অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कायफळ

कायफळ

कायफळ

(गु.कारीफळ; क.किरिशिवणी, इप्पेमरा; सं.कटफळ; इं.बे-बेरी, बॉक्स मिर्टल; लॅ.मिरिका नागी; कुल-मिरिकेसी). सु.३-१५ मी. उंचीचा हा सदापर्णी आणि सुगंधी वृक्ष हिमालयाच्या पायथ्यास रावी ते पूर्वेस आसामकडे, खासी, जैंतिया नागा आणि लुशाई टेकडया (९००-२,१०० मी.उंचीपर्यंत) येथे आढळतो.

शिवाय चीन व जपानमध्येही सापडतो; चीनमध्ये शेकडो वर्षे लागवडीत आहे. साल उदी अथवा पिंगट, उभ्या व खोल भेगांमुळे खरबरीत; पाने साधी, एकांतरित (एकाआड एक),भाल्यासारखी, अनुपपर्ण (उपपर्णरहित), विशालकोनी; फुले एकलिंगी, लहान, कक्षास्थ (बगलेतील) मंजऱ्यांवर येतात.

संदले व प्रदले नसतात. केसरदले दोन किंवा अधिक; किंजपुटात एक कप्पा आणि एक बीजक [→फूल ]; फळ लंबगोल अश्मगर्भी (आठळीयुक्त); फळाची साल बारीक उंचवटयांनी भरलेली, लालसर किंवा पिवळसर रंगाची; बी अपुष्क (वाढणाऱ्या बीजाच्या गर्भाला अन्न पुरविणारा पेशी समूह नसलेली); फळे खाद्य व आंबटगोड असून उत्तेजक पेय तयार करण्यासाठी वापरतात. फहांवरील मेणाचा पातळ थर उकळत्या पाण्यात टाकून वेगळा करतात. साबण, मेणबत्त्या, कातडयांना लावण्याचे पॉलिश इत्यादींमध्ये ते मेण वापरतात.

कायफळ : (१) पाने व फुले, (२) फळे

फळे शामक, दीपक (आकुंचन करणारी), जंतुनाशक; ज्वर, दमा, कफ यांवर उपयुक्त असून ती मत्स्यविषही आहे. सालीतील पिवळट रंग कातडी कमावण्यास व रंगविण्यास उपयुक्त, पण त्यामुळे कातडयांना चिरा पडतात. लोकरीस व कापडासही रंगाच्या छटा देतात. साल दातदुखीवर चावण्यास व चघळण्यास वापरतात; सालीचा रस जखमा धुण्यास चांगला.

 

 

लेखक: य. बा. राजे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate