অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कारवी

कारवी

कारवी

(क.गुर्गीलॅ.कारविया कॅलोसस स्ट्रॉबिलॅथस कॅलोसस; कुल-अ‍ॅकॅंथेसी). सु.१·८–६·२० मी. उंच वाढणाऱ्या ह्या बळकट झुडुपाचा प्रसार सह्याद्री घाटात भरपूर असून त्याचे लहान मोठे समूह आढळतात; पानझडी जंगलात व दाट जंगलात त्यांचे निम्नरोह (मोठ्या वृक्षांच्या खाली किंवा त्यांच्यामध्ये वाढणारे लहान वृक्ष) असतात; मध्य भारतातही त्याचा प्रसार आहे.

खोड दृढ, खरबरीत व बारीक दांड्यासारखे, पाने १०–२३ x ४–८ सेंमी., संमुख (समोरासमोर) व प्रत्येक जोडीतील एक दुसऱ्यापेक्षा लहान दीर्घवृत्ताकृतीकुंतसम (भाल्यासारखी), काहीशी टोकदार, दंतुर व केसाळ किनारीची, वरुन गर्द हिरवी आणि खालून फिकट; फुले कक्षास्थ (बगलेत),सच्छद, लहान, वर निळी आणि खाली पांढरी असून साध्या किंवा शाखायुक्त, लांबट गोलसर, कणिश-फुलोऱ्यावर सप्टेंबर–नोव्हेंबरमध्ये सात ते दहा वर्षांच्या अंतराने एकदा येतात.

छदे हिरवट गुलाबी, खोलगट व चिकट आणि उग्र वासाच्या स्त्रावाने आच्छादलेली असतात [ →फूल]. बोंड संवर्ताने वेढलेले, लंबगोल पण तळाशी निमुळते असून त्यात दोन केसाळ बिया असतात [→ऍकॅंथेसी].

खोडाची साल वेदनाहारक असून मुरड्यावर शेकण्यास व लालाग्रंथिशोथावर (लाळ-ग्रंथीच्या दाहयुक्त सुजेवर) बाहेरुन लावण्यास उपयुक्त.

फुलांनी जखम भरुन येते. खेडूत लोक ताजी पाने शक्तिवर्धक व ज्वरनाशक म्हणून वापरतात, पण त्यामुळे पोटात आग होते व फार ओकाऱ्या होऊन त्रास होतो. पाने जनावरांना चारतात. झाडे वरचेवर छाटून त्यानंतर आलेल्या बारीक फांद्या छपराकरिता व कुडाच्या भिंतीकरिता वापरतात.

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate