অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एराइडस

एराइडस

फुलांच्या सौंदर्याबद्दल व कधीकधी सुगंधाबद्दल प्रसिद्ध असलेल्या ऑर्किड वनस्पतींच्या [→ ऑर्किडेसी] कुलातील एका वंशाचे हे नाव असून यात समाविष्ट असलेल्या सु. ३०-४० जातींचा प्रसार भारत, इंडोचायना, मलेशिया (न्यू गिनी वगळून), जपान इ. प्रदेशांत आहे. महाराष्ट्रात (कोकण, महाबळेश्वर इ.) तीन जाती आढळतात. ग्रीक भाषेत एराइडस या संज्ञेचा अर्थ वायवी वनस्पती असा आहे व ते नाव ह्या जाती अपिवनस्पती असल्याने दिले गेले आहे. समशीतोष्ण कटिबंधात त्या उष्ण पादपगृहात (काचगृहात) वाढवतात. यांच्या पर्णयुक्त खोडावर पानांच्या दोन रांगा असून पाने रेषाकृती किंवा शूलाकृती, जाड व मांसल असतात. त्यांचा तळभाग (उरलेला पडून गेल्यावरही) खोडाला सतत वेढून राहतो. महाराष्ट्रातील जातींना मेमध्ये फुले येतात; ती विपुल व आकर्षक असून बहुधा ती बाजूस व खाली वळलेल्या साध्या किंवा संयुक्त मंजरीवर येतात. संदले प्रदलाएवढी व पसरट; बाजूच्यापेक्षा वरचे संदल मोठे, बाजूची तळास जुळलेली व स्तंभास चिकटलेली; प्रदले वरच्या संदलासारखी; ओष्ठ उभा किंवा वाकलेला, शुंडिका लहान, वाकडी व पोकळ; परागपुंज दोन [→ फूल]. महाराष्ट्रातील तीन जातींपैकी एराइडस क्रिस्पमची फुले सुगंधी व पांढरी असून त्यांवर गुलाबी छटा असते; ए. मॅक्युलोजमच्या फुलांना वास नसतो, पाकळ्या गुलाबी असून त्यांवर गडद रंगाचे ठिपके असतात; ए. रॅडिकोसमच्या पाकळ्या फिकट जांभळट गुलाबी व त्यांवर गर्द ठिपके असतात. ए. ओडोरॅटम या चीन व भारत येथे आढळणाऱ्या जातीची फुले मोठी, सुगंधी, पांढरी असून त्यांवर टोकास किरमिजी ठिपके असतात.

 

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate