অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलिंगड

कलिंगड

कलिंगड

(टरबूज; क. कलंगाडे; गु. करींग; सं. तरंबुज; इं. वॉटर मेलॉन; लॅ. सिट‌रुलस व्हल्‌गॅरिस; कुल-कुकर्बिटेसी). ही जमिनीवर पसरून वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानमध्ये जंगली अवस्थेत आढळते; तेथून तिचा भारताचे इतर भाग, ईजिप्त, श्रीलंका व चीन येथे प्रसार झाला. तिची लागवड आता सर्व उष्ण प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर करतात. भारतात या वेलीची शारीरिक लक्षणे सामान्यत: ⇨कुकर्बिटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे मोठी, गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी क्वचित लांबट वाटोळी व आकाराने मोठ्या सफरचंदापासून ५० सेंमी. पर्यंत व्यासाची व आत पांढरट ते लालबुंद रंगाच्या सर्व छटा असलेल्या मगजाने (गराने) भरलेली असतात.

मगजात पाण्याचे प्रमाण फार मोठे असते. कलिंगडाच्या १०० ग्रॅ. खाद्य भागाचे पृथक्करण : जलांश - ९२ ग्रॅ.; कार्बोहायड्रेटे - ७.० ग्रॅ.; फॉस्फरस - ७.० मिग्रॅ.; थायामीन - ०.०५ मिग्रॅ.; प्रथिन - १.०० ग्रॅ.; कॅल्शियम - ७.०० मिग्रॅ.; रिबोफ्लाविन - ०.०५ ग्रॅ.; क जीवनसत्त्व - ६.०० मिग्रॅ.; अ जीवनसत्त्व - ५९९ आंतरराष्ट्रीय एकके. बिया विपुल, लहान, चापट, पांढ‌‌र्‍या, काळ्या अगर करड्या असतात. मगज निरनिराळ्या प्रकारांत कमीअधीक गोड पण थंड, तृष्णाशामक व उत्तेजक असतो. बियांपासून फिकट तेल मिळते, ते खाद्य व दिव्याकरिता उपयुक्त असते. पांढरे टरबूज, साहेबी, काळे, सुरई, कलमी, कबरा, चित्रा इ. नावांनी काही प्रकार ओळखले जातात; सालीचा रंग, मगजाची चव व रंग, फळांचा आकार वगैरे लक्षणांनी फरक केले जातात. फळे शीतक (थंडावा देणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी) व बिया वाजीकर (कामोत्तेजक) व पौष्टिक असतात. तिंडा (दिलपसंद) हा याचाच प्रकार (फिस्टुलोसस) वायव्य व उत्तर भारतात, गुजरात, पंजाब व सिंध या प्रदेशांत पिकवतात. फळे हिरवट, संत्र्याएवढी असतात; भाजी व लोणच्याकरिता उपयुक्त असतात.

लेखक: ब. ग. क्षीरसागर

कलिंगडाला नदीच्या पात्रातील वाळुसरायुक्त गाळाची, कसदार, निचर्‍याची जमीन लागते. २-२.२५ मी. अंतरावर सर्‍या पाडून सऱ्यांच्या बगलेत बिया लावतात; अगर १.५ मी अंतरावर खड्डे करून त्यांत भरपूर शेणखत घालून प्रत्येकी ४-५ बिया जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, काही भागांत जून-जुलैमध्येही लावतात. दोन आठवड्यांनी त्यांतील दोन रोपे काढून टाकतात. वेल जमिनीवरच पसरवतात. लागणीपासून चार ते साडेचार महिन्यांत फळे पिकतील तशी काढून घेतात. हेक्टरमध्ये ५,०००-६,००० किग्रॅ. फळे मिळतात.

लेखक: ह. चिं. पाटील

रोग

कलिंगडावर मर, खोडावरील डिंक्या आणि करपा हे रोग पडतात.

(१) मर :हा सर्वत्र आढळतो आणि तो फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम प्रकार निव्हेयम ह्या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) होतो. इतर मर रोगांप्रमाणे कलिंगडाची रोपे सुकून मरतात. रोगप्रसार बियांद्वारे होतो. हे कवक दहा वर्षेपर्यंत जमिनीत जिवंत राहाते म्हणून रोग निवारण्यासाठी रोगप्रतिकारक जाती लावतात.

(२) खोडावरील डिंक्या : हा मायकोस्फिरिला मेलॉनिस ह्या कवकामुळे होतो. बीजदलावर व पानावर ठिपके पडतात. खोडाच्या मध्यत्वचेतील व्रणांतून (जखमांतून) डिंकासारखा स्राव बाहेर पडतो. असे वेल मरतात. प्रतिबंधक उपाय म्हणून पिकाची फेरपालट करतात.

(३) करपा : हा कोलेटॉट्रिकम लॅजेनेरियम या कवकामुळे होतो. पानांवर तसेच फळांवर काळे डाग पडतात. रोग निवारण्यासाठी कवकनाशक फवारतात.

कीड : कलिंगडावर पडणाऱ्या लाल भुंगेरा, मावा, कुरतडणाऱ्या अळ्या व फळमाशी या कीडींच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन किंवा फॉलिडॉल फवारतात.

 

लेखक: य. स. कुलकर्णी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate