार झालेला प्रावरक या प्राण्यांना असतो. प्रावरकाला खोड किंवा तत्सम भाग असतो व कित्येकांच्या प्रावरकाला बाहुक असतात. पण ही लक्षणे सोडली तर एकायनोडर्माटांची कोणतीच लक्षणे त्यांच्यात नसतात. प्रावरक सामान्यत: चापट असतो. कित्येक गोत्रांच्या प्रावरकाच्या पत्र्यांची जुळणी असममित असते. काहींची द्विपार्श्व-सममित असते व त्या सममितीचे प्रतल (पातळी) प्रावरकाच्या चपटेपणाच्या प्रतलाला लंब असते. काही प्रावरकांची एक चापट बाजू दुसरीच्या मानाने किंचित उत्तल असते व तिच्या पत्र्यांचे व दुसर्‍या बाजूंच्या पत्र्यांचे आकारमान व जुळणी ही भिन्न असतात. खोड निमुळते असून टोकाशी बारीक असते किंवा टोकाशी वेडेवाकडे तुटल्यासारखे असते. मुख व गुदद्वार ही खोडाच्या स्थानाच्या विरुद्ध बाजूच्या किनारीवर असतात किंवा त्यांपैकी एक किंवा ती दोन्ही बाजूच्या किनारीवर असतात. कित्येक गोत्रांच्या जीवाश्मांत मुख व गुदद्वार ही दोन्ही आढळली नाहीत. कित्येक गोत्रांना मुख नसतेच. मुखाऐवजी पृष्ठवंशी प्राण्यांच्या क्लोम-छिद्रांसारखी एक छिद्रांची रांग त्यांच्यात असते. सकृद्दर्शनी असे प्राणी रूंद व चापट शीर्ष असलेल्या व चिंचोळे शेपूट असलेल्या आदिम, कवचधारी माशांसारखे थेट दिसतात.

यांची कित्येक गोत्रे सागराच्या तळास चिकटून राहणारी व कदाचित तळालगतच्या भागात संचार करू शकणारी असावीत. त्यांचे जीवाश्म कमीच, पण मध्य-कँब्रियनपासून पूर्व-डेव्होनियनपर्यंतच्या (सु. ५४ ते ४० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत आढळतात. कार्‌पॉयडियाच्या शरीर क्रियांविषयी काहीच सांगता येत नाही. त्यांचा समावेश एकायनोडर्माटात केला जात असला तरी त्यांच्यात व आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांत किंवा त्यांच्यात व मॅकॅएरिडियात काही साम्ये आहेत असे कित्येकांचे मत आहे.

सिस्टिडिया : या वर्गातील प्राण्यांचे शरीर गोलसर, लंबगोलसर किंवा अनियमित आकाराचे व यांचा प्रावरक अनेक पत्रे एकत्र चिकटविले जाऊन बनलेला असे. पत्र्यांचा आकार, त्यांच्या आकाराचा नियमितपणा व पत्र्यांची संख्या ही गोत्रपरत्वे निरनिराळी असतात. क्रिनॉयडिया किंवा ब्लॅस्टॉयडियांच्या मानाने सिस्टिडियांच्या प्रावरकाच्या पत्र्यांची संख्या बरीच अधिक असते व पत्र्यांचे आकार अनियमित असतात. मुखापासून निघून आर्‍याप्रमाणे गेलेल्या तीन, पाच किंवा तीनापेक्षा कमी अन्न-खोबणी असतात. खोबणींना फाटे फुटणे शक्य असते. खोबणींच्या शेवटांशी आखूडसे बाहुक बसविले असतात, बाहुक द्विश्रेणी असतात. त्यांच्या पृष्ठावर अन्न-खोबण असते व ती प्रावरकाच्या पृष्ठावरच्या लगतच्या अन्न-खोबणीशी सलग असते. अन्न-खोबणी व बाहुक यांच्या मांडणीत अरीय सममिती बहुधा नसते. क्वचित अस्पष्ट व क्वचित निश्चित पंचतयी अरीय सममिती असते. पुष्कळ पत्रे असलेल्या प्रावरकात सममिती जवळजवळ नसते. पत्रे जो जो कमी तो तो सममिती सामान्यत: उच्च असते. गुदद्वार व मॅड्रेपोर (मुख व गुद यांच्या मध्ये असलेले बारीक छिद्र) ही प्रावरकाच्या वरच्या भागात व अंतराचरणार-क्षेत्र (दोन चरणार-क्षेत्रांच्या मध्ये असणारे क्षेत्र) असलेल्या भागात असतात.

काही गोत्रांतील प्राण्यांना आखूड किंवा क्वचित लांब खोड असे, काहींना खोड नसे. काही एका स्थानी चिकटलेले तर काही संचारक्षम असत.

सिस्टिडियांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रावरकाच्या पत्र्यातील छिद्रे होत. ही छिद्रे म्हणजे त्या पत्र्यातील नळ्या असत. त्या नळ्या पत्र्याच्या पृष्ठापासून सरळ किंवा तिरप्या दिशेने पत्र्यांच्या आत गेलेल्या असत. छिद्रांची संख्या व त्यांची रचना गोत्रपरत्वे निरनिराळी असे. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे प्रावरक पत्र्याच्या पृष्ठावर बारीक खळ्या असत व प्रत्येक खळीत छिद्रांची एक जोडी असे. दुसरा एक जटिल प्रकार म्हणजे प्रावरकाच्या पृष्ठावर सूक्ष्म, समांतर खोबणी असणारे व शंकरपाळ्याच्या आकाराचे एक क्षेत्र असे व त्या खोबणी अंतर्भागातील नळ्यांशी जोडलेल्या असत. अशा शंकरपाळ्याचा अर्धा भाग एका व अर्धा भाग लगतच्या दुसर्‍या पत्र्यावर असे. कित्येक गोत्रांतील समचतुर्भुज क्षेत्रातल्या मध्याजवळच्या भागावर कॅल्शियमी पदार्थांचे पातळ पत्र्यासारखे झाकण असे. अशा प्रकारच्या छिद्रांच्या गटाला छिद्र-समचतुर्भुज म्हणतात.

सिस्टिडियांच्या पत्र्यातील छिद्र-संहतीकडून कोणते कार्य होत होते हे सांगता येत नाही. त्यांच्यामुळे शरीरातील द्रव व भोवतालच्या समुद्राचे पाणी यांचा संपर्क होऊन त्यांच्यातील वायूंची सरळ देवघेव होत असावी. चयापचयामुळे (शरीरात होणार्‍या रासायनिक-भौतिक घडामोडींमुळे) शरीरात निर्माण झालेल्या अपद्रव्यांचा (निरूपयोगी द्रव्यांचा) निरास होत असावा. ज्यांच्यात कॅल्शियमी पत्र्यांनी झाकलेले छिद्र-समचतुर्भुज असत त्या प्राण्यांत अशी प्रक्रिया घडून येणे अर्थात शक्य नव्हते.

सिस्टिडियांचे सर्वांत जुने जीवाश्म मध्य-कँब्रियन कल्पातले आहेत. उत्तर-आर्डोव्हिसियन कल्पात त्यांचा परमोत्कर्ष झाला. स्वीडनमधील ऑर्डोव्हिसियन कालीन सिस्टिड-चुनखडकात एकायनोस्फेराइट्स गोत्राचे विपुल जीवाश्म आढळलेले आहेत. डेव्होनियन कल्पात त्यांची थोडीच गोत्रे होती. त्या कल्पाच्या अखेरीस ते निर्वंश झाले.

ब्लॅस्टॉयडिया : यांचा कटोर (खोड व बाहुक सोडून राहिलेला शरीराचा वाडग्यासारखा भाग) गोलसर किंवा पेरूच्या किंवा कळीसारख्या आकाराचा व काही थोडे, सामान्यत: तेराच, पत्रे जुळून झालेला असतो. पत्र्यांची मांडणी नियमित व कटोराची सममिती चांगली किंवा उत्कृष्ट अरीय असते. बहुतेक गोत्रांच्या कटोराचा मुखाविरूध्द भाग तीन पत्र जुळून झालेल्या मंडलांचा असतो. या पत्र्यांना आधारक पत्रे म्हणतात. या मंडलाच्या वरचे मंडल पाच व सापेक्षत: बर्‍याच मोठ्या पत्र्यांचे बनलेले असते. त्या पत्र्यांना अरीय पत्रे म्हणतात. कटोराचा पुष्कळसा भाग याच पत्र्यांचा बनलेला असतो. एखादा पुठ्ठा त्याच्या वरच्या कडेकडून कापून, त्याचा खाली निमुळता असा तुकडा कापून टाकल्यावर त्याच्यात जसा साधारण नालाच्या आकाराचा काप होईल तसा काप प्रत्येक अरीय पत्र्यात असतो. अरीय पत्र्यांच्या वर एकांतरित (एकाआड एक) अशा लहानशा पाच पत्र्यांचे एक मंडल असते. त्या पत्र्यांना डेल्टॉइड पत्रे म्हणतात.

कटोराच्या वरच्या पृष्ठाच्या मध्याशी मुख असते व मुखाभोवती नियमित अंतरावर असलेल्या बारीक छिद्रांचे कडे असते. त्या छिद्रांना शिखरिका म्हणतात. कित्येक गोत्रांच्या (उदा., पेंट्रेमाइटांच्या) मुखाभोवती पाच शिखरिका असतात. त्यांच्यापैकी एकीचे छिद्र किंचित मोठे असते. त्याच्यात प्राण्याचे गुदही समाविष्ट असते अशी समजूत आहे. इतर काही गोत्रांच्या मुखाभोवती पाच शिखरिकांऐवजी शिखरिकांच्या पाच जोड्या असतात व गुदाचे छिद्र वेगळे व कटोराच्या वरच्या पृष्ठावरच असते.

शिखरिकांच्या बाहेर असलेल्या भागापासून निघून खाली मुखाविरूध्द दिशेने अरीय कापात गेलेली पाच क्षेत्रे असतात. त्यांना चरणार-क्षेत्रे म्हणतात. या प्राण्यांच्या शरीरात अरीय जलवाहिन्या असल्याचा पुरावा नाही व त्यांची चरणार-क्षेत्रे एकिनॉयडियांच्या चरणार-क्षेत्रांशी समजात होती की नाही हे निश्चित सांगता येत नाही. पेंट्रेमाइट्स हे ब्लॅस्टॉयडियांच्या गोत्रांपैकी एक प्रमुख गोत्र होते. त्याच्या चरणार-क्षेत्रांच्या पुढील वर्णनावरून ब्लॅस्टॉयडियांच्या चरणार-क्षेत्रांच्या व त्यांच्याशी संलग्न अशा इतर अवयवांच्या स्वरूपांची कल्पना येईल. पेंट्रेमाइटांच्या चरणार-क्षेत्रांच्या मधोमध भाल्याच्या पात्याच्या आकाराचा एक पत्रा असतो. त्याला भाला-पत्रा म्हणतात. प्रत्येक भाला-पत्रा हा अनेक बारीक पत्र्यांच्या दोन रांगा जुळून तयार झालेला असतो. त्याच्या मध्यातून त्याच्या लांबीस अनुसरून जाणारी एक बारीक अन्न-खोबण असते व तिला तिच्या उजव्या व डाव्या बाजूकडून येणार्‍या बारीकशा, तिरप्या खोबणी जोडलेल्या असतात. अन्न असलेल्या पाण्याचा प्रवाह मुखाकडे नेणे हे अर्थात अन्न खोबणीचे कार्य असते. भाला-पत्र्यांच्या दोन्ही बाजूंच्या बाहेर व अरीय पत्र्यांच्या आत, बारीक पत्र्यांची एक एकेरी रांग असते. तिच्यातील पत्र्यांना पार्श्वीय पत्रे म्हणतात. पार्श्वीय पत्र्यांच्या प्रत्येक रांगेच्या बाहेरच्या कडेजवळ छिद्रांची एक रांग असते. त्या छिद्रांना सीमा छिद्रे म्हणतात. ती छिद्रे एकमेकांस चिकटून असलेल्या दोन पार्श्वीय पत्र्यांच्या मधे मोकळी जागा राहून उद्‌भवलेली असतात. प्रत्येक पार्श्वीय पत्र्यावर एकेक पक्षसम बाहुक बसविलेला असे. पण असे बाहुक सामान्यत: नष्ट झालेले असतात. अतिशय सुरक्षित राहिलेल्या जीवाश्मातील पार्श्वीय पत्र्यावर मात्र बाहुक असलेले आढळतात.

बाजाच्या पेटीच्या भात्याला जशा घड्या असतात तशा घड्या असलेला पातळ कॅल्शियमी पत्र्याचा एक लांबट अवयव पेंट्रेमाइटांच्या कटोराच्या आत व चरणार-क्षेत्रांच्या प्रत्येक कडेखाली असतो. त्याला जलशिखर म्हणतात. त्याच्या घड्यांची लांबी चरणार-क्षेत्राच्या कडेस अनुसरून असते. जलशिखरातील पोकळीचा सीमा छिद्रांशी व शिखरिकांशी सलग संबंध असतो. सीमा छिद्रांच्या द्वारे पाणी जलशिखरांत शिरत असावे व शिखरिकांवाटे बाहेर पडत असावे अशी समजूत आहे. जलशिखराच्या घड्यांची संख्या व जटिलता ह्या गोत्रपरत्वे व जातीपरत्वे कमीअधिक असतात, पण काही आदिम गोत्रे सोडली तर सर्वांना जलशिखरे असत.

ब्लॅस्टॉयडियांच्या सर्वांत जुन्या गोत्रांचे जीवाश्म मध्य-ऑर्डोव्हिसियन कल्पातले होत. डेव्होनियन कल्पात त्यांची बरीच भरभराट झाली व कार्‌बॉनिफेरस कल्पात परम उत्कर्ष झाला. त्या काळी पेंट्रेमाइटांच्या पुष्कळ जाती अस्तित्वात होत्या. पर्मियन कल्पाच्या अखेरीस ब्लॅस्टॉयडियांचा वर्ग निर्वंश झाला.

एड्रिअ‍ॅस्टरॉयडिया : लहान लहान कॅल्शियमी पत्रे जुळून यांचा प्रावरक तयार झालेला असतो. पत्र्यांची संख्या पुष्कळ व त्यांचे आकार व जुळणी अनियमित असते. प्रावरक सामान्यत: बत्ताशासारखे, चापट गोल असून त्याचे खालचे पृष्ठ एखाद्या बाह्य पदार्थाला चिकटलेले असते. वरच्या पृष्ठाच्या मध्याशी मुख असून ते पत्र्यांनी झाकलेले असते. पाच अरीय खोबणी (चरणार-क्षेत्रे) मुखापासून वरच्या पृष्ठाच्या कडेस गेलेल्या असतात. त्या सरळ किंवा वक्र असतात व कधीकधी त्यांच्या शेवटाकडचा भाग उलट वळलेला असतो. कधीकधी चरणार-क्षेत्रे ही प्रावरकाच्या खालच्या पृष्ठावर किंचित गेलेली असतात. चरणार-क्षेत्रांना शाखा नसतात. प्रत्येक चरणार-क्षेत्र, पत्र्याच्या दुहेरी रांगेचे बनलेले असते व त्या प्रत्येक रांगेतील दोन पत्र्यांमध्ये एक छिद्र असते. अशा छिद्रावरून या प्राण्यांना नालपाद व अरीय जलवाहिका असाव्यात अशी कल्पना केली जाते. प्रत्येक चरणार-क्षेत्र हे पत्र्यांच्या दुहेरी रांगेने झाकलेले असते व रांगेतील पत्र्यांची व्यवस्था एकांतरित असते. चरणार-क्षेत्रांना बाहू किंवा बाहुक नसतात.

प्रावरकाच्या वरच्या पृष्ठावर, त्याच्या पश्च भागातील व अंतराचरणार-क्षेत्रात गुद असते व ते पत्रे रचून झालेल्या एका पिरॅमिडाने झाकलेले असे. वरच्या पृष्ठावर मुख व गुद यांच्यामध्ये एक बारीक छिद्र असते त्याला मॅड्रेपोर किंवा जलच्छिद्र म्हणतात.

एकायनोडर्माटांपैकी हा सर्वांत जुन्या प्राण्यांचा वर्ग असून कँब्रियन ते कार्‌बॉनिफेरस कालातील खडकांत या वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. ऑर्डोव्हिसियन हा त्यांच्या परम उत्कर्षाचा काल, पण जीवाश्म एकंदरीत विरळाच आढळतात.

सॉमॅस्टरॉयडिया : अ‍ॅस्टरॉयडिया गणातील प्राण्यांसारख्या गतकालीन प्राण्यांचा गण. या गणातील प्राण्यांचा आकार पाच पाकळ्या असलेल्या चापट पंचपाळ्यासारखा असतो. स्पष्ट वेगळे असे बाहू नसतात. यांची चरणार-क्षेत्रे बारीक पत्र्यांच्या दुहेरी रांगांची असतात व प्रत्येक रांगेतील पत्र्यांची व्यवस्था दुहेरी असते. चरणार पत्र्यांच्या रांगेला तिरप्या व तिच्यापासून बाहेर जाणार्‍या काड्या किंवा संधित काड्यांच्या सरळ रांगा चरणार पत्र्याच्या बाजूला जोडलेल्या असतात. अशा काड्या असणे हा त्यांच्यातील व अ‍ॅस्टरॉयडियातील मुख्य भेद आहे. आयु:कालावधी पूर्व-ऑर्डोव्हिसियन ते उत्तर-डेव्होनियन.

 

संदर्भ : 1. Beerbower, T. R. Search for the Past : An Introduction to Paleontology, New Delhi, 1965.

2. Easton, W. H. Invertebrate Paleontology, New York, 1960.

3. Harmer, S. F.; Shipley, A. E. Ed., The Cambridge Natural History, Vol. I, Codicote (England), 1968.

4. Hyman, L. H. The Invertebrates :  Echinodermata, Vol. IV, New York, 1955.

लेखक  : क. वा. केळकर, कुसुम गोखले

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate