অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किंजळ

किंजळ

(किंदल; क. बिलीमत्ति; लॅ. टर्मिनॅलिया पॅनिक्युलॅटा; कुल – कॉंब्रेटेसी), हा एक फार मोठा पानझडी वृक्ष अर्जुन, ऐन, हिरडा, इत्यादींच्या वंशातील आणि ⇨ कॉंबेटेसी कुलातील असल्याने त्याची सामान्य लक्षणष त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. याचा प्रसार भारतात मिश्र जंगलात असून पश्चिम द्वीपकल्पात विशेषत: मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत, उत्तर कारवारात, कोकणात घाटाच्या पायथ्याशी, गुजरातेत (सुरत) व त्रावणकोरमध्ये (६२० मी. उंचीपर्यंत) विपुल आहे. याची साल खरबरीत, गर्द तपकीरी व त्यावर आडव्याउभ्या उथळ भेगा असतात; तिच्या पातळ व  सपाट कपऱ्या निघतात.

कोवळे भाग तांबूस लवदार असतात. पाने १० – १८ सेंमी. लांब, खालची अल्पसंमुख (काहीशी समोरासमोर), वरची एकांतरित (एकाआड एक), चिवट, गुळगुळीत, आयत-लंबवर्तुळाकृती व टोकदार असून देठावर दोन प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुले तांबूस, पिंगट, केसाळ, लहान, एकबीजी व कठीण असून त्यांवर तीन विषम पंख असतात. डिसेंबर-मेमध्ये त्यांचे मोठाले घोस झाडावर लटकलेले दिसतात.

लाकूड तांबूस, कठीण व मध्यम प्रतीचे टिकाऊ असते. ते सागाऐवजी वापरतात. घरबांधणी, शेतीची अवजारे, बैलगाड्या, आगगाडीचे डबे व इतर किरकोळ कामास चांगले. सालीपासून भरपूर टॅनीन मिळते व ते कातडी कमविण्यास व ती रंगविण्यास वापरतात. ताज्या फुलांच्या रसात ⇨ वसनवेलीची मुळे उगाळून पटकीवर व अफूच्या विषबाधेवर देतात. साल मूत्रल (लघवी साफ करणारी) व हृदयास शक्तिवर्धक असते.

 

लेखक: कुलकर्णी, उ. के.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate