অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कर्दळ

कर्दळ

कर्दळ

(हिं. सब्बजय; गु. अकल बेरा; क. कळेहू, कावाळी; सं. देवकेली, सर्वजया; इं. इंडियन शॉट; लॅ. कॅना इंडिका; गण-सिटॅमिनी; कुल-कॅनेसी). शोभादायक, मोठी व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ðओषधी; मूलस्थान-वेस्ट इंडीज, मध्य आणि दक्षिण अमेरिका; लागवड-सर्व उष्ण देशांत. भारतात उद्यानांतून अनेक जाती व संकरज (दोन भिन्न प्रकारांपासून झालेली संतती) प्रकार आढळतात.

मूलक्षोड (जमिनीखालील खोड) लठ्ठ व वायवीय (जमिनीवरील) खोड ०.९ - १.२ मी. उंच; पाने साधी, मोठी (१५-४५ X १०-२० सेंमी.); देठ व मध्य शीर पन्हळीदार; पर्णतल आवरक (खोडास वेढणारा). फुलोरा कणिश किंवा मंजरी [→ पुष्पबंध]; फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने लाल, पिवळी, शेंदरी व मिश्र रंगांची असतात.

सामान्य शारीरिक लक्षणे ðसिटॅमिनी गणात वर्णिल्याप्रमाणे. छदे (फुले वा फुलोरा ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) हिरवी, पातळ; बोंड गोलसर, काटेरी, तीन कप्प्यांचे; बिया अनेक, काळ्या, गोल व छर्‍याप्रमाणे.

मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), स्वेदकारी (घाम आणणारे), शामक व उत्तेजक; मूलक्षोडाचे तुकडे तांदळाच्या धुवणातून मिऱ्‍याबरोबर उकळून जनावरांना विषबाधा झाल्यास देतात. बिया हृदबल्य व जखमा भरून येण्यास चांगल्या. खोडातील धागे तागाप्रमाणे उपयुक्त असतात .

लेखक: ज. वि. जमदाडे

कर्दळीची लागवड साधी आणि सोपी आहे. चांगली मशागत केलेली, खतावलेली, भुसभुशीत, सुपीक व ओलसर जमीन तिला लागते. कर्दळीला उष्ण हवामान लागते. थंडीच्या कडाक्याने अपाय होतो. कर्दळीची अभिवृद्धी मूलक्षोडापासून करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या निरनिराळ्या रंग-छटांच्या, मोठ्या फुलांच्या जाती तयार करण्यात आलेल्या आहेत. बी पाण्यात भिजत घालून लावल्यास लवकर उगवते.

वाफ्यातून लावावयाची असल्यास झाडात ०.३ X ०.३ मी. व लांब लांब एकएकटीच ओळीत लावावयाची असल्यास झाडांत १ ते १.५ मी. अंतर ठेवतात.

फुले कोमेजल्याबरोबर तोडल्यास जास्त फुले येत राहतात. फुले येऊन गेल्यावर दर हंगामास लागवडीकरिता चांगले कंद मिळण्याकरिता, कंद खणून काढून त्यांना विश्रांती देतात.

लेखक: रा.मो.चौधरी

कर्दळीला मुळावरील गाठी हा रोग सूत्रकृमींमुळे (नेमॅटोडा संघातील कृमींमुळे) होत असून त्यामुळे मुळावर लहान लहान गाठी येतात; झाडाची वाढ खुंटून ते रोगट दिसते. रोग निवारण्यासाठी रोगट जमीन टाळतात व निरोगी कंद लावतात.

लेखक: य. स. कुलकर्णी

पिवली कर्दळ लाल कर्दळ

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate