অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुंभा

कुंभा

कुंभा

(हिं. कुंबी, वाकांबी; सं. व गु. कुंभी ; क. गवहण्णू, हेण्णुमट्टी; इं. वाइल्ड ग्वाव्हा, स्लो मॅच ट्री; लॅ. कॅरिया आर्बोरिआ कुल-मिर्टेसी). भारतात हिमालयाच्या पायथ्यास कांग्रापासून पूर्वेकडे बंगाल, मध्य, पश्चिम व दक्षिण भारत इ. प्रदेशांत अधिकात अधिक १,५५० मी. उंचीपर्यंत, शिवाय श्रीलंका, मलेशिया व थायलंड येथेही सामान्यपणे आढळणारा हा पाणझडी वृक्ष (उंची ९—१८ मी.) आहे

; परीघ १.५ मी., साल जाड, भेगाळ, खरबरीत व गर्द करडी; आत लालसर तंतुयुक्त; पाने साधी, मोठी , साधारण जाड, शेंड्याकडे अधिक रुंद, दंतुर;  देठ फार लहान;  ती फेब्रुवारीत गळतात;  मार्च-एप्रिलमध्ये फुलांबरोबर नवीन पालवी येते;  गळण्यापूर्वी ती लाल व जांभळट होतात. फुलोरा (कणिश) बुटका व त्यावर फार थोडी पण मोठी सच्छद, लाल पांढरी व दुर्गंधी फुले येतात[→मिर्टेसी].

केसरदले असंख्य, जांभळी  व लांब असतात [→फूल].  फळ मांसल,  गोलसर आणि दीर्घस्थायी, संवर्तयुक्त व हिरवट असते [→फळ]; बिया अनेक. ही झाडे जंगलातील आगीस (वणव्यास) फार यशस्वीपणे विरोध करून वाढत राहतात. लाकूड पाण्यातही चांगले टिकाऊ आणि मजबूत असल्याने शेतीची अवजारे, गाड्या, सजावटी वस्तू, जळण वगैरेंसाठी उपयुक्त; सालीपासून निघणारे धागे दोऱ्या करण्यास, ब्राऊन पेपर बनविण्यास आणि साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास वापरतात; सालीपासून मंद जळणाऱ्या दारूच्या वाती बनवितात; फळे गुरांना चारतात; साल आणि फळ स्तंभक (आकुंचन करणारे) व शामक; सर्दी व खोकल्यावर फुले आणि सालीचा रस मधाबरोबर देतात.

मूळ, साल व पाने मत्स्यविष आहेत. वाळविलेले संवर्त बाजारात वाकुंभ नावाने मिळतात. ब्रह्मदेशात पाने बिड्या आणि चिरूट बनविण्यासाठी वापरतात. रेशमाचे किडे पानांवर पोसतात. (चित्रपत्र५१).

 

लेखक: दोंदे, वि. प.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate