অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एडगर शॅनॉन अँडरसन

एडगर शॅनॉन अँडरसन

(९ नोव्हेंबर १८९७– ). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील·फॉरेस्टव्हिल (न्यूयॉर्क) येथे जन्म. त्यांचे शिक्षण मिशिगन स्टेट विद्यापीठात, वनस्पतिविज्ञान व उद्यानविज्ञान या विषयांतील बी. एस्‌सी. पदवीपर्यंत (१९१८) झाले.·त्यानंतरचे शिक्षण ई. एम्. ईस्ट यांच्या मार्गदर्शानाखाली हार्वर्ड विद्यापीठाच्या बसे संस्थेत होऊन ते एम्. एस्. (१९२०) व एस्‌सी. डी. (१९२२) झाले. त्यापुढे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वनस्पतिविज्ञानाच्या हेन्‍री शॉ स्कूलमध्ये व मिसूरी शास्त्रीय उद्यानात, एकाच वेळी (१९२२—३१) ते प्राध्यापक व संशोधक म्हणून काम करीत असत. १९३१—३५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक व आर्नल्ड वृक्षोद्यानात वृक्षतज्ज्ञ‍ आणि १९३५ नंतर पुन्हा वॉशिंग्टन विद्यापीठात व मिसूरीत प्राध्यापक याप्रमाणे त्यांनी काम केले. इंट्रोग्रेसिव्ह हायब्रिडायझेशन (१९४९) व प्‍लँट्स,मॅन अँड लाइफ (१९५२) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १९५४ मध्ये ते नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. वनस्पतींच्या वर्गीकरणातील व जातींच्या क्रमविकासातील समस्या सोडविण्यास कोशिकाविज्ञान (शरीरातील कोशिकांचा म्हणजे सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र) व आनुवंशिकी यांतील तंत्र व कल्पना यांची मदत घेणाऱ्यापैंकी अँडरसन हे एक असून तंबाखू,आयरिस,अ‍ॅपोसायनम, मका इत्यादींसंबंधीचे संकरण, रंगसूत्रे (आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणारे सुतासारखे घटक) वगैरेंचा त्यांनी सखोल अभ्यास व महत्त्वाचे संशोधन केले आहे. क्रमविकासात संकराचे महत्त्व व इंट्रोग्रेशनची (जनुकाचा एका जनुकसमुच्चयातून दुसऱ्यात प्रवेश,  जीन) प्रक्रिया यांमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.ट्रॅडेस्कँशिया पॅल्युडोसा ही नवीन शोभिवंत जाती त्यांनी शोधून काढली आहे. [ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना].

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate