অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कण्हेर

कण्हेर

कण्हेर

(कणेरी; हिं. कनेर; गु. कणेर; क. कणिगिल, कणगिले; सं. हयमारक, अश्वघ्न, प्रतिहास, करवीर, विषवृक्षांक; इं. इंडियन स्वीटसेंटेड ओलिअँडर; लॅ. नेरियम इंडिकम, ने. ओडोरम; कुल - अ‍ॅपोसायनेसी). हे मोठे सदापर्णी झुडूप हिमालयात नेपाळपासून पश्चिमेस काश्मीरपर्यंत १,९५० मी. उंचीपर्यंत गंगेच्या खोऱ्यात, मध्य प्रदेशात व इतरत्रही तुरळकपणे (विशेषतः नाल्यांच्या काठाने) आढळते.

सुवासिक व लाल, गुलाबी किंवा पांढऱ्या आकर्षक फुलांमुळे शोभेकरिता हे बागेमध्ये किंवा कुंपणाच्या कडेने सामान्यपणे लावतात. याच्या सर्व भागांत दुधी चीक असतो. पाने प्रत्येक पेऱ्यावर दोन किंवा तीन, रेषाकृती, फिकट हिरवी, चिवट व टोकदार असतात. त्यांची संरचना सामान्यपणे⇨अ‍ॅपोसायनेसी कुलात वर्णिल्या प्रमाणे. पुष्पमुकुट घंटेसारखा व त्याच्या कंठामध्ये खवल्यांचे तोरण असते [→ फूल]. पेटिकामुळे (१५-२३ सेंमी.) जोडीने हिवाळ्यात येतात; बिया अनेक, प्रत्येकीवर एका टोकास तपकिरी केसांचा झुबका असतो. नवीन लागवड कलमांनी करतात.

कण्हेरीचे सर्व भाग विषारी असून मुळे, साल व बियांमध्ये अनेक ग्लायकोसाइडे असतात; त्यांची क्रिया हृदयावर डिजिटॅलिनासारखी होते. सालीत थोडे टॅनीन व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. पानांमध्ये ओलिअँड्रिन हे हृदय-बलवर्धक द्रव्य असते.

मुळे कडू व विषारी; रक्ती मुळव्याध व व्रणांवर बाहेरून मुळांचा लेप लावतात; सालीचे तेल त्वचारोगांवर उपयुक्त; पानांचा ताजा रस  नेत्रशोथावर (डोळ्याच्या दाहयुक्त सुजेवर), डोळ्यांतून पाणी निचरण्यास घालतात. फुले देवांना (श्री गणपती व श्री सूर्यनारायण) वाहतात. फुले  सुवासिक, पांढरी, गुलाबी किंवा लाल रंगाची असून फांद्यांच्या टोकाशी वल्लरीवर सामान्यपणे वर्षभर येतात, तथापि एप्रिल-जूनमध्ये बहर असतो. नेरियम ओलिअँडर (इं. रोझ बे) या जातीची फुले फिकट गुलाबी किंवा पांढरी व सुवासिक असतात.

 

लेखक: ज. वि.जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate