অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कापूर कचरा

कापूर कचरा

कापूर कचरा

(कापूरकाचरी, कापूरकचरी, काचरी; हिं. सिघौल, चंद्रमूळ; गु. कपूरकाचरी; क. कच्चूरा; सं. चंद्रमूलिका, सुगंधकचोर; लॅ. कॅंफेरिया गॅलंगा; कुल-झिंजिबरेसी). ही लहान, सुंदर ओषधी [→ ओषधि] मलायात व भारतात सर्वत्र आढळते व बागेत शोभेकरिताही लावतात.

मूलक्षोडापासून (जमिनीतील खोडापासून) जमिनीवर दोन किंवा तीन गोलसर व पातळ पाने येतात आणि जमिनीवर सपाट पसरून वाढतात. फुले पांढरी, सुगंधी, ६-१२, लहान फुले सरळ दांड्यावर जून-जुलैत येतात. फुलांच्या ओष्ठांवर जांभळट ठिपके असतात. इतर शारीरिक लक्षणे भुई चाफा [→ चाफा, भुई] आणि ⇨सिटॅमिनी गणातील झिंजिबरेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.

मूलक्षोडास कापरासारखा वास व कडू चव असते, त्यात बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते व ते सुगंधी द्रव्यांत आणि सौंदर्यप्रसाधनांत वापरतात; तांबूलातून पाने व खोडाचे तुकडे खातात. खोड उत्तेजक, कफोत्सारक, मूत्रल (लघवी साफ करणारे) आणि वायुनाशी असून खोकल्यावर त्याचे चूर्ण मधातून देतात. डोळे येणे, घसा धरणे, सूज, संधिवात, ज्वर इत्यादींकरिता पानांचे धावन व पोटीस उपयुक्त असते. कीटकांपासून कपड्यांचे संरक्षण करण्याकरिता खोडाचे तुकडे वापरतात.

लेखक: ज. वि. जमदाडे

कापूरकचरा ह्या वनस्पतीच्या कुलात अंतर्भूत असणाऱ्या दुसऱ्या एका वंशातील जातीला (हेडीशियम स्पायकॅटा) कापूरकाचरी (कपूरकाचरी; सं. गंधशटी; हिं. कापूरकचरी) हे नाव असून ती पश्चिम आणि मध्य हिमालयात १,०५०- २,२५० मी. उंचीवर आढळते; ती ⇨सोनटक्क्याप्रमाणे दिसते व तिची पांढरी फुले टोकास कणिशावर गर्दीने येतात. मूलक्षोड फार सुगंधी व कडू असते; बाजारात कापूरकाचरी नावाने तिच्या काचऱ्या मिळतात.

अबीर (बुक्का) बनविण्यात तिचा उपयोग करतात; तंबाखूला सुवास येण्यास खोडाचे चूर्ण वापरतात; खोडातील सुवासिक तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्ये व सौंदर्यप्रसाधने यांत करतात; पानांच्या चटया बनवितात. खोडाचे चूर्ण किंवा काढा उत्तेजक,वायुनाशी, दीपक (भूक वाढविणारा) व पौष्टिक असतो.

मासे पकडण्यास लागणाऱ्या सुगंधी चूर्णात व पशुवैद्यकात खोडाचा वापर करतात. मांस व डाळ शिजताना या वनस्पतीची सुकी फळे घातल्यास ते पदार्थ लवकर नरम होण्यास मदत होते. मालागिरी नावाचे सुगंधी कापड बनविताना मेंदीबरोबर खोडाचे चूर्ण वापरतात.

 

लेखक: शं. आ.परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate