(व्हाइट एल्म; लॅ. उल्मस अमेरिकाना; कुल-उल्मेसी). सु. ४० मी. उंच वाढणाऱ्या या भव्य व शोभादायक वृक्षाचा प्रसार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील रॉकी पर्वताच्या पूर्वेच्या सर्व राज्यांत व दक्षिण कॅनडात आहे. तो बहुधा उंच ठिकाणी व ओलसर जमिनीत वाढतो. देठाजवळचा अंडाकृती पात्याचा भाग दोन्हीकडे सारखा नसतो. साल फिकट करडी, फांद्या साधारणत: लोंबत्या व कोवळे भाग लवदार असतात. खोडाचा व्यास १·८५ - ३·१० मी. असतो. करड्या रंगाच्या खवल्यांनी झाकलेल्या फुलांच्या कळ्या पर्णकिणांच्या (पानांच्या व्रणांच्या) बाजूस हिवाळ्याच्या आरंभी येतात. फुलोरे, मंजरीसारखे किंवा झुबक्यासारखे असून फुले लहान व द्विलिंगी; फळ शुष्क, सपक्ष कृत्स्न (म्हणजे आपोआप न फूटणारे व बाह्य आवरणापासून अलग असलेले एकच बीज असणारे) व टोकास खाचदार असून कडेवर लव असते. लाकूड जड व कठीण असून धक्के सहन करू शकते. खुर्च्या, पेट्या, खोकी, पिपे, जहाजबांधणी, खेळाचे साहित्य इत्यादींकरिता ते वापरतात. झाडे रस्त्याच्या कडेने दुतर्फा लावतात. स्लिपरी एल्म (उल्मस फल्वा ) ची अंतर्साल बुळबुळीत व शोथशामक (दाहयुक्त सूज कमी करणारी) असते.
लेखक: जमदाडे, ज. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
आवळी : (हिं. अमलिका; गु. आमला, अंबाल; क. अमलका; सं...
उगद : (रानभेंड, बोंडसा; क. बोंडले; लॅ. टेट्रामेलिस...
वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्या विका...
हे लहान व साधारण उंचीचे रुक्ष ठिकाणी वाढणारे झुडूप...