অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कल्होणी

कल्होणी

कल्होणी

(कवशी, कौशी; क. हैगा, उण्णी; इं. होपिया; लॅ. होपिया वाइटियाना; कुल-डिप्टेरोकार्पेसी). हा मध्यम ते मोठ्या आकाराचा वृक्ष भारतात पश्चिम द्वीपकल्पातील सदापर्णी जंगलात कोकणापासून दक्षिणेपर्यंत आणि तमिळनाडू राज्यात आढळतो; तसेच उत्तर कारवारच्या घाटातील नद्यांच्या व नाल्यांच्या कडेनेही आढळतो. कोवळ्या फांद्या लवदार; जून खोडावरची साल गुळगुळीत असून तिचेचौकोनी तुकडे निघतात. अंतर्साल पांढरी किंवा पिवळट, पाने साधी, सोपपर्ण (उपपर्णांसह) व एकाआड एक, आयत-कुंतसम (भाल्यासारखी), गुळगुळीत, शिरा तिरप्या, देठ लवदार. फुले गुलाबी, दोन सेंमी. व्यासाची, सच्छद, एक ते सहा किंवा बहुधा तीन एकत्र असून अकुंठित, कक्षास्थ (बगलेतील) परिमंजरीवर मार्च-जूनमध्ये येतात [पुष्पबंध; फूल]. फळे अंडाकृती, सपक्ष, किरमीजी असून उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात येतात. रोगामुळे फुलोऱ्याचे रूपांतर स्पॅनिश चेस्टनटाप्रमाणे गोलसर काटेरी गोळ्यात होते.

लाकूड लालसर तपकिरी व त्यात पांढऱ्या रेषा असे असून कठीण, गुळगुळीत, जड, बळकट व टिकाऊ असते. त्याचा उपयोग बांधकाम, गाडीची चाके, जडावाचे आणि कातीव काम इत्यादींकरिता होतो. ते चांगले इंधन आहे. कारवारात मंदिरे बांधण्याकरिताही त्याचा वापर करतात.

 

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate