অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कडूकवठ

कडूकवठ

कडूकवठ

(कडवी कवठ, खष्ट, खैट, कौटी; हिं, काष्टेल, कवा; क. गरुडफळ, निरदिवित्तुलू; लॅ. हिद्नोकार्पस लॉरिफोलिया ;कुल-फ्लॅकोर्टि एसी ). सु. १२-१५ मी. उंच वाढणारा हा सदापर्णी वृक्ष उष्णकटिबंधातील दाट जंगलात व भारतात (पश्चिम घाटात, कोकणाच्या दक्षिणेस व घाटाखाली कारवार आणि मलबारात) दमट जागी, विशेषतः पाण्याजवळ आढळतो; त्रावणकोरमध्ये सामान्यपणे ६२॰ मी. उंचीपर्यंत आढळतो.

कोवळ्या भागांवर भुरी लव असते. पाने मोठी साधी, अंडाकृती किंवा लांबट भाल्यासारखी, टोकास निमुळती आणि चिवट; फुले पांढरी, एकाकी किंवा मंजरीवर जानेवारी-एप्रिलमध्ये येतात. मृदुफळे कठीण, लवदार, लंबगोल, लिंबाएवढी; बिया पुष्कळ, साधारणत: कोनयुक्त.

कडू कवठ (फळासह फांदी)

बियांपासून सु. ४४% मेदी (चरबीयुक्त) तेल (कवटेल, खैटेल) मिळते; ते पिवळे पण स्वादहीन व बेचव असून त्यामध्ये हिद् नोकार्पिक अम्ल (४८.७%), चौलमुग्रिक अम्ल (२७%) ओलेइक अम्ल (६.५% इ. घटक असतात.

रासायनिक संघटन व भौतिक गुणधर्म चौलमुग्रा तेलासारखे असतात. ते दिव्यात जाळण्याकरिता व औषधाकरिता फार उपयुक्त असते. त्वचारोग व महारोगावर अत्यंत गुणकारी. फळ श्रीलंकेत माशांना गुंगविण्यासाठी वापरतात. लाकूड पांढरे व बऱ्यापैकी असून तुळया, वासे इत्यादींकरिता वापरतात.

चौलमुग्रा तेल गायनोकार्डीया ओडोरॅटा व हिद् नोकार्पस कुर्झी या दोन जातींपासून काढतात पण त्याचे गुणधर्म कमी प्रतीचे असतात.

 

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate